बगांडा : पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात राहणारी एक आदिवासी जमात. ही जमात गांडा व बगांडा या नावांनीही ओळखली जाते. गांडा या शब्दाला वेगवेगळे उपसर्ग लावून वेगवेगळ्या अर्थाचे शब्द तयार होतात. उदा., बगांडा म्हणजे आदिवासी जमातीचे नाव मुगांडा म्हणजे त्या जमातीतील व्यक्तीनाम, बुगांडा म्हणजे त्यांचे राज्य व हे लोक राहतात तो प्रदेश आणि लुगांडा म्हणजे त्या जमातीची भाषा. ही बांतू भाषासमूहातील नायजर-काँगो भाषाकुटुंबातील आहे. युगांडातील व्हिक्टोरिया सरोवराच्या नैर्ऋत्येकडील पठारावर कांपाला शहराजवळ मुख्यत्वे त्यांची वस्ती आढळते. लोकसंख्या सु. दहा लाख (१९७१). बगांडात अनेक निग्रो गटांचा संकर झाला आहे. मूळचे हे लोक नेग्रॉइट असून कृष्णवर्ण, काळे कुरळे केस, चपटे नाक, जाड ओठ व साधारण उंची ही त्यांची  काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. यांचे मुख्य अन्न केळी असून सुरण, बटाटा, घेवडा, चवळी यांचाही आहारात समावेश असतो. शेती हा यांचा प्रमुख धंदा असून बहुतेक बगांडा शेती करतात. कापूस व कॉफी ही त्यांची नगदी पिके असून कापसाचा व्यापारही ते मोठ्या प्रमाणावर करतात. पशुपालन हाही त्यांचा एक महत्त्वाचा व्यवसाय असून यांशिवाय परंपरेने चाललेल्या गवंडी कामात ते वाकबगार आहेत. टोपल्या व सालींचे कपडे विणणे, मातीची भांडी तयार करणे हेही व्यवसाय ते करतात. बगांडांत बहिर्विवाही कुळे व वंशावळी असून त्यांचे कुटुंब पितृसत्ताक असते. मुलाकडे वारसाहक्क जातो. मुले-मुली वयात आल्यानंतर त्यांचे विवाह होतात. विवाहानंतर वधू-वर नातेवाईकांपासून दूर राहतात. त्याच्यांत ओमाहा पध्दतीची गणगोत पध्दती आढळते. वधूमूल्याची प्रथा असून ते न दिल्यास वरास भावी सासऱ्याच्या घरी सेवा करावी लागते. आते-मामे भावंडांतील विवाहास प्राधान्य दिले जाते. बहुपत्नीत्वाची चाल रूढ आहे. कुळीचे प्रमुख वंशपरंपरेने जमातीच्या शासनात सहभागी होतात.

बगांडांचे बुगांडा हे अठराव्या शतकात स्वतंत्र राज्य होते. या राज्याच्या अधिपत्याखाली बुन्योरोचे राज्य व दक्षिणेकडील बुड्डू व कोकी हे प्रदेश होते. विशेषतः स्यूना आणि मुटेसा या राजानी (कबाक) या राज्याचा विस्तार केला. कबाकाला परंपरेनुसार मोठी सत्ता असते. राज्याचे अधिकारानुसार विविध विभाग आहेत. कबाक वंशपंरपरेने निवडला जातो. प्रत्येक कुळाचा कबाकाशी विशिष्ट कर्तव्यांनी संबंध जोडलेला असे. त्यांच्या कारर्कीदीत (१८३२-१८८४) आसपासच्या प्रदेशांवर यूरोपीय लोकांची आक्रमणे झाली. त्या काळी हस्तिदंत गुरे, अन्नधान्ये आणि गुलाम यांच्या बदल्यात शस्त्रास्त्रे घेतली जात. पहिल्या मुटेसाने एकछत्री अमल सुरू करून धर्मगुरूंचा प्रभाव कमी केला. विविध कुळींच्या मालकीची जमीन राज्याच्या अखत्यारीत आणली आणि विविध भागांवर कुळीचे प्रमुख नेमले. आधुनिक प्रशिक्षण दिलेले सैन्य आणि कार्यक्षम प्रशासनासाठी सक्षम नोकरशाही तयार केली. मुटेसाच्या मृत्यूनंतर (१८८४) कॅथलिक व मुस्लिम गटांची राजकीय सत्तास्पर्धा सुरू झाली. या अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी तेथे सत्ता स्थापन केली. व या राज्यास संरक्षित राज्याचा दर्जा दिला. त्यानंतर १९६२ मध्ये युगांडा स्वतंत्र झाल्यानंतर बुगांडास स्वायत्त प्रांताचा दर्जा प्राप्त झाला.

मातीच्या चौकोनी घरात ते राहत असत. घराला खिडक्या असत. मोठ्या मुलांसाठी स्वतंत्र खोल्या असत. तीसचाळीस घरांचे एक गाव होई. पारंपारिक न्यायालयात शिक्षा देण्यात येई. खुनाकरिता देहान्त किंवा शरीराचा एखादा अवयव तोडणे, अशा शिक्षा प्रचलित होत्या. याशिवाय किरकोळ गुन्ह्यांसाठी दंड भरावा लागे.

मिशनऱ्यांचा प्रवेश होण्यापूर्वी बगांडांचा धर्म कुटुंब, कूळ आणि राजा यांच्याशी निगडित होता. प्रत्येक कुटुंबाचा स्वतंत्र देव असे. हे लोक जडप्राणवादी असून त्यांच्यात निसर्गपूजा व पूर्वजपूजा रूढ होती. भूत-पिशाच्च व  जादूटोणा यांवरही त्यांचा विश्वास आहे. त्यांच्यात सु. सत्तर देव-देवता आढळतात. त्यांपैकी प्रमुख देवता मुकासा व काझोबा (सूर्य देवता) या होत. यांशिवाय मुसिसी (भूकंपाचा देव) आणि नागवोन्यी या देवता अनुक्रमे शांती व संततीसाठी पूजिल्या जात. कुल-सभासदांना त्यांच्या संपत्तिस्थानातच पुरतात. पूर्वजांची चित्शक्ती संपत्तीचे रक्षण करते, अशी समजूत रूढ होती. पूर्वी शत्रूला जखमी करण्यासाठी आणि चोरांना शोधण्यासाठी जादूटोण्याचा वापर करीत. आधुनिक काळात बहुसंख्य बगांडा ख्रिस्ती व इस्लाम या दोन धर्मांत विभागले गेले आहेत. यूरोपीय व अरब व्यापाऱ्यांशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या संस्कृतीवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आणि आधुनिकतेकडे हे लोक हळूहळू वळू लागले.

संदर्भ : 1. Fallers, M.C. The Eastern Lacustrine Bantu, London, 1960.

          2. Gibbs, J.L. (Jr.) Ed. People of Africa, New York, 1965.  

परळीकर, नरेश