झूलू : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील नाताळ आणि ट्रान्सव्हाल प्रांतांतील बांटू भाषा बोलणारे आदिवासी यांची वस्ती दक्षिण आफ्रिकेत विखुरलेली असून त्यांच्या मूळ प्रदेशात झूलूलँड म्हणतात. यांची लोकसंख्या ३९ लाख होती (१९७१).

झूलू वर

आफ्रिकेतील लढवय्ये लोक म्हणून त्यांची ख्याती आहे. पंधराव्या शतकात तूगेला नदीच्या काठी हे लोक राहत असत. त्या वेळी त्यांचे लहान समूह होते. व प्रत्येक समूहाचा एक नेता असे. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी झूलूंचा राजा चाकॅ (शाकॅ १७७३–१८२८) याने सर्व लोकांना संघटित करून मोठी फौज उभारली. त्याने सर्व तरुणांना बराकीत ठेवून शिस्तबद्ध सैनिकी शिक्षण दिले. त्याने नवीन युद्ध तंत्राचा अवलंब करून एक विशिष्ट भाला, गनिमी व जाळपोळीचे तंत्र इ. आचरणात आणले. एवढेच नव्हे, तर तरुणांचे लष्करी शिक्षणातील चित्त विचलित होऊ नये, म्हणून पस्तीस वर्षांपर्यंत त्यांच्या विवाहास बंदी घातली. त्याने शेजाऱ्यांशी युद्धे करून आपल्या प्रदेशाचा विस्तार केला. त्याचा १८२८ मध्ये डिंग्गान या सावत्र भावाने खून केला आणि डिंग्गान (१८२८–४०) हा गादीवर आला. त्याने बोअर लोकांना प्रवेश देऊन त्यांच्याबरोबर तह केला आणि त्यांची वसाहत नाताळमध्ये झाली पण पुढे त्यांची त्याने क्रूरपणे कत्तल केली. त्याचा प्रिटूरिअस यने १६ डिसेंबर १८३८ रोजी पराभव केला. १८४० मध्ये डिंग्गानला बाजूला सारून त्याचा भाऊ अम्पांडा बोअर लोकांच्या मदतीने गादीवर आला. ब्रिटिशांनी १८७९ मध्ये झूलू राजाचा पराभव केला पण त्यात त्यांची मानवहानी फार झाली. त्यांना सु. २५,००० झूलू सैन्याशी लढत द्यावी लागली. १८८७ ते ८९ च्या दरम्यान ब्रिटिशांनी झूलूंच्या काही प्रमुख पुढाऱ्यांना अधिकाराच्या जागा दिल्या. १९०६ व १९०७ मध्ये झूलू लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले, पण ते अशस्वी झाले.

झूलू स्त्रियांचे मद्यपान

आफ्रिकेतील हे झूलू सामंत या नावानेही परिचित आहेत. त्यांपैकी बहुतेक शेती करतात व गुरेढोरे पाळतात. अलीकडे त्यांना जमीन कमी पडू लागल्यामुळे काही झूलू सरकारी नोकरीत गेले आहेत, तर काही खाणींत व शहरांतही काम करावयास जातात. दरबान शहरात अनेक झूलू अलीकडे स्थायिक झाले आहेत. झूलूंचे मुख्य अन्न भरड धान्य, मका व नासलेले दूध असून मांसाहारही ते घेतात. झूलूंच्या लहानलहान खेडेवजा वस्त्या असून त्यांना क्राल असे म्हणतात. या क्रालचा एकजण प्रमुख असतो. क्रालमध्ये मधमाश्यांच्या पोळ्यांप्रमाणे वर्तुळाकार झोपड्या असतात.

झूलूंची नैतिक मूल्ये उच्च समजली जातात. झूलू देखणे, शरीरने धष्टपुष्ट आणि डौलदार आहेत. ते शारीरिक खेळांत तरबेज असतात. वयात आल्यावर मुलामुलींची लग्ने होतात. विवाहात वधूमूल्य द्यावे लागते. वधूमूल्य (लोबोला) गुरे-ढोरे यांच्या रूपात देण्याची पद्धत आहे. आपल्या कौमार्याचे प्रतीक म्हणून वधू विवाहसमयी हातात चाकू धारण करते. बहुपत्नीकत्वाची चाल अद्यापि त्यांच्यात आढळते. एक पत्नी क्रालमध्ये जमीनजुमला व मुले सांभाळते, तर दुसरी पत्नी शहरात झूलूबरोबर राहते.

अमंगल जादू किंवा भूतात्म्यांच्या प्रभावामुळे मृत्यू येतो, असा त्यांचा समज आहे. शेणाने घर सारवणे, केस कापणे किंवा बोकड मारताना त्याने केलेला आवाज इ. मार्गांनी आत्मा परत आणण्याचे प्रयत्न ते करतात. अद्यापिही आपल्या जमात-प्रमुखाची आज्ञा ते शिरसावंद्य मानतात.

संदर्भ : 1. Bryant, A. T. The Zulu People, Pietermaritzburg, 1949.    2. Judge, y3wuoeph,  “The Zulus : Black Nation in a Land of Apartheid, ”  National Geographic, Vol. 140, Washington, December, 1971.

मुटाटकर, रामचंद्र