वाघरी : भारतातील एक अनुसूचित जमात. ती प्रामुख्याने गुजरात राज्यात कच्छ, अहमदाबाद, व खेडा या जिल्ह्यांत आढळते. काही वाघरी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात दिसून येतात. त्यांची लोकसंख्या गुजरात राज्यात ४,३२७ (१९६१) होती. ते मोहाची फुले गोळा करणे, कुक्कुटपालन, भाजीपाल्याची शेती, शिकार व शेतमजुरी इ. अनेक व्यवसाय करतात. जोगी व ज्योतिषी बनून ते चोऱ्या करतात, असा त्यांचा पूर्वी दुर्लौकिक होता.  

‘वाघरी’ या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी विद्वानांत मतैक्य नाही. वागुर म्हणजे जाळे किंवा पाश. त्यावरून हे नाव पडले असावे, असा एक मतप्रवाह आहे. राजस्थानातील ओसाड भागातील टेकड्यांना ‘वागह’ म्हणतात. त्या भागातून आलेले ते वाघरी, तर या जमातीतील भगत-भुवा यांच्या मते वाघासारखे म्हणून वाघरी हे नाव मिळाले असावे. राजस्थान, पंजाब या भागांत  भागांत संसी ही लुटारू जमात होती. तीपासून ही जमात पुढे आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसी हे स्वतःला राजपूत समजतात परंतु समाजाच्या वर्गरचनेत त्यांना खूपच खालचे स्थान मिळालेले दिसते. वाघरी हे धेड लोकांहून उच्च पण कोळी लोकांपेक्षा कनिष्ठ आहेत असे परंपरा मानते. 

संसमल्ल हा त्यांचा मूळ पुरुष. त्याच्यापासून बाग्री, बुधुक, गिडिया, हबुरिया, कीचक, कुंजर, मोघिया इ. शाखा अस्तित्वात आल्या. त्यांची कुलनामे स्थानपरत्वे बदललेली दिसून येतात. मूळ जमातीची संख्या वाढताच उपजीविकेसाठी त्यांचे स्थलांतर होऊ लागले आणि टोळ्यांचा विभाजनातून त्यांना प्रदेशपरत्वे भिन्न नावे मिळाली. उदा., मारवाडमध्ये राहणाऱ्यांना ‘बागोरा’ व ‘बागरी’ हे नाव मिळाले. 

वाघरी हे नाव आणि भटक्या जमातीसारखी त्यांची राहणी, यांवरून जाट लोकांच्या जमातींपैकी त्यांचा वंश संबंधित असावा. त्याचप्रमाणे सिथियन लोकांशीही त्यांची वांशिक जवळीक असावी. सिथियामधून आलेल्या त्यांच्या राजांचा हिंदू राजांकडून पराभव झाल्यानंतर येथील भिल्ल, कोळी आणि तत्सम आदिम जमातींशी त्यांचे संबंध वाढत गेले. बारीक डोळे, वर आलेली गालांची हाडे, जाड ओठ, भक्कम जबडा, बसके नाक, काळे–कुरळे केस व तपकिरी काळसर वर्ण ही नेग्रिटोमंगोलियन गटातील शारीरिक वैशिष्ट्ये वाघरींमध्ये प्रामुख्याने दृग्गोचर होतात. 

वाघरी लोकांचे व्यवसायानुसार चुनारिया (चुना तयार करणारे), दांतनिया (दातवण्याच्या काड्या विकणारे), वैदू वा वेडू (कोहळे विकणारे) व पातानेजिया (लाकूड व बांबू विकणारे) असे चार प्रमुख विभाग आहेत. त्यांशिवाय मोरी, बगानिया, ककोडिया, बामचापोमला इ. अन्य भेद असून हे सर्व अंतर्विवाही समूह आहेत आणि तळवडा, पोरनाळ, मारवाडी, कंकोरिया, सारानिया, बडिया, धनदारी, तोटी चवटा, चुनरा इ. अनेक पोटभेद आहेत. त्यांपैकी तळवडा पोरनाळ हे स्वतःला इतरांपेक्षा उच्च गटांतील समजतात. साहजिकच त्यांचे इतरांबरोबर रोटी व्यवहार होतात पण बेटी व्यवहार होत नाहीत. 

