बिऱ्होर : भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे बिहार, मध्य प्रदेश व ओरिसा या राज्यांतून आणि छोटा नागपूर पठारातील टेकड्यांतून आढळते. महाराष्ट्रात त्यांना बिऱ्हूल म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत त्यांची तुरळक वस्ती आढळते. ही एक मागासलेली अनुसूचित जमात असून त्यांची लोकसंख्या ४,३०० (१९७१) होती. त्यांपैकी बिहार राज्यात ते सर्वाधिक म्हणजे ३,४६४ असून मध्य प्रदेशात ७३८ व ओरिसात ९८ होते. भटकणारे ते उथळू व स्थायिक झालेले ते जांधी अशा यांच्या दोन उपजमाती आहेत. मुंडारी व साद्री भाषेचे मिश्रण म्हणजे यांची भाषा. मुंडा भाषेत बिऱ्होरचा अर्थ जंगलवासी अथवा लाकूडतोड्या असा आहे. महाराष्ट्रातील बिऱ्होर मुख्यतः हिंदी भाषाच बोलतात.

चटईयांचे मुख्य अन्न कंदमुळे व मांस असून माकडसुद्धा ते खातात. अन्न संकलनार्थ सतत भटकत असल्यामुळे राहण्यासाठी ते तात्पुरती शंक्वाकार झोपडी बांधतात. त्याला कुंबा म्हणतात. झाडांच्या सालींपासून दोर वळून ते जवळपासच्या ग्रामीण भागातील बाजारात विकतात व मिळणाऱ्या पैशाच्या मोबदल्यात धान्य, कपडे इ. घेतात. त्यामुळे साहजिकच बाजारच्या जवळपास यांची वस्ती आढळते. इतकेच नव्हे, तर पुनःपुन्हा आलटून-पालटून त्याच त्याच ठिकाणी त्यांनी वस्ती केलेली आढळते. नेहमीच बाजारशी संबंध येण्याने त्यांच्या खाण्यापिण्यात व भटकण्यात बदल झाला आहे. हळूहळू ते स्थिर वस्ती करू लागले आहेत. त्यांच्या एकत्र झोपडपट्टीस टंडा म्हणतात. टंडामध्ये युवागृह असून मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र झोपड्या असतात. त्याला गिटीचोरा म्हणतात. मुलामुलींची लग्ने मात्र वडीलधाऱ्यांमार्फत ठरविली जातात. वधूवरांच्या हाताच्या करंगळीचे रक्त काढून त्याचा टिळा दोघांचे कपाळी लावणे, एवढाच महत्त्वाचा लग्नविधी असतो.

प्रत्येक टंडामध्ये गणचिन्हात्मक कुळी असून त्यातील कुटुंबे सामायिकपणे स्थलांतर करतातच असे नाही परंतु वस्तीत असताना मात्र टंडामधला प्रमुख नाय ह्याच्या सांगण्यावरून सर्व व्यवहार चालतो. मृताचे दहन करून त्याच्या अस्थी नदीत टाकतात.

संदर्भ : Vidyarthi, L. P. Cultural Contours of Tribal Bihar, Calcutta, 1964.

भागवत, दुर्गा