वेद्दा : श्रीलंकेतील एक आदिम जमात. तिची वस्ती प्रामुख्याने श्रीलंकेच्या मध्यपूर्व बिंटिनी जंगलात व कॅंडी भागात विखुरलेली होती. त्यांची लोकसंख्या सु. ५,३०० (१९११) होती पुढे ती घटत जाऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेद्दा इ. स. पू. सहाव्या शतकात स्थिरावले असावेत. त्यांची संस्कृती ही द्रविडपूर्व संस्कृती आहे, असे तज्ज्ञ मानतात. त्यांचा दक्षिणेकडील वंशप्रकार वेगळा असून तो दक्षिण अरबस्तानपासून पूर्वेला भारताच्या पलीकडे आग्नेय आशिया–इंडोनेशियापर्यंत पसरलेला आहे. श्रीलंकेतील वेद्दा हे वांशिकदृष्ट्या दक्षिण भारतातील दूरवरच्या दुर्गम प्रदेशात आढळणाऱ्या मालिद जमातीशी संबद्ध आहेत, असे एक मत आहे. तसेच दक्षिण भारतातील वेदन जमातीशीही त्यांचे साधर्म्य दर्शवले जाते. काळा वर्ण, कुरळे केस, रुंद वर्तुळाकार चेहरा, रुंद व बसके नाक, किंचित पुढे आलेला जबडा आणि माध्यम उंची ही द्रविडीयन शारीर–वैशिष्ट्ये वेद्दांमध्ये आढळतात.
यांच्यात पंचायत नाही, नायक नाही. कुटुंब हाच त्यांचा प्रमुख आधार असून कोणत्या समूहाने कोठे फिरावयाचे व शिकार करावयाची, यांबाबत त्यांच्यात परस्पर–सामंजस्य आहे. त्यांच्या नियोजित क्षेत्रात क्वचितच अतिक्रमण झालेले दिसून येते. त्यांची भाषा सिंहलीचीच बोलीभाषा असून तिचा जमातीपुरताच मर्यादित वापर आढळतो. त्यांच्यात लग्नाचा असा खास समारंभ अथवा विधी नसतो. वेद्दांच्या मध्ये‘वारुगे’ ऊर्फ कुळीची पद्धत आहे. त्यांच्या सर्व कुळी बहिर्विवाही आहेत. उना-पने, उरूवरूगे, नामदी या काही प्रमुख कुळी होत. मात्र त्यांच्यात गणचिन्हवाद नाही आणि मातृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे. वयात आलेल्या मुलामुलींचे लग्न वडीलधारी माणसे ठरवितात. वधूपिता जावयाला धनुष्य देतो, तर वराचे वडील जंगलात त्यास कोठेही जाण्यास मुभा देतात. वर भावी पत्नीस कापड आणि दागिने देतो. त्यानंतर ती दोघे जंगलात जातात आणि त्यांचे पति- पत्नीचे नाते निश्चित होते. त्यांच्यात देज देण्याची पद्धत नाही. मात्र मुलीचे लग्न झाले, की जावई बहुधा सासऱ्याच्या घरी येऊन राहतो. सासऱ्याचा जमीन-जुमला त्याला मिळतो. त्यांच्यात एकपत्नीकत्व आहे.
संदर्भ : 1. Ferreira, J. V. Totemism in India, Oxford, 1965.
2. Hutchinson, H. N. Gregory, J. W. Lydekker, R. The Living Races of Mankind, Vol. I, Delhi, 1985.
3. Seligmann, C. G. Seligmann, B. Z. The Veddas, Cambridge, 1911.
“