गदाबा : भारतातील एक आदिवासी जमात. गदाबा मुख्यत्वे आंध्र प्रदेश, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांत राहतात. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ६६,९०७ होती. यांची मूळ भूमी आंध्र म्हणजे गोदावरी नदीकाठचा प्रदेश असून गदा किंवा गोदा ही गोदावरीचीच पूर्वीची नावे असावीत, असे बी. सी. मुजुमदार म्हणतात. गदब म्हणजे ओझे वाहणारा मनुष्य. हे लोक स्वत:ला गुथौ म्हणवितात. यांची स्वतंत्र भाषा असून तिला गुताब म्हणतात. ती मुंडा गटातील आहे.

हे लोक फिरती शेती करतात. अलीकडे स्थिर शेतीही ते करू लागले आहेत. काहीजण मोलमजुरी व शिकारही करतात. ते दिसायला आकर्षक असून पुरुष नुसती लंगोटी घालतात पण स्त्रियांचा पोशाख विविधरंगी असतो. त्या कैरांग नावाची अरुंद कापडाची पांढऱ्या, निळ्या व लाल पट्ट्यांची स्वत:च विणलेली रुंद पट्टी कमरेला गुंडाळतात. याशिवाय कमरेला कुद्दल नावाची दोरीचीच रशना गुंडाळतात आणि कवड्या, मणी व पितळेचे विविध तऱ्हेचे दागिने घालतात. त्यांच्या केसांची रचना नालाकृती असते.

गदाबा युवती

गदाबांच्या बडा, सानो, परेंग, ओल्लार, कलायी, कापू, जुरुमु अशा कुळी आहेत. त्या भिन्न गोत्रीय आहेत. त्यांना बोन्सो किंवा वंश म्हणतात. त्यांच्या ग्रामप्रमुखाला नाएक व त्याच्या हाताखालील माणसांस चलन व बरीक अशी अनुक्रमे नावे आहेत. नाएक सर्व भांडणतंटे सोडवितो, आलेल्या पाहुण्यांची देखभाल करतो.

गदाबांची घरे दोन ओळींत असतात. मधल्या जागेत वडाचे झाड असते. ग्रामप्रमुखाचे घर सर्वांत मोठे असते. घर चौकोनी व भिंती बांबूच्या, कुडाच्या किंवा क्वचित मातीच्या असतात. ओवरी व दोन खोल्या एवढीच जागा असते. यांची भांडी मातीची असून उखळ, जाते, परड्या, तुंबे, मासे पकडण्याची जाळी वगैरे इतर वस्तू आढळतात.

  

गदाबांमध्ये मुलामुलींचे वयात आल्यानंतरच विवाह होतात. त्यांच्यात शयनगृहांची व्यवस्था असून या ठिकाणी नृत्यगायन तसेच कीर्तनेही चालतात. देजची पद्धत रूढ आहे, मात्र विवाह अत्यंत साध्या पद्धतीने होतो. लग्‍न वराच्या घरी होते. तिथे दोघांना जात्याच्या तळीवर बसवून हळदीच्या पाण्याने स्‍नान घालतात. नंतर पाणिग्रहण होऊन नृत्यगायनादी कार्यक्रम होतात. मध्यस्थाला दिसारी म्हणतात. तोच पुजारी असतो व लग्‍न लावतो.

  

यांच्या मुख्य देवता बुढी किंवा ठकुराणी माता आणि ईश्वर, भैरव, झंकर होत. झंकर हा भूदेव, पर्जन्यदेव व धान्याचा देव असतो. त्याला गाईचा व ईश्वराला म्हशीचा बळी देतात. ठकुराणी ही रोगदेवता आहे. भंडारीण ही त्यांची कृषिदेवता, तर धरणी ही आरोग्यदेवता आहे. चैत परब व पूस परब हे त्यांचे मुख्य सण असून ते दसरा, होळी इ. सणांच्या प्रसंगीही नृत्यगायनादींनी धमाल उडवितात. त्यांत बासरी-ढोलांची साथ असते. स्त्रीपुरुष मिश्र नृत्य करतात. यांना नाचण्यागाण्याची फार आवड आहे. हे लोक घोडा, गाढव व माकड यांव्यतिरिक्त इतर प्राण्यांचे मांस खातात.

मृत पुरुषांना ते जाळतात आणि स्त्रियांना व लहान मुलांना पुरतात. पुरताना प्रेताचे पाय पश्चिमेकडे ठेवतात. मृताच्या नावाने एक दगड उभा करतात. श्राद्धाला ते गोत्तार म्हणतात, ते मृत्यूनंतर दोनतीन वर्षांत केव्हातरी करतात. सुतक तीनपासून नऊ दिवसांपर्यंत पाळतात.

भागवत, दुर्गा