होपी : उत्तर अमेरिकेच्या अतिपश्चिमेकडील इंडियन समूहातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य ॲरिझोना राज्यात आढळते. होपी केशरचनाकार स्त्री व युवतीमोकी किंवा मोक्वी या नावानेही त्यांचा उल्लेख होतो. त्यांची लोकसंख्या सु. १८,३२७ होती (२०१२). ते उटो-ॲझटेकन भाषा- कुटुंबातील शोशोनिअन किंवा होपी भाषा बोलतात. त्यांच्या मूल-स्थानाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि होपींमध्ये रूढ असलेल्या परंपरागत कथेनुसार त्यांचे पूर्वज भूमिगत गुहांतून बाहेर येऊन सांप्रतच्या भूप्रदेशात स्थायिक झाले. उत्तर ॲरिझोनाच्या ब्लॅक मेसा या सस.पासून १,८०० मी. उंचीवरच्या पठारावर त्यांची हॅनो, सिकोमोन्ही, वाल्ची, पोलॅक्को, शोंग्नोव्ही, शिपाऊलोव्ह, ओरैबी, होटेव्हिला, बाकाबी वगैरे खेडी वसली आहेत. 

 

होपींच्या पारंपरिक संस्कृतीत मातृप्रधान कुटुंबपद्धती व एकपत्नीत्वरूढ आहे. लग्नानंतर मुलगा घरजावई होऊन सासुरवाडीच्या कामधंद्यास हातभार लावतो. त्यांच्या सु. दोन डझन मातृसत्ताक कुळी असून त्याअनेक सामाजिक संकुलकांत एकत्र केलेल्या होत्या. प्रारंभी शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मका हे प्रमुख पीक होते तथापि स्पॅनिश वसाहतीनंतर शेतीबरोबरच ते फलोत्पादन व पशुपालनही करू लागले. पुरुष मुख्यत्वे शेती व बांधकाम व्यवसाय करतात. शिवाय कातडी कमावणे, पादत्राणे बनविणे, वस्त्रे विणणे, रजया तयार करणे वगैरे उद्योग करतात. निरनिरराळे समारंभ आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असतो. स्त्रिया पुरुषांना फलोद्यानाच्या कामात मदत करतात. शिवाय टोपल्या आणि मृत्पात्रे बनवितात मुलांची देखभाल करतात. सौंदर्यपूर्ण केशरचना करण्यात होपी स्त्रिया वाकबगार असतात. मुले-मुली वयाच्या सहाव्या वर्षापासून समारंभांतून सहभागी होतात आणि काचिना (कात्सिना) संप्रदायात त्यांची वर्णी लागते. काचिना ही अद्भुत अलौकिक शक्ती प्राणी, मानव, वृक्षवल्ली यांत असून सुफलतेचे कारणही हीच दैवी शक्ती होय, अशी होपींची समजूत आहे. समारंभाची मुख्य संघटना हा संप्रदाय असून काचिना ह्या अलौकिक विभूती आहेत. त्या पूर्वजांच्या चेतनाशक्तीशी संबद्ध असून त्यांच्यात पाऊस पाडण्याची तसेच होपींच्या सुखी जीवनाची शक्ती आहे, असे ते मानतात. गिधाड, घार यांसारखे पक्षी डुक्कर, शेळी-मेंढी यांसारखे प्राणी या स्वरूपांत काचिनांचे अनेक प्रकार आढळतात. शिवाय लांब दाढी किंवा वाममार्गी असेही त्यांच्यात भेद आहेत. काचिना ही त्या समाजाची अलौकिक शक्ती (सुपरनॅचरल पॉवर) असून ती जड व सचेतनातून व्यक्त होते. काचिना या उत्सव-समारंभातून होपी पुरुष वैचित्र्यपूर्ण मुखवटे व रंगीबेरंगी कपडे परिधान करून नृत्य करतात. यांतून काचिनांचे प्रतिनिधित्व कापसाच्या झाडाच्या मुळांपासून बनविलेल्या बाहुल्यांच्या रूपांत तसेच कोरीवकाम केलेल्या व रंगविलेल्या लाकडाच्या मूर्तिशिल्पांत आढळते. त्यांच्या धार्मिक कर्मकांडात सर्पनृत्य (स्नेकडान्स) याला अनन्यसाधारण महत्त्व असून ते दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संपन्न होते. त्या वेळी नृत्य करणारे (नर्तक) जिवंत साप तोंडात धरतात मात्र या नृत्याचा काही भाग सार्वजनिक असतो व उर्वरित नृत्य खासगीत असूनते दीर्घकाळ चालते. 

 

होपींचा यूरोपियनांशी प्रथम १५४० मध्ये संपर्क आला. पुढे यूरोपियनांनी त्यांच्यावर कॅथलिक मिशनद्वारे १६२९–४१ दरम्यान ख्रिस्ती धर्माची सक्ती केली. दरम्यान १६२० मध्ये न्यू मेक्सिकोमधील प्वेब्लोंनी बंड केले.त्या सुमारास होपी लोकांनी मिशनऱ्यांची हत्या केली आणि आपल्या वसाहतीतील मिशनची कार्यालये उद्ध्वस्त केली. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी १८६९ मध्ये स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत होपींशी संबंध प्रस्थापिले आणि १८८२ मध्ये सु. १०,००६ चौ.किमी. आरक्षित क्षेत्र त्यांच्यासाठी जाहीर केले. तेव्हापासून त्यांचा प्राकृतिक पृथग्वास हळूहळू संपुष्टात आला. 

 

विसाव्या शतकाच्या अखेरीस होपींची संस्कृती आणि सामाजिक स्थिती अमेरिकन संस्कृतीच्या सततच्या संबंध-संपर्काने लक्षणीय रीत्या बदलली आहे. त्यांच्या वसाहतीत आधुनिक उपकरणे प्रविष्ट झाली असून त्यांच्या-पैकी बहुसंख्य लोक इंग्रजीचा दुसरी भाषा म्हणून वापर करतात. हे मूलभूत बदल त्यांच्या जीवनमानात घडत असतानासुद्धा त्यांचे उत्सव, समारंभ आणि धार्मिक समजुती यांत फारसा फरक झालेला नाही. 

 

पहा : प्वेब्लो –१

 

संदर्भ : 1. Courlander, H. Fourth World of the Hopis, New Mexico, 1987.

            2. Wright, Margaret, Hopi Silver, Northland, 1982. 

भागवत, दुर्गा