मुलेमुली वयात आल्यानंतर लग्न करतात पण मामेबहीण, आतेबहीण, व मावसबहीण यांच्याशी लग्न करीत नाहीत. समान देवक असलेल्या कुळात, त्याचप्रमाणे एकाच गावात राहणाऱ्या आणि निकटच्या नातेसंबंधात ते विवाहसंबंध करीत नाहीत मात्र मेहुणीशी लग्न करता येते. लग्नांआधी स्वजातीत व उच्च जातीत शरीरसंबंध ठेवल्यास दंड द्यावा लागतो. मात्र कनिष्ठ वा परजातीशी शरीरसंबंध ठेवल्यास जातिबाह्य करण्यात येते. त्यासाठी अनेकदा दिव्य करावे लागते. यांच्यात बहुपत्नीत्व रूढ आहे. ब्राह्मण वा जमातीतील प्रमुख लग्न लावतो. गणपतिपूजनानंतर अन्य विधी करतात. लग्नात होम आवश्यक असतो. वधू-वरांच्या वस्त्राला गाठ मारून चार फेरे घेतात. अखेर भोजनानंतर विवाहविधी समारंभ संपतो. 

विधवाविवाह आणि घटस्फोट यांना मान्यता आहे. घटस्फोटाची कागदोपत्री नोंद करतात. मुखियाच्या साक्षीने पतिपत्नींच्या वस्त्राचा एकेक तुकडा फाडतात. मग पत्नीत उजव्या हातातील बांगड्या पतीला देते आणि दोघे विभक्त होतात. विधवेला नवऱ्याच्या धाकट्या भावाशी अथवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीशी विवाह करता येतो. हा विवाह फक्त रविवार, मंगळवार अथवा गुरुवार याच दिवशी होतो.

वाघरींच्या देवदेवतांमध्ये हिंदूंच्या अनेक देवदेवतांचा समावेश आहे. दगैया, हनुमान, कालिका खोडियार, महाराज मेलाडी, ठाकूर वरमानी, हडकी, सांभळ, विशोत्री, रूपनी इ. देवतांशिवाय विहाट देवी ही त्यांची मुख्य देवी आहे. त्यांच्यांत पशुबळीची पद्धत आहे. विशोत्रीला वासरू बळी देतात, तर सामळ मातेला बकरी बळी देतात. रविवारी वा मंगळवारी हे  बळी देतात.  होळी, जन्माष्टमी, नवरात्र, दिवाळी, अंमली अग्यारस यांसारखे उत्सव ते साजरे करतात.

कोणत्याही वाघरी समारंभात भुवानामक भगताला विशेष मान असतो. ‘विहात मातेला वाहीन’ असा नवस केल्यानंतर जन्माला आलेला मुलगाच भुवा बनू शकतो. भुवा होण्याचे सोपस्कारही बरेच कडक असतात. त्याला दाढी व केस कापता येत नाहीत. कोणाच्याही हातचे अन्न तो ग्रहण करीत नाही. स्त्रियांच्या पातिव्रत्याबद्दल जमातीत अभिमान असतो. 

वाघरी मृतांना पुरतात पण तीर्थयात्रा केलेल्यांना जाळतात. तिसऱ्या दिवशी मुलगा क्षौर करून पिंडदान करतो. बाराव्या दिवशी ज्ञातिभोजन होते.

संदर्भ : Enthoven R. E. Tribes and Castes of Bombay Province, 3 Vols., Delhi, 1975. 

मिस्त्री, शीला