स्वांगला : हिमाचल प्रदेशातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातील लाहूल-स्पिती जिल्ह्यात आढळते. त्यांच्या मूलस्थानाविषयी भिन्न मते असून के. एल्. नेगी या मानवशास्त्रज्ञाच्या मते ते चंबातील आप्रवासी होत. त्यांची मुंडा भाषासमूहातील मंचाट किंवा मंचाड ही बोलीभाषा असली, तरी इतरांशी ते हिंदी भाषेत संभाषण करतात.

स्वांगला ही जातिपद संज्ञा असून त्यांची सामाजिक रचना उच्चवर्णीय ब्राह्मण, सत्ताधारी वर्ग-राणा आणि शेती करणारे राजपूत अशी आहे. बहुतेक स्वांगला मांसाहारी असून घरी गाळलेली चंग नावाची दारू पितात व विडी ओढतात. त्यांच्यात आंतर्विवाही पद्धत असली, तरी अनुलोम विवाह प्रचलित आहेत. बोध ज्ञातीतील मुलामुलींशी त्यांचे रोटी-बेटी व्यवहार होतात. शिवाय त्यांच्यात कनिष्ठ मेहुणी व देवर विवाह प्रचलित आहे. पूर्वी वधूमूल्याची ( चेडी ) चाल होतीती आता हुंड्यात दिली जाते. जमातीत घटस्फोटास मान्यता असून घटस्फोटानंतर मुले मात्र पित्याकडेच राहतात. नवअर्भकाच्या जन्मानंतर वीस दिवस जननशौच पाळतात एका वर्षानंतर जावळ काढतात. मुलींचा यौवनसंस्कार ( ऋतुप्राप्ती ) साजरा करतात. ते हिंदू धर्मीय असून त्यांची प्रमुख देवता हिरमा’ आहे. त्रिलोकनाथ या देवाची मोठी जत्रा भरते. शिवाय ते पितरांना पूजतात. अलीकडे काहींनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

शेती हा स्वांगलांचा प्रमुख व्यवसाय असून त्यांपैकी अनेक मोल-मजुरीही करतात. स्त्रिया कृषिव्यवसायात पुरुषांना मदत करतात. काही स्वांगला मासेमारीही करतात. स्वांगला लोकांपर्यंत शिक्षणाच्या सवलती पोहोचल्यामुळे साक्षरतेचे प्रमाण—विशेषतः पुरुषांत—५० टयांपेक्षा अधिक आहे. शेजाऱ्यांशी असलेल्या सहभोजी संबंधांमुळे त्यांच्यात आर्थिक प्रगती होत आहे.

स्वांगला मृताला जाळतात. दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करून नदीत विसर्जित करतात. तेराव्या दिवशी हवन करतात.

संदर्भ : 1. Negi, T. S. Scheduled Tribes of Himachal Pradesh : A Profile, Meerat, 1976.

2. Singh, K. S. The Scheduled Tribes, Delhi, 1994.

गुडेकर, विजया म.