फ्रेजर, जेम्सजॉर्ज : (१ जानेवारी १८५४-७ मे १९४१). प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ व अभिजात साहित्यिक. त्याचा जन्म सधन कुटुंबात ग्लासगो येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण ग्लासगो येथे घेऊन त्याने हेलिंझबर्ग (डंबार्टन) अकादमीत पुढील शिक्षण घेतले आणि १८६९ मध्ये ट्रिनिटी महाविद्यालयात (ग्लासगो) प्रवेश केला. तिथून १८७४ मध्ये तो पदवीधर झाला. काही वर्षे त्याने अधिछात्र म्हणून काम केले (१८७९). नंतर लिव्हरपूल विद्यापीठात एक वर्ष त्याने प्राध्यापकाची नोकरी केली. यानंतर निवृत्त होईपर्यंत तो केंब्रिज विद्यापीठात सामाजिक मानवशास्त्राचा प्राध्यापक होता.

 

जेम्स जॉर्ज फ्रेझरद गोल्डनबाऊ (दोन खंड-१८९०) हा जगातील जादूटोणा व धर्म यांविषयीचा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ. हा ग्रंथ विश्वकोशच आहे. जादू ही संस्था जगातील सर्व मानवी समाजांच्या प्रथमावस्थेत उत्पन्न झाली आणि विज्ञानयुगापर्यंत टिकली. धर्मसंस्था ही मानवी संस्कृतीची दुसरी नंतरची प्रगत अवस्था होय. ही आतापर्यंत जिवंत व समर्थपणे मानवी जीवनावर प्रभाव गाजवीत आहे. धर्मानंतर विज्ञान प्रभावी होऊ लागले विशेषतः सोळाव्या शतकापासून धर्मापेक्षा विज्ञान अधिक प्रभावी होऊ लागले. विज्ञानसंस्था ही धर्मसंस्थेपक्षा अधिक सामर्थ्यशाली झाली, असा हा संस्कृतीचा विकास त्याने ठरविला. अदृश्य अशा लहान मोठ्या शक्तींनी विश्व भरलेले असून नियंत्रण ठेवणारा मानवी प्रयत्न म्हणजे जादू होय. अदृश्य शक्ती मानवी नियंत्रणात येत नाहीत, हे मानवास शक्य नाही, हे ध्यानात आल्यानंतर धर्म म्हणजे त्या शक्तींची आराधना तो मनुष्य करू लागला. ही आराधना पद्धती अयशस्वी होते, हे ध्यानात येऊ लागल्यावर मनुष्याने विज्ञानपद्धतीने विज्ञान निर्माण करून त्या शक्तीवर तो नियंत्रण करू लागला. ही मानवी संस्कृतीची उच्चावस्था होय. विश्वशक्तीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न हे जादू व विज्ञान यांचे समान लक्षण होय. ही गोष्ट फ्रेझरने जगाच्या निदर्शनास आणली. पुढे हा ग्रंथ १९०७ ते १९१५ च्या दरम्यान बारा खंडांत प्रकाशित झाला व नंतर त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या. व्हिक्टोरियन अलंकृत गद्यशैलीने नटलेला हा ग्रंथ मानवशास्त्र व अभिजात इंग्रजी वाङ्‌मय यांतील एक उच्च कलाकृती मानण्यात येतो. जादू व धर्मविषयक कल्पना आणि चालीरीती यांचा सर्वसमावेशक ग्रंथ म्हणून त्यास जगन्मान्यता लाभली आहे.

 

जादू, धर्म व विज्ञान या क्रमाने मानवी संस्कृतीचा विकास झाला, असा फ्रेझर याचा सिद्धांत आहे. जादू म्हणजे विश्वातील दृश्य व अदृश्य शक्तींवर कर्मकांड व यंत्र-तंत्रद्वारे नियंत्रण ठेवण्याची कर्मपद्धती तसेच धर्म म्हणजे अदृश्य, दिव्य, अलौकिक शक्तींची आराधना करून त्यांचा अनुग्रह संपादन करण्याची मानसिक व बाह्य कर्मपद्धती. या व्याख्या फ्रेझरनंतरच्या मानवशास्त्रीय लिखाणात रूढ झाल्या आहेत. अनेक मानवी समाजांत राजकीय व धार्मिक सत्ता ही एका व्यक्तीच्या हातात असते. त्यामुळे समाजाचे व निसर्गाचे कल्याण हे राजाच्या दैवी शक्तीवर अवलंबून असते आणि ती शक्ती कमी पडल्यास राजास दूर सारण्यात येत असे, हे फ्रेझरने केलेले विश्लेषण यथायोग्य मानले गेले.

