हलबा : भारतातील एक आदिम जमात. हल म्हणजे नांगर. या नावावरून हे नाव रूढ झाले असावे, असे हिरालाल व रसेल हे मानवशास्त्रज्ञ म्हणतात. मुख्यत्वे त्यांची वस्ती मध्य प्रदेश राज्यातील बस्तर जिल्ह्यात असून छत्तीसगढ, ओडिशा व महाराष्ट्र या राज्यांतही ते काही प्रमाणात आढळतात. तिथे त्यांना हलबी म्हणतात. त्यांची लोकसंख्या ६,३९,०९४ होती (२००१). बस्तरमधील हलबा हे आंध्र प्रदेशातील वरंगळमधून आलेले आप्रवासी होत. बस्तरमधील हलबा छत्तीसगढिया आणि बस्तरिया अशा दोन वर्गांत विभागलेले आहेत. बस्तरिया हलबांचे आणखी दोन वर्गसमूह आहेत. त्यांची अनुक्रमे पुरीत (शुद्ध) व सुरीत (मिश्र रक्ताचे) अशी नावे आहेत. ते इंडो-आर्यन भाषासमूहातीलहळबी बोली बोलतात तर काही तुरळक लोक भात्री, छत्तीसगढीय, ओडिया आणि हिंदी भाषेत संभाषण करतात. त्यांची लिपी देवनागरी आहे. रुंद कपाळ, गोल डोके, बुटकी शरीरयष्टी, पसरट नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये आहेत.

 

हलबांचे मुख्य अन्न भात असून कांजी (पेज) सुद्धा त्यांना आवडते. तसेच ते मांसाहारी आहेत. रानटी डुक्कर, शेळ्या-मेंढ्या व कोंबड्या यांचे मांस ते खातात पण गुरांचे मांस खात नाहीत. ते स्थानिक भट्टीत गाळलेली दारू नियमित पितात.

 

भार्तिया, किल्किलिया, नाग, बाघेल, काचीम व नेताम (डुक्कर) या बहिर्विवाही कुळींत हलबा विभागले गेले असून त्यांच्यात एकपत्नी विवाह- पद्धती रूढ आहे तथापि बहुपत्नीकत्वही क्वचित आढळते. आतेमामे भावंडांतील विवाहास जमातीत प्राधान्य दिले जाते. कनिष्ठ मेहुणीविवाह आणि कनिष्ठ देवरविवाह यांना जमातीत मान्यता आहे. पूर्वी त्यांच्यात बालविवाहपद्धती होती परंतु आता वयात आलेल्या मुला-मुलींची लग्ने होतात. लग्न शक्यतो वाटाघाटीद्वारे ठरविले जाते तथापि अंतः- क्रमण-घुसखोरी (पिसामुंडी) आणि सेवाविवाह (घरजावई) हे प्रकारही रूढ आहेत. वधूमूल्य सक्तीचे असून घटस्फोटास अनुमती आहे. बुरखा आणि कंकणे ही विवाहित मुलीची लक्षणे होत. विवाहित मुलगी सासरच्या संयुक्त कुटुंबात राहते. वडिलोपार्जित संपत्ती सर्व मुलांत विभागली जाते मात्र ज्येष्ठ मुलास मोठा वाटा मिळतो. त्यांच्या स्त्रिया घरकाम, शेतावरील मजुरी करतात पण नांगरणी पुरुषच करतात. नवजात मुलाचे नामकरण (छाटी विधी) व मुंडण यांस धार्मिक महत्त्व आहे. ते मृताला पुरतात आणि शुद्धीकरणाचा धार्मिक विधी (तीझनहानी आणि नहानी) करतात.

 

हलबांचा मुख्य व्यवसाय शेती असून ते मजुरीही करतात. यांशिवाय खाणकाम व जंगलात कंदमुळे, मध, औषधी वनस्पती गोळा करण्यात त्यांपैकी काहीजण गुंतलेले आढळतात. त्यांची मुले श्रीमंतांकडे घरगुती नोकर म्हणून काम करतात. साक्षरतेच्या प्रसारामुळे जमातीतील बहुतेक मुले-मुली शिकू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये औपचारिक शिक्षणाचा प्रसार-प्रचार झाला असून काही उच्च पदवीधारकही आहेत. काहीजण शिक्षक व कारकून म्हणून शासनात नोकरी करतात. मुली मात्र साधारणतः लग्नानंतर शाळा सोडतात. खेड्यातील तंटे-बखेडे एक वा दोन ज्येष्ठ नागरिक सोडवतात. त्यांना सियान म्हणतात, तर प्रादेशिक तंटे निकालात काढणाऱ्यांना नाईक म्हणतात. गंभीर गुन्ह्याला रोख रकमेचा दंड ठोठावला जातो मात्र किरकोळ गुन्हा दंडात्मक मेजवानी दिल्यानंतर संपुष्टात येतो. हलबा हे हिंदू धर्मीय असून त्यांची मुख्य देवता दंतेश्वरी आहे. याशिवाय ते मावली व महामाई या कुलदेवतांना भजतात. शिवाय प्रत्येक खेड्याच्या काही स्वतंत्र देवता आहेत. ते नायखाना, अमूस, हर्याळी, पितृ सरद, दिवाळी, होळी, दसरा वगैरे सण साजरे करतात. त्या प्रसंगी तसेच लग्नविधीच्या वेळी लोकगीते म्हणतात.

