पिग्मी : एक दृश्यपिग्मी : आधुनिक मानवशास्त्राच्या दृष्टीने निग्रो वांशीक वैशिष्ट्ये असलेला पिग्मी निग्रो हा एक वैशिष्ट्यपूर्ण मानवसमूह आहे. पिग्मी लोक विषुववृत्तीय प्रदेशांत विशेषत: आफ्रिका खंडात आढळतात.या खंडातील बेल्जियन काँगो, मध्य आफ्रिका व फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका या प्रदेशांत त्यांची वस्ती जास्त आहे. झाईरे प्रजासत्ताकातील इतुरी जंगलातील पिग्मी अद्यापिही आपले वेगळेपण टिकवून आहेत. पिग्मी हे स्थलपरत्वे ⇨ बांबूटी (एम्‌बुटी Mbuti), बोंगो यांसारख्या नावांनी ओळखले जातात.

पिग्मी जमातीत निग्रो वंशसमूहाची काही शारीरवैशिष्ट्ये आढळतात तथापि ठेंगूपणा हे त्यांचे पृथगात्म वैशिष्ट्य होय. पिग्मी पुरूषाची सरासरी उंची १५० सेंमी. आणि स्त्रीची १४२ सेंमी. असते. वर्णाने ते पिंगट किंवा गडद तपकिरी असून रूंद जबडा, मोठे ओठ, बसके पसरट नाक, मोठे डोळे व कुरळे लोकरीसारखे केस ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. इतर निग्रो जमातींप्रमाणे पिग्मींना शेती, कुंभारकाम किंवा पशुपालन येत नाही. ते विषुववृत्तीय प्रदेशांतील रहीवासी असल्याने त्यांच्या उत्पादनाचा मुख्य भर शिकार व अन्नसंकलन यांवर असतो. पिग्मी जंगलात छोट्या खेड्यात वस्ती करून राहतात.

आशिया खंडातील श्रीलंकेतील वेद्दा व अंदमान, मलाया, सुमात्रा णि फिलिपीन्स बेटांवरील नेग्रिटो हे पिग्मीच होत. 

मुटाटकर, रामचंद्र