 

फ्रेझरच्या धर्मविषयक अध्ययनाने मानवशास्त्राच्या तौलानिक अभ्यासास सुरुवात झाली. त्याने आधुनिक व आदिम धर्मकल्पनांचा तौलनिक अभ्यास केला आणि ख्रिस्ती धर्माला इतर धर्मांच्या पंक्तीस आणून बसविले. त्यामुळे ख्रिस्ती धर्म हा सर्वश्रेष्ठ व पूर्णसत्य आहे, या ख्रिस्ती लोकांच्या श्रद्धेला त्याने मोठा धक्का दिला. त्याचा दुसरा एक महत्त्वाचा निष्कर्ष असा, की मानवसमाजास आवश्यक व हितकारक अशा चालीरीती, आचरणपद्धती व प्रेरणा यांना त्या त्या वेळच्या अनेक धर्मकल्पनांचा आधार असतो. त्या धर्मकल्पना भ्रामक ठरल्या तरी मानवसमाज त्यांना चिकटून बसतो त्याचे कारण त्या कल्पनांची वरीलप्रमाणे उपयुक्तता होय. कायदा, राज्यपद्धती, कुटुंबसंस्था इत्यादिकांना टिकवून धरण्याचे कार्य धर्मकल्पनांनी केलेले आहे, असे धर्मसंस्थेचे फ्रेझरने केलेले मूल्यमापनच मानवशास्त्राच्या धर्मविषयक संशोधनाच्या वाढीस उपकारक ठरले. हे त्याने दाखविल्याने आदिम धर्मकल्पना निरर्थक व व्यर्थ असतात, हे पूर्वग्रह दूर होण्यास निश्चितपणे मदत झाली.

 

फ्रेझरने ज्या ज्या आदिम समाजांतील उदाहरणे दिली आहेत, त्यांपैकी एकाही जमातीत तो स्वतः गेला नाही परंतु १९०७ मध्ये माहिती गोळा करण्यासाठी त्याने मिशनरी व ब्रिटिश वसाहतींतील प्रशासकांस एक प्रश्नावली पाठविली होती. त्याचा त्यांच्याशी विस्तृत पत्रव्यवहारही होता. त्याचा त्याने साक्षेपी उपयोग आपल्या पुढील लेखनात केला. गोल्डनबाऊ व्यतिरिक्त त्याने टॉटेमिझमअँडएक्झॉगमी(१९१०), फोकलोअरइएओल्डटेस्टामेन्ट (१९२३), मॅन, गॉडअँडइमॉर्‌टॅलिटी (१९२७), हे ग्रंथ लिहिले. ह्यापैकी पहिला ग्रंथ त्याच्या टॉटेमिझम (१८८७) या ग्रंथाचीच सुधारित आवृत्ती होती. त्याचे ‘मानवी प्रगती’ या विषयावंरील लेखन एकत्र प्रसिद्ध झाले आहे.

 

रड्यर्ड किपलिगं, ॲल्फ्रेड टेनिसन, टॉमस स्टर्न्झ एलियट, डी. एच्. लॉरेन्स इ. मान्यवर ब्रिटिश साहित्यिकांनी त्याच्या लेखनाची दखल घेतली आहे. फ्रेझरबद्दल ग्रेट ब्रिटनमध्ये सर्व थरातील लोकांत अतिशय आदर होता. त्याने मानवशास्त्राची जनमानसात प्रतिष्ठा वाढविली. १९०५ मध्ये मानवशास्त्रीय वाङ्‌मयात भरीव कांर्य केल्याबद्दल त्याला २०० पौंड वार्षिक निवृत्तिवेतन जाहीर करण्यात आले. त्याच्या कार्याबद्दल सर हा बहुमानदर्शक किताब त्यास देण्यात आला.(१९१४).

 

अखेरपर्यंत त्याचे लेखन-वाचन चालू होते. त्याने मांडलेले काही सिद्धांत कालबाह्य झाले वा आधुनिक संशोधनाने दूर फेकले गेले तरी त्याच्या गोल्डनबाऊ या एकमेव ग्रंथाने मिळविलेली किर्ती चिरंतन राहील, यात संदेह नाही. तो केंब्रिज येथे मरण पावला.

 

संदर्भ: Downie, R. A. Frazer and the Golden Bough, New York 1970.

 

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री मुटाटकर, रा. के.