योरूबा : आफ्रिका खंडातील नायजेरियातील एक प्रमुख जमात. त्यांचा उल्लेख योरूबलंद, यार्रिबा अशा नावांनीही करतात. त्यांची वस्ती प्रामुख्याने नैर्ऋत्य नायजेरियात आढळते. याशिवाय बेनिन प्रजासत्ताक (दाहोमी) आणि उत्तर टोगो यांतूनही तुरळक प्रमाणात त्यांची वस्ती आहे. लोकसंख्या सु. ३१,००,००० (१९८१). साधारणपणे इ. स. आठव्या शतकाच्या प्रारंभी योरूबा लोक नायजर नदीच्या पश्चिमेकडील वनप्रदेशात आले असावेत. त्यांनी काही नगरेही त्यावेळी स्थापन केली. इ. स. १००० च्या सुमारास योरूबांचे दुसऱ्यांदा स्थलांतर होऊन ते या वनप्रदेशाच्या उत्तरेकडील गवताळ प्रदेशात गेले. त्यावेळी ओयो हे मोठे नगर व इतर नगरे स्थापन झाली. ओयो येथील नगरराज्याचा पुढील ५-६ शतके विस्तार आणि विकास घडून आला. योरूबांची इतर नगरराज्ये ही अंतर्गत व्यवहाराने एकमेकांशी जोडलेली होती. योरूबा नगरराज्ये खालावत गेल्यानंतरदेखील योरूबांची अंतर्गत प्रशासनव्यवस्था टिकून होती. अठराव्या शतकात ओयो सत्तेला उतरती कळा लागली आणि पुढील शतकात दाहोमी व हौसा येथील राज्यकर्त्यांनी त्या सत्तेचा शेवट घडवून आणला. १८९३ साली योरूबांचा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि नंतर त्यांचे स्वातंत्र्य नाममात्रच उरले.

योरूबा हे निग्रोवंशीय उजळ वर्णाचे लोक आहेत. अमेरिकेतील बहुसंख्य निग्रो योरूबा जमातीतील असून योरूबांनी मुसलमान वा ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतलेली आहे. तथापि त्यांनी आपल्या परंपरागत चालीरीती सोडलेल्या नाहीत. त्यांच्या लहानमोठ्या सु. ४०० देवता आहेत. यांच्यात अबोर, एगबा, अबोरी, एकिती, एको, इजेशा, जेकरी, ओयो वगैरे उपजमाती आहेत. त्यांच्यात मातृ-पितृ कुळींचा संबंध असल्यास विवाह निषिद्ध मानण्यात येतो. मध्ययुगात योरूबांत मातृवंशीय कुटुंबपद्धती रूढ होती पण राजेशाहीच्या अवनत अवस्थेत तिच्याजागी पितृवंशीय पद्धती रूढ झाली. वडिलांची संपत्ती मुलाला तर आईची संपत्ती मुलीकडे जाते. यांच्यात जे सामाजिक संप्रदाय आहेत ते राजकीय-धार्मिक स्वरूपाचे असून त्यांत लक्षणीय विविधता आढळते तथापि सांस्कृतिक गुणविशेष आणि समान भाषा यांमुळे योरूबांची एकात्मता दृष्टोत्पत्तीस येते. त्यांचे बरेचसे विधी गुप्त असतात. त्यांना एगुनगुन, ओटो, ओगबोनी अशी नावे आहेत. नायजर-काँगो भाषा कुटुंबातील क्वा भाषा समूहातील योरूबा हीच भाषा ते बोलतात. या भाषेतील काही साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत.

योरूबांची अर्थव्यवस्था कुदळी शेती, व्यापार आणि हस्तकलाव्यवसाय यांवर आधारित आहे. तृणधान्ये, मका, भुईमूग, गोराडू ही त्यांची प्रमुख पिके असून ते वाटाणा, घेवडा ही नगदी पिके घेतात. कोको हे त्यांचे महत्त्वाचे पैशाचे पीक आहे. स्त्रिया शेतात काम करीत नाहीत आणि हस्तव्यवसायातही सहभागी होत नाहीत. परंतु त्या व्यापारात तरबेज असतात. विणकाम वगळता बहुतेक हस्तकलाव्यवसाय पुरुष करतात. त्यात बुरूडकाम, भरतकाम, ओतकाम वगैरे असून त्यांचे कास्य ओतकामांचे काही नमुने जगप्रसिद्ध आहेत.

भागवत, दुर्गा