हेरिंग, एव्हाल्ट : (५ ऑगस्ट १८३४–२६ जानेवारी १९१८). जर्मनीमधील एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ. त्यांचे पूर्ण नाव कार्ल एव्हाल्ट हेरिंगएव्हाल्ट कॉन्स्टंटाइन हेरिंग. रंगाबद्दलची मुख्यत्वे संवेदना आणि शरीरक्रियात्मक दृष्टिविषयक प्रकाश शास्त्र यांवर त्यांनी संशोधन केले. 

 

हेरिंग यांचा जन्म सुशिक्षित उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात अल्जेर्सडॉर्फ (सॅक्सनी) या गावी झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेतले. त्यांचे चुलते कॉन्स्टंटाइन हे होमिओपॅथीचे डॉक्टर होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी लाइपसिक विद्यापीठात प्रवेश घेतला (१८५३) आणि एम्.डी. ही वैद्यकशास्त्रातील पदवी मिळविली (१८५८). त्यानंतर काही वर्षे खासगी वैद्यकीय व्यवसाय केला आणि नंतर लाइपसिक विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केले (१८६२–६५). पुढे व्हिएन्नामधील (ऑस्ट्रिया) ते जोसेफ्स ॲकॅडेमीत शरीरशास्त्र व वैद्यक-पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक झाले (१८६५–७०). त्यानंतर त्यांच्या शरीरक्रियाविज्ञानातील मौलिक संशोधनाचा विचार करून त्यांना प्राग (चेकोस्लोव्हाकिया) विद्यापीठाने निमंत्रित केले. तिथे त्यांनी शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापकम्हणून १८७०–९५ दरम्यान अध्यापन केले. त्यानंतर ते लाइपसिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून पुन्हा आले (१८९५) व अखेरपर्यंत तिथे अध्यापनात व्यस्त होते. वृद्धापकाळाने त्यांचे लाइपसिक येथे निधनझाले. मृत्यूपूर्वी त्यांना जर्मन ऑप्यल्मोलॉजिकल सोसायटीचे ग्रेफ मेडल देण्यात आले (१९०६). 

 

हेर्मान हेल्महोल्ट्सच्या रंग दृष्टिवेदन व श्रवणवेदन या सिद्धान्तास हेरिंग यांनी आव्हान दिले. त्यांनी प्रामुख्याने शरीरक्रियाविज्ञानाच्या संशोधनात जीवन व्यतीत केले असले, तरी अवकाश संवेदन आणि रंगदृष्टी (कलर-व्हिजन) याविषयीची त्यांची प्रायोगिक व सैद्धांतिक मांडणी यांचा प्रायोगिक मानसशास्त्रावर फार मोठा प्रभाव जाणवतो. त्यांनी असे गृहीत धरले की, केवळ तीन मूळ डोळ्याच्या पडद्यातील रंगग्राहक द्रव्ये जी असतात, ती तीन रंगीत जोड्यांच्या संवेदनांचे उद्दीपन करतात आणि रंगाबाबतची दृश्य संवेदना ही प्रामुख्याने परस्परविरोधी रंगावर आधारलेली असते. हे तत्त्व मान्य करून त्यांनी रंगाच्या गुण-धर्मावर भर दिला. तांबडा-हिरवा पिवळा-निळा आणि पांढरा-काळा अशा परस्परविरोधी रंगांच्या तीन जोड्या म्हणजे मूळ सहा रंग होत. यांपैकी कोणताही एक रंग नेत्रपटलावर (रेटिना) आला की, त्याच्या विरोधातील रंगही मानव चटकन ओळखू शकतो, असे गृहीततत्त्व त्यांनी मांडले. या त्यांच्या उपपत्तीस ‘थ्री सबस्टन्स, सिक्स-कलर थिअरी’ हे नाव देण्यात आले. हेरिंग यांची तापमान-जाणीव ही कल्पना-सुद्धा त्यांच्या रंगदृष्टी उपपत्तीशी साधर्म्य दर्शविते. त्यांनी थंडी व उबदारपणा यांकरिता एक ग्राहक (रिसेप्टर) निर्दिष्ट केला असून त्यास ते प्रतिस्पर्धी वेदन (सेन्सेशन) ही संज्ञा देतात. 

 

यांशिवाय त्यांनी अनेक प्रायोगिक प्रक्रियांचा उपयोग प्रयोगशाळेतील उपकरणांद्वारे रंग प्रमाणबद्धता आजमावण्यासाठी तसेच रंगदृष्टी यांच्या चाचण्यांसाठी केला. त्यांचे रंगीतपट, करडी मापनपट्टी, दृष्टिभ्रम ( ऑप्टिकल इल्युजन), रंग मिश्रण उपकरण आणि रंगांधत्व परीक्षित्र या गोष्टी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी श्वसनाचे अन्वेषण केले आणिप्राणेशा तंत्रिकेची (व्हॅगस नर्व्ह) श्वसन स्वनियमनातील भूमिका निर्देशित केली. 

 

हेरिंग यांनी मुख्यत्वे जर्मन भाषेत आपले संशोधनात्मक लेखन प्रकाशित केले. त्यांच्या काही ग्रंथांचे इंग्रजीत अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांपैकी ‘काँट्रिब्यूटर्स टू फिलॉसॉफी : रेटिनल व्हिज्युअल स्पेस पर्सेप्शन’ (१८६१–६४, इं. शी.), ‘मेमरी ॲज अ फंक्शन ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ मॅटर’ (१८६८, इं. शी.), द व्हिज्युअल सेन्स (१८६८, इं. भा.), ‘हॅण्डबुक डेर फिझिओलॉजिश्चेन ऑप्टिक’ (१८९६, इं. शी.) वगैरे मान्यवर व महत्त्वाचे होत. 

 

हेरिंग यांचे शरीरक्रियाविज्ञानातील प्रायोगिक संशोधन आणि स्मृती व ज्ञानार्जन हे सकोशिक शरीरशास्त्रातील रूपांतरित पायावर उभे आहेत, हा त्यांचा दृष्टिकोन त्यांना अनेक थोर अनुभववादी विचारवंतांच्या मालिकेत स्थान देतो. 

 

संदर्भ : Hurvich, L. M. Hering and the Scientific Establishment, 1969. 

नाईक, भरत