क्लकहॉन, क्लाइड : (११ जानेवारी १९०५–२९ जुलै १९६०). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म ले मार्स (आयोवा) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जॉर्ज वेस्ली ह्या श्रीमंत गृहस्थाने यास बालपणी दत्तक घेतले. न्यू जर्सी येथे त्याने शिक्षणास प्रारंभ केला पण प्रकृती अस्वास्थामुळे ते अपूर्ण राहिले. पुढे त्यास न्यू मेक्सिकोला पाठविण्यात आले. तिथे त्याचा नव्हाहो जमातीशी निकटचा संपर्क आला. त्यावर त्याने वयाच्या बाविसाव्या वर्षी टू द फूट ऑफ रेनबो (१९२७) हे पहिले पुस्तक लिहिले. पुढे त्याने हार्व्हर्ड विद्यापीठातून १९३६ मध्ये पीएच्. डी. मिळविली आणि त्याच विद्यापीठात तो आदेशक म्हणून लागला व पुढे प्राध्यापक झाला. त्यास तेथील मानवशास्त्र विभागात प्राध्यापक व अखेर प्रमुख होण्याचाही मान मिळाला. तेथील रशियन संशोधनकेंद्राची स्थापना त्याने केली व त्याचे पहिले संचालकपद त्याच्याकडेच देण्यात आले.

क्लाइड क्लकहॉन

क्लकहॉनने मानवशास्त्रात मुख्यत्वे संस्कृतिबंध व सांस्कृतिक मूल्य ह्यांविषयी  केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. जगातील मानवसंस्कृती भिन्नभिन्न असल्या, तरी त्यांच्यात समान व शाश्वत अशी काही मूल्ये असतात आणि ती शोधली पाहिजेत, असे त्याचे मत होते व त्या दृष्टीने त्याने संशोधन केले. मानवशास्त्र व मनोवविश्लेषण यांचा परस्परसंबंध त्याने स्पष्ट केला आणि अनुप्रयुक्त मानवशास्त्रांसंबंधीही बरेच कार्य केले. त्याने मानवशास्त्रावर विपुल लेखन केले. त्याचे बियाँड द रेनबो (१९३३), नव्हाहो विचकॅफ्ट (१९४४), मिरर फॉर मॅन (१९४९) यांसारखे ग्रंथ प्रसिद्ध असून क्रोबरबरोबर त्याने लिहिलेला कल्चर : ए क्रिटिकल रिव्ह्यू (१९५२) हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. ह्याशिवाय सु. ३०० लहानमोठे स्फूट लेख त्याने प्रसिद्ध केले.

मुटाटकर, रामचंद्र