भुंजिया : भारतातील एक आदिवासी जमात. तिची वस्ती मुख्यत्वे ओरिसा, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत आढळते. १९७१ च्या शिरगणतीप्रमाणे त्यांची लोकसंख्या १४,२४५ होती. महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या घटत चालली आहे. त्यांच्या नावासंबंधी तसेच मूलस्थानाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. गोंड बैगा व हलबा यांच्या संकरातून ही जमात झाली असावी, असे तज्ञांचे मत आहे. त्यांच्यात चौखुटिया व चिंद अशा दोन शाखा असून चौखुटिया ही अनौरस शाखा म्हणून ओळखली जाते.

मोलमजुरी हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय असून भुंजिया काही प्रमाणात शेतीही करतात. बहुतेक भुंजिया हिंदीची बोलीभाषा छत्तीसगढी व तिची उपबोली बैगानी बोलतात.

भुंजिया पुरुष, मध्य प्रदेश.

मुले-मुली वयात आल्यानंतर त्यांचे विवाह होतात. विवाह एकाच कुळीत होत नाहीत. मुलगी वय़ात आल्यानंतर लग्‍नास योग्य वर मिळाला नाही तर ती प्रथम जमिनीत पुरलेल्या बाणाभोवती सात फेऱ्या मारते व ज्याचा तो बाण असेल, त्याच्याशी ती विवाहबद्ध होते. आते-मामे भावंडांतील विवाहास अग्रक्रम देण्यात येतो. चौखुटियामध्ये लग्‍नाची मागणी मुलाकडून महालिया आणि जंगालिया या दोन इसमांद्वारे करण्यात येते आणि लग्‍नविधी मुलाच्या घरी साजरा होतो. वधूमूल्य दिले जाते. एका पवित्र खांबाभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर लग्‍नविधी आटोपतो. हा सर्व विधी दीनवारी नावाचा जमातीतील पुजारी पार पाडतो. चिंद पोट जमातीत नवरी मुलगी नवऱ्याबरोबर काही दिवस राहतो आणि मग देवदेवतांचे नवस फेडण्यासाठी माहेरी जाते परंतु चौखुटिया नवरी लग्‍नानंतर माहेरी येत नाही आणि जर ती काही कामानिमित्त गेली, तर तिला स्वतंत्र झोपडीत ठेवतात. विधवाविवाह आणि घटस्फोट या बाबी समाजमान्य असल्या तरी पुरुष क्षुल्लक कारणावरून पत्‍नीस आपणहून टाकीत नाही. तिच्या चारित्र्याबद्दल फार गवगवा झाल्यास, तो निवासस्थान सोडून दुसऱ्या गावात जातो. त्यांच्यात पंचायतीसमोर वादंग आणण्याची प्रथा नाही. लग्‍नाआधी मुलीस मातृत्व प्राप्त झाल्यास, जमातीतून तिला बहिष्कृत करतात. रजस्वला आलेल्या स्त्रीला आठ दिवस वेगळ्या झोपडीत राहावे लागते.

भुंजिया जडप्राणवादी असून भुताखेतांवर त्यांचा विश्वास आहे. गोंडांचा बडा देव तसेच सूर्य, कासव, माता इत्यादींना ते भजतात. सूर्य ही त्यांची कर्जनिवारक देवता आहे तर माता ही पटकी व देवी या रोगांची निवारण करणारी देवता आहे. कासवाला त्यांच्या जमातीत विशेष स्थान आहे. दर तीन वर्षांनी चैत्र महिन्यात ते माता देवतेला बोकड बळी देतात व नारळ वाढवतात.

भुंजियांचा नेहमीचा आहार साधा असून ते मांस भक्षक आहेत. त्यांना डुकराचे मांस चालते पण गाय बैल, म्हैस, माकड यांचे मांस निषिद्ध आहे. अपरिचित व्यक्तीस भुंजिया झोपडीत घेत नाहीत. त्यांच्याकरिता गावात स्वतंत्र झोपडी असते. गोंड लोक यांना सामाजिक दृष्ट्या कमी प्रतीचे मानतात.

त्यांच्यात वैदू नाही आणि त्यांना औषधी मुळ्यांची माहितीही नाही. एखादा रोग वा जखम झाली असता, त्यावर सळी तापवून डाग देतात. याचा वापर वेगळ्या पद्धतीने डोकेदुखी, वात इ. अनेक व्याधींवर करतात.

मृत व्यक्तीबद्दलचे त्यांचे विधी गोंडसदृश आहेत. मृतास ते पुरतात. त्यांच्या चालीरीतींवर हिंदू धर्माची छाप आहे.

संदर्भ : 1. Gare, G. M. Aphale, M. B. Tribes of Maharashtra, Poona, 1982.

2. Russell, R. V. Hira Lal, Tribes and Castes of the Central Provinces of India. Vol. II, Delhi, 1976.

देशपांडे, सु. र.