थोंगा : बांटू भाषा बोलणारा द. आफ्रिकेतील एक वैशिष्ट्यपूर्ण जमातसमूह वा गट. याची वस्ती पोर्तुगीज आग्‍नेय आफ्रिकेत मोझँबीकच्या द. किनाऱ्यावर व त्याच्या आसपासच्या प्रदेशांत आढळते. या समूहाची लोकसंख्या १३,६९,००० (१९६०) होती. या समूहातील प्रत्येक जमात स्वतंत्र असून प्रत्येक जमातीचा पूर्वी राजा असे व त्याच्या मंत्रिमंडळातर्फे सर्व जमातींचे तंटेबखेडे व इतर व्यवहार चालत. प्रथम थोंगा ही स्वतंत्र जमातही होती पण हे नाव नंतर या समूहाला मिळाले. यांतील प्रत्येक जमात विखुरलेल्या कुळींच्या समूहांत असते. एकोणिसाव्या शतकात थोंगा पोर्तुगीज सत्तेच्या आधिपत्याखाली आले आणि त्यांचे राजकीय स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले.

थोंगा मुख्यतः शेती करतात आणि ज्वारी, मका इ. पिके काढतात. बहुतेक शेती स्त्रियाच करतात. पशुपालन हा व्यवसाय त्यांच्यात अलीकडे अधिक लोकप्रिय व रूढ झाला आहे. काही थोंगा शिकार आणि अन्नसंकलन यांवर उपजीविका करतात. ते एकमेकांपासून दूरवर बांधलेल्या झोपड्यांमधून राहतात. झोपडीला क्राल म्हणतात. यांच्यात बहिर्विवाही कुळी असून पितृवांशिक कुटुंबपद्धती प्रचलित आहे पण मामाला आपल्या भाच्यासाठी अनेक वेळा त्याग करावा लागतो. विवाहात वधूमूल्य देण्याची प्रथा असून वधूमूल्य रोख रक्कम किंवा जनावरांच्या रूपात देण्यात येते. मूल होण्यापूर्वी जर पत्‍नी निवर्तली, तर तिच्या नवऱ्याला सासऱ्याकडून वधूमूल्याची रक्कम परत मागण्याचा कायदेशीर हक्क असतो. यात मेहुणा–कनिष्ठ मेहुणी विवाहाची प्रथा आहे. याशिवाय भाची आणि मामी यांमधील सलगीचे संबंध विशेष प्रसिद्ध आहेत. बहुपत्‍नीत्व रूढ आहे पण घटस्फोट क्वचित आढळतो.

थोंगांचा मूळचा धर्म विविध कर्मकांडांचा असून त्यांच्यात पितृपूजेला विशेष महत्त्व आहे. अलीकडे बऱ्याच थोंगांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. ताबू मोडला असता रोगराई, आजार वा अन्य संकटे येतात, अशी त्यांची समजूत आहे.

संदर्भ: Junod, H. A. The Life of a South African Tribe, 2 Vols., New York, 1962.

देशपांडे, सु. र.