 

हलबी हे हलबांप्रमाणेच महाराष्ट्रात आदिवासी जमातींमध्ये गणले जातात. त्यांची वस्ती प्रामुख्याने विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती ह्या जिल्ह्यांत आढळते. त्यांपैकी बहुसंख्य लोक शहरांतून वस्ती करून राहतात. ते स्वतःस महाभारता त उल्लेखिलेल्या बलरामाचे वंशज मानतात. हालबारू (प्राचीन) या कन्नड शब्दापासून हलबी हे अपभ्रष्ट रूप बनले असावे, असे काही तज्ज्ञ म्हणतात. एके काळी ते मार्शल आर्टमध्ये निष्णात होते. महाराष्ट्रात त्यांचे मराठिया, छत्तीसगढिया व बस्तरिया असे तीन स्वतंत्र समूह आहेत. हे मूलतः अंतर्विवाही असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. शिवाय ते शेतमजूर, घरकामगार व औद्योगिक क्षेत्रात कामगार म्हणूनही कार्यरत आहेत. या भागांतील हलबी घरी इंडो-आर्यन भाषा कुटुंबातील मराठी बोलतात पण बाहेर समाजात हिंदीत किंवा छत्तीसगढीत संभाषण करतात. या भाषांची लिपी देवनागरी आहे. ते हिंदू धर्मीय असूनही जडप्राणवादी आहेत. त्यांची मुख्य देवता खूटदेव असून ते नारायण, दुर्गा, कलसूर, काली, धुकू, बोमलाई, गुरुदेव, कामकली, चिंतासोरी, आकीमाता वगैरे देवदेवतांना भजतात. औपचारिक शिक्षणाकडे त्यांच्या मुलांचा कल असून त्यांच्यात ५३.५२% साक्षरता आढळते. त्यामुळे परंपरागत औषधपाण्याबरोबरच ते रुग्णालयांच्या सोयीसुविधांचा फायदा घेतात. शहरीकरण व शिक्षणामुळे त्यांच्यात कुटुंबनियोजनाचे महत्त्व अबाधित राहिले आहे.

 

हलबाच्या उच्चारातील फरकांमुळे होळवा, हल्वा व हलबी असे नामनिर्देश ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यात आढळतात. त्यांच्यात साहू , सुरेइत (सुरीत) व रक्षित असे तीन अंतर्विवाही गट असून त्यांची मातृभाषा हलबी आहे परंतु ते ओडिया भाषा व लिपी यांचा बाहेरील लोकांशी संवाद साधण्यासाठी व लेखन यांसाठी वापर करतात. होळवा या नावाखाली त्यांची आदिम जमात म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या कोचीम, नाग, बाग, होनू , गोरियापक्षी आणि भारद्वाजपक्षी नावाच्या बहिर्विवाही कुळी आहेत. वाटाघाटीद्वारे ठरविलेले लग्न हे प्रतिष्ठेचे मानले जाते. याशिवाय क्वचित पळवून नेऊन किंवा सेवाविवाह हेही प्रकार त्यांच्यात आढळतात. विवाहित मुली बुरखा धारण करतात. घटस्फोट व पुनर्विवाहास जमातीत संमती आहे. विधुर धाकट्या मेहुणीशी आणि विधवा लहान दिराशी लग्न करू शकते. त्यांच्या स्त्रिया पुरुषांना शेतात, मत्स्योद्योगात व पशुपालन व्यवसायात सर्वतोपरी सहकार्य करतात. गरोदर व बाळंतीण झालेल्या स्त्रिया सौम्य आहार घेतात. रजःस्रावाच्या काळात मुली सात दिवस विटाळ पाळतात. ऋतुचक्राच्या प्रारंभास कन्यावोला किंवा सेयनहोलांड म्हणतात. मृतांना ते जाळतात. त्यांच्या हिंदू धर्मावर जमातीच्या पारंपरिक जडप्राणवादाचा प्रभाव दिसून येतो. जादूटोण्यावर त्यांचा विश्वास असून दबारीनामक पुजारी जीवनचक्राची कर्मकांडे करून दुष्टचक्रापासून आपल्या जमातीचे संरक्षण करतात, अशी त्यांची धारणा आहे. त्यांचे महत्त्वाचे सण म्हणजे चोईतपरोव, चितलगी अमावास्या आणि धनोनुअखिया हे होत. त्यांच्या मुलांचा कल औपचारिक शिक्षणाकडे असून साक्षरतेचे प्रमाण २५.३२ टक्क्यांवरून पुढे वाढत आहे.

 

हलबा नागवंशी हा हलबांचा आणखी एक गट असून ते स्वतःला नागवंशी राजघराण्याचे वंशज मानतात. सापाला ते पूर्वज मानतात. नागवंशी घराण्याचे हलबा लोकांबरोबर वैवाहिक संबंध असल्यामुळे त्यांच्या वंशजांना ते नागवंशी हलबा असे संबोधतात. बस्तरच्या दंतेवाडा आणि नारायणपूर तालुक्यांत त्यांचे प्रमाण अधिक आहे. नेगी आणि तलेंगा नाग या त्यांच्या दोन मुख्य शाखा असून त्यांचे पुरोहित आणि सुरेइत असे आणखी प्रकार आहेत. पुरोहित हे शुद्ध, तर सुरेइत हे दुय्यम मानले जातात. यांच्यात कुलचिन्ह पद्धती आहे. वेगवेगळे बहिर्विवाही कुलचिन्हगट अस्तित्वात आहेत. प्रांतवार विविधता असली, तरी सर्व हलबांमध्ये काही सांस्कृतिक समान पैलू आढळतात.

 

कुलकर्णी, शौनक