सोहाडिया पहाडिया : समेरिया पहाडिया, माले अथवा मालेर, सौरिया, सामिल पहाडिया, असल पहाडिया, सांघी व सवरा पहाडिया या विविध नावांनी ज्ञात असलेली ही वन्य जमात प्रामुख्याने बिहार राज्यातील साहेबगंज व गोड्डा या जिल्ह्यांत आढळते. त्यांची लोकसंख्या ३९,२६९ होती (१९८१). ते बहुभाषिक असून प्रदेशपरत्वे बंगाली, माल्टो, हिंदी आदी भाषा बोलतात पण माल्टो अधिक प्रमाणात प्रचारात आहे. राजमहल पर्वतात हिची मुख्य वसाहत आहे. मुख्यतः ही टेकड्यांच्या उंच भागावर राहात असून या जमातीचे खरे नाव माल असे आहे. बंगालच्या माल पहाडियांचा व यांचा सांस्कृतिक संबंध पूर्वी होता परंतु पुढे अनेक स्थलांतरे होऊन या माल नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमाती भिन्न झाल्या.

यांच्यात प्रदेशपरत्वे समूह वेगळे झालेले असून प्रत्येक समूहाचा एक प्रमुख असतो. त्याला सरदार म्हणतात. तसेच गावात उपाध्यायाचे काम करणाऱ्याला मांझी म्हणतात.

हे लोक शूर धनुर्धर आहेत. मुसलमान अमदानीतसुद्धा ते आपला बाणा राखून होते. त्यांच्यात अनेक वंशावळी असून आतेमामे भावांत विवाह वर्ज्य आहे. सज्ञान झालेल्या मुलामुलींत विवाह होतात. वधूमूल्य द्यावे लागते आणि लग्नाची मेजवानी वरपक्ष देतो. घटस्फोटाची मागणी दोनही पक्ष करू शकतात. पुनर्विवाहास जमातीची मान्यता आहे. मेहुणी व देवर विवाहास जमातीत मान्यता आहे मात्र जमातीतच विवाह करण्याचे बंधन आहे. यांच्यात मुलामुलींना परस्परांच्या पसंतीने प्रेमविवाह करण्यास पूर्ण मुभा आहे पण मुलाने अमुक एका मुलीशी लग्न करण्याची इच्छा आहे, असे कळवले की ‘सिथु’ ऊर्फ मध्यस्थ मुलीच्या वडील माणसांशी बोलणी करून सोयरिक घडवून आणतो. लग्नविधीतला मुख्य सोहळा म्हणजे वराने शेंदुराचे पाच टिळे वधूच्या कपाळावर लावायचे.

बहुतेक सोहाडिया हिंदू धर्मीय आहेत. यांच्यात सूर्यपूजेला महत्त्व असून सूर्य देवतेला ते धर्म गोसाईन म्हणतात. प्रत्येक घरासमोर एक ओबडधोबड तासलेला दगड असतो. तोच सूर्य देवाचे प्रतीक होय. ग्राम देवाला ते ‘बारा द्वारी’ ऊर्फ बारा गोसाइन म्हणतात कारण त्याच्या देवळाला बारा द्वारे असावीत असा संकेत आहे.

हे लोक ‘झूम’ ऊर्फ ‘पराओ’ पद्धतीने शेती करतात. शेती हाच यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय आहे. जमातीतील काही लोक मोलमजुरी तसेच काही मासेमारी व पशुपालनही करतात. जंगल तोडून, जाळून त्या जागेत ते फिरती शेती करतात. त्यांच्या या पद्धतीला ते स्वतः ‘काले मांदोले’ म्हणजे जंगल जाळणे असे म्हणतात. मृतांना ते पुरतात.

संदर्भ : 1. Risley, H. H. The Tribes and Castes of Bangal, Calcutta, 1891.

           2. Singh, K. S. The Scheduled Tribes, Delhi, 1994. 

भागवत, दुर्गा