कोरा : पश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात. काओरा, खैरा, कारा व कोरा या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सर्व जमाती एकच होत, असे रिश्ले यांचे म्हणणे आहे. त्यांचे मूलस्थान बिहार मानले जाते. उपजीविकेसाठी त्यांनी स्थलांतर केले. पश्चिम बंगालमध्ये यांचे प्रमाण जास्त आहे. काही प्रमाणात हे ओरिसामध्येही आढळतात. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची संख्या पश्चिम बंगाल, बिहार व ओरिसा या तीन राज्यांत मिळून ८३,०४२ होती.

त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असला, तरी विहिरी-तलाव खणणे, रस्ते बांधणे हे धंदेही ते करतात. ते द्रविडवंशीय असावेत आणि बहुधा मुंडा जमातीच्या वेगळ्या फुटलेल्या शाखेचे असावेत. ते प्रोटोऑस्ट्रलॉइड असावेत, असे रिश्ले म्हणतो. त्यांच्या मूळ उत्पत्तीविषयी परस्परविरोधी मते आहेत. परंतु त्यांच्या गणचिन्हावरून ते डोंगरवासी असावेत, असे दिसते.

कोरा व मोदी हे शब्द जमीन उकरणारा या अर्थी असून हे नाव त्यांच्या जमीन खणण्याच्या व्यवसायावरून पडलेले असावे. उदा., रांची व मानभूम येथील ओराओंचा क्वचित ठिकाणी कोरा व क्वचित काही ठिकाणी मोदी असा नामनिर्देश केलेला आढळतो.

या जमातीची बोलीसुद्धा पुष्कळशी संलग्न प्रदेशातील भाषेसारखी आहे. उदा., प. बरद्वानमध्ये ती ओराओं भाषेसारखी, मध्य बरद्वानमध्ये संथाळी भाषेसारखी, खुद्द बरद्वानमध्ये बंगाली भाषेसारखी, तर मुर्शिदाबादमध्ये मुंडारी भाषेसारखी आहे.

हे लोक काळ्या रंगाचे, कुरळ्या केसांचे व मध्यम उंचीचे आहेत. पुरुष धोतर नेसतात, काहीजण सदरासुद्धा वापरतात. स्त्रिया साडी नेसतात, पण चोळी वापरत नाहीत. अलीकडे दोघेही आधुनिक पद्धतीचे कपडे वापरू लागले आहेत. बायका अंगावर गोंदवून घेतात. त्या तांब्याचे व चांदीचे दागिने वापरतात.

घालो, मालो, शिखेरिया, बदामिया, सोनरेखा, जेठिया आणि गुरीबावा असे कोरांचे उपगट असून ते प्रादेशिक स्वरूपाचे आहेत. उदा., सोनरेखा हे नाव सुवर्णरेखा नदीच्या आसपास वस्ती करणाऱ्यांना देतात.

या जमातीच्या अनेक कुळी असून त्या बहिर्विवाही व गणचिन्हवादी आहेत. हे स्वत:स वैष्णव म्हणवितात आणि हिंदू दैवते पूजतात. कालीदुर्गा, गाय, तुळस यांची पूजा तसेच गृहप्रवेश वगैरे विधी त्यांच्यात रूढ आहेत. नाच-गाण्याला त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्व दिले जाते.

त्यांची मातीच्या भिंतींची चौकोनी घरे बांबूच्या छपरांची व गवताने शाकारलेली असतात. प्रत्येक घराच्या परसामध्ये बहुधा भोपळा, भेंडी, मोहरी, मिरची, केळी इ. लावलेली आढळतात. त्यांचे मुख्य अन्न मसुर-डाळ व भात असून सणावारी डुक्कर अथवा कोंबडी यांचे मांस ते खातात. तांदळापासून तयार केलेली दारू ते आवडीने पितात.

या जमातीत पूर्वी बालविवाह रूढ होता. अलीकडे मुलेमुली वयात आल्यानंतर विवाह करण्याकडे प्रवृत्ती आढळते. लग्नामध्ये सिंदूरदान हा विधी सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यावेळी वर वधूच्या भांगात तीन वेळा शेंदूर लावतो. देज देण्याची पद्धत आहे पण तो फारच अल्प असतो.

त्यांच्यात पितृप्रधान कुटुंबपद्धती असून संपत्तीचा वारसाहक्क मोठ्या मुलाकडे जातो. पण सर्व मुलांत संपत्तीची वाटणी व्हावी, असा विचार फैलावत आहे. बंगालमध्ये दायभाग व छोटा नागपूरमध्ये मिताक्षर पद्धतीनुसार संपत्तीचे विभाजन होते, असे रिश्ले यांने म्हटले आहे.

ग्रामपंचायतीचे काम मुख्यातर्फे चालते. त्याला महतो म्हणतात. त्याच्या हाताखाली जोगमानजी व पारमानिक हे मदतनीस असतात. हे अधिकार वंशपरंपरागत असून पूर्वी त्यांच्यामार्फत करवसुलीचे काम होत असे.

मृताला त्याच्या वस्तूंसह पुरतात. सुधारलेले कोरा मृताला जाळतात. नंतरचे विधी मृताचा मोठा मुलगा करतो.

संदर्भ : (1) Da,. A.K. The Koras and Some Little Known Communities of West Bengal, Calcutta, 1964.

(2) Prasad, N.A. Land and People of Tribal Bihar, Ranchi, 1958.

कीर्तने, सुमति