कातकरी: महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत राहणारी एक वन्य जमात. काथोडी ह्या नावानेही ती ओळखली जाते. यांची लोकवस्ती १९६१ च्या जनगणनेनुसार १,४३,२५५ असून ती कुलाबा, ठाणे, पुणे व नासिक या जिल्ह्यांत केंद्रित झालेली आहे. कातकरी बहुतेक करुन डोंगराळ व उंच पठारांच्या प्रदेशांत वसाहत करुन राहतात.

कातकरी नृत्य

ही खरीखुरी अरण्यवासी जमात आहे. गावापासून दूर नदीकाठी अगर डोंगरकपारीत त्यांची वसाहत असते. तिला कातवाडी असे म्हणतात. एका कातवाडीत पंधरा ते पन्नास चंद्रमौळी झोपडया असतात. त्यांची स्वतःची अशी जमीन जवळजवळ नाहीच आणि नियमित अर्थार्जन होईल, असा धंदाही नाही. शिकार करणे, कोळसा पाडणे, रानातील कंदमुळे व वाळलेली लाकडे गोळा करुन खेडोपाडी विकणे, गोडया पाण्यात मच्छीमारी करणे, शेतावर मोलमजुरी करणे व वरकस जमीन कसणे हे यांचे व्यवसाय आहेत. जळाऊ व इमारती लाकडे, फळझाडे, भाज्या, कंदमुळे, औषधी वनस्पती, सर्पदंशावर उपयोगी वनस्पती यासंबंधी यांचे ज्ञान उत्तम असते. हे लोक निष्णात शिकारी असून तिरंदाजीतील यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. वन्य पशूंची शिकार करण्यासाठी हे धनुष्य (धुनू) व लोखंडी पातीचे बाण (चिंबुती) वापरतात. उंदीर, खारी, सहाळी, माकडे, जवादे, हरिणे, रानडुकरे, ससे, ऊद, भेकरी, बाऊल, शेळ्या, बोकड वगैरे प्राण्यांचे आणि कवडे, कबुतरे, रानकोंबड्या, होले, मोर पुसावे, लावरे वगैरे पक्ष्यांचे मांस हे खातात. यांच्या पोटजातीतील ढोर कातकरी हे गाय, बैल, म्हशी यांचेच नव्हे, तर क्वचित मांजर, कुत्री व कोल्हे यांचेही मांस खातात. नाचणी, वरी व हरीक यांची भाकरी, कंदमुळे, पशुपक्षांचे मांस व मासे हे यांचे नित्याचे अन्न. आत्यंतिक दारिद्रामुळे तेही त्यांना वेळेवर व रोज मिळू शकत नाही.

कातकरी हा वर्णाने काळा, मध्यम उंचीचा, पिंगट-काळ्या व विरळ केसांचा, सरळ, उंच व किंचित पुढे आलेल्या कपाळाचा, दबलेल्या अशा सरळ किंवा फताड्या नाकाचा, रुंद तोंडाचा, लहान हनुवटीचा, सडपातळ पण रेखीव असा असतो. तो अत्यंत बळकअ व चिवट, पण तेवढाच आळशी असतो. स्त्रिया उंच व सडपातळ असून त्यांचे केस क्वचितच विंचरलेले असतात. मुले हडकुळी असतात.

कमरेला लंगोटी, अंगात बंडी व डोक्याला फटकूर असा साधारणतः पुरुषांचा वेश, तर स्त्रिया आखूड लुगडी नेसतात व चोळी घालतात. काचमण्यांच्या माळा, पोती, बांगडया व कर्णभूषणे घालण्याची त्यांना फार हौस असते. कुमारिका गळ्यात रंगीत पोत घालतात, पण पायात जोडवी घालीत नाहीत. सुवासिनी काळी पोत व जोडवी घालतात. कपाळावर, हनुवटीवर व हातांवर गोंदून घेण्याची स्त्रियांना फार आवड असते.

कातकऱ्यांच्या सोन कातकरी व ढोर कातकरी अशा दोन पोटजाती आहेत. पोटजातींत मोरे, वाघमारे, पाटकर, वळवी, मांडवकर इ. कुळी असतात. एकाच कुळीतील तरुन-तरुणींचे लग्न होत नाही, प्रत्येक कातवाडीवर एक प्रमुख कातकरी असतो. त्यास नाईक असे म्हणतात. लहानसहान भांडणतंटे सोडविण्याचे काम तो करतो. लग्न ठरविण्यास मुलाच्या बापाबरोबर तो वधूघरी जातो व लग्न ठरविण्यास पुढाकार घतो. वधूपित्यास १० ते ५० रुपयांपर्यंत देज द्यावे लागते. याला सोयरीक ठासणे असे म्हणतात. लग्नाच्या आदल्या दिवशी वधूवरांस हळद लावतात. बाशिंगे बांधून व खालूबाजा वाजवीत बरास वधूच्या घरी नेतात. लग्न लावण्याचे काम पाच विवाहित पुरुष व जंगम करतात. तांदूळ, हळद, पानसुपारी व पैसा यांचा कणा मांडतात. वधूला कमेवर घेऊन वर कण्यास पाच फेऱ्या मारतो व लग्न होते. लग्नानंतर चहापान किंवा मद्यपान केले जाते, पुढे जेवण झाल्यावर सर्वजन रात्रभर वाद्यांच्या तालावर नाचतात आणि गाणी म्हणतात. लग्ने साधारणतः मार्गशीर्ष ते वैशाख महिन्यांच्या दरम्यान होतात. प्रसूतीचे काम जातीतील सुइणी करतात. मृतांना ऐपतीप्रमाणे जाळतात अगर पुरतात. दहनाच्या वा पुरलेल्या जागी एक दगड ठेवून त्यावर लहानशी झोपडी बांधतात.

गौरी, बांगडी, हिजबानी असे यांचे नाचाचे प्रकार आहेत. कहाळी, सूर, ढोल, टिमकी, चोंडके, डेरा इ. वाद्यप्रकार आहेत. पितळीवर सरबाटीची काठी मेणाने चिकटवून ती घासतात व निघणाऱ्या सुराच्या तालावर कथा सांगतात. यास सुरत लावणे असे म्हणतात.

कातकऱ्यांच्या घरात कोयती, कुऱ्हाड, कुदळ, जाते (घरटी), तवा, गाडगी, धनुष्यबाण, एक दोन ॲल्युमिनियमच्या थाळया व पातेले आणि फाटकी मलीन वस्त्रे यांहून अधिक काही असत नाही.

कातकऱ्यांची भाषा ही मुळात भिल्ली भाषा आहे. कातकरी अनेक शतके महाराष्ट्रात राहिल्याने ती मराठीच्या वळणावर गेली आहे. यांच्या भाषेत अनेक शब्द मराठीहून भिन्न आढळतात. उदा., नंडाळ (कपाळ), साकू (अंडे), ओंहोडास (नवरा) इत्यादी, तसेच ह्यांच्या भाषेतील भूतकाळाची रुपे `ना’ हा प्रत्यय लावून होतात, जसे-पडना (पडला), बिसना (बसला) वगैरे डांगमधील भिल्लांची डांगी भाषा व कातकऱ्यांची भाषा यातही आश्चर्यकारक साम्य आहे. भिल्ल, कोकणे, वारली व कातकरी यांच्या लोकसाहित्यातील कल्पनाबंधांतही बरेच साम्य आढळते. ह्यावरुन कातकरी हे गुजरातमधून सरकत सरकत येऊन कोकणात स्थायिक झालेले असावेत, असे दिसते.

वाद्यदेव, म्हशा, चेडा, वेताळ, जरीमरी इ. देवतांना कातकरी भजतात, यांच्यामध्ये पितरांना फार मान असतो. सर्वपित्री अमावस्या हा त्यांचा मोठा सण मानण्यात येतो. तो थाटाने साजरा करतात. तांदळाची खीर, वडे किंवा अन्य गोड पदार्थ करुन तो त्या दिवशी छपरावर ठेवतात. या अन्नास कावळा शिवला, म्हणजे पितर संतुष्ट झाले, असे ते समजतात. शिमग्याचा सणही ते उत्साहाने साजरा करतात.

संदर्भ:Welling, N.A. The Katkaris, Bombay,1934.

कुलकर्णी, सु.वा.