परचित्तज्ञान : (टिलेपथी), पराप्रत्यक्ष (क्लेअरव्हॉयन्स) व पूर्वज्ञान (प्रीकॉग्निशन) यांप्रमाणेच अतींद्रिय प्रत्यक्षाच्या सदरात पडणारा हा प्रकार होय. एका व्यक्तीस बाह्य इंद्रियांच्या माध्यमाविना दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचा प्रत्यय येणे वा मनोव्यापार ज्ञात होणे, अशी त्याची व्याख्या करण्यात आली आहे. ⇨ पराप्रत्यक्ष म्हणजे वस्तूंचे वा वास्तव घटनांचे अतींद्रिय संवेदन, तर परचित्तज्ञान म्हणजे अन्य व्यक्तीच्या मानसिक व्यापारांचे अतींद्रिय संवेदन, असा भेद करण्यात आलेला आहे.

एका व्यक्तीस झालेले संवेदन दुसऱ्या व्यक्तीस होणे एकाच्या मनातील विचार शब्दांच्या वा मुखचर्येच्या माध्यमावाचून दुसऱ्याला कळणे एकाच्या मनातील इच्छेनुसार, ती इच्छा व्यक्त झालेली नसतानाही, दुसऱ्याकडून प्रतिसाद मिळणे एकाला पडत असलेले स्वप्न त्याच वेळी दुसऱ्याला पडणे यांसारख्या घटना परचित्तज्ञानाच्या सदरात मोडतात. मुलगा मोटारखाली चिरडला गेला, त्याच क्षणी घरी वडिलांच्या छातीत एकाएकी असह्य वेदना होऊ लागल्या पती नाव वल्हवीत असता त्याच्या तोंडावर वल्ह्याचा फटका बसला व त्याच क्षणी पत्नीला स्वप्नामध्ये तिच्या तोंडावर आघात झाल्याचे संवेदन होऊन ती जागी झाली संमोहकाने स्वत:ला चिमटा घेतला, तेव्हा संमोहित व्यक्तीला कोणीतरी चिमटा घेतल्याचे संवेदन झाले, ही परचित्तज्ञानाची उदाहरणे होत. परचित्तज्ञानात्मक अनुभव जागृतावस्थेत, संमोहित अवस्थेत तसेच स्वप्न पडत असतानाच्या अवस्थेत आल्याच्या अनेक विश्वसनीय घटना नमