अंगामी नागा : भारतातील नागा जमातींपैकी एक प्रमुख जमात. त्यांची संख्या ढेबर आयोग अहवाल १९६१ अनुसार ३०,००० होती. तेंगिमा,चक्रिमा व केझामी असे अंगामीचे तीन पोटभेद आहेत. आदरातिथ्याबद्दल त्यांची ख्याती आहे. स्त्रिया विणकाम करतात. शिकारीची आयुधे ते स्वत:च करतात. टोपल्या व चटया तयार करण्यातही अंगामी वाकबगार असतात. अंगामी सोपान-शेती करतात,मुख्य पीक भाताचे घेतात. खाल्लेल्या पशूंचे गुण अंगात येतात असा समज असल्यामुळे खाण्याचे बरेच पदार्थ ते निषिद्ध मानतात.

      सामाजिक संघटनेत कुळीला महत्त्व असते. वेगवेगळ्या कुळींमधील संबंध संशयाचे असतात. त्यामुळे नेहमी सामाजिक वातावरण अशांत असते. स्त्रियांना मालमत्तेचे हक्क नसतात. बहुपतिपत्नीत्वाची प्रथा नाही. विधवा पुनर्विवाह करू शकते,पण तो पतीच्या कुटुंबात करता येत नाही. वधूमूल्य म्हणून काही कोंबड्या,दोन डुकरे व एक भाला देण्याची पद्धत आहे.

      ‘ग्नोंगी’ व ‘तेऱ्हेंगी’ नामक समारंभ अनुक्रमे शेतीहंगामाच्या आरंभी व शेवटी करतात. ‘सेक्रेंगी’ नामक समारंभाचा उद्देश लोकांचे आरोग्य चांगले राहावे, असा आहे. 

 

पहा : नागा

मुटाटकर, रामचंद्र

नृत्यसज्ज अंगामी नागा