शोलगा : दक्षिण भारतातील एक आदिम जमात. शोलगा अगर सोलगा यांची वस्ती तमिळनाडू राज्यात मुख्यत्वे कोईमतूर व कर्नाटकात नृत्याच्या तयारीतील शोलगा पुरूष म्हैसूर जिल्ह्यात आढळते. पूर्वी गेड्डेसळ डोंगरात नृत्याच्याकारयन व बिल्ल्न ऊर्फ माढेश्वर या नावाचे दोन भाऊ होते. शोलगा हे त्यांपैकी कारयनचे वंशज आहेत, असे म्हणतात. त्यांच्यात कुळीला कुलम म्हणतात. चलिकिरी, तेनेस, बेल्लेरी, सूर्य व अलेस अशा पाच कुळी त्यांच्यात आहेत. या बहिर्विवाही कुळी आहेत. त्यांची भाषा कानडी आहे. शोलगा जमातीच्या गामप्रमुखाला यजमान म्हणतात. तो सर्व धर्मकृत्ये करतो. त्याच्या हाताखाली पट्टगर असतो. त्यांचे मुख्य अन्न नाचणीची पेज व रानातील कंद हे आहे. याशिवाय रानातले पक्षी व जनावरे यांचे मांसही ते खातात पण पोपट मात्र खात नाहीत. पोपटाला ते आपले संतान समजतात. आवळे, चिंचा, सांबरशिंग, डिंक, मध, रिठे इ. पदार्थ ते गोळा करतात. त्यांचा मुख्य देव म्हणजे बिलिगिरी रंगस्वामी. कारैय्या हा त्यांच्या जमातीचा एक खास देव आहे. लग्नात वधूच्या गळ्यात ताली बांधतात. मृतांना पुरतात. माणूस मरतो त्या जागेवर नाचणीची पेज व पाणी ठेवतात.

संदर्भ : Thurston, Edgar Rangachari, K. Castes and Tribes of Southern India, Vol. VI, New York. 1965.

भागवत, दुर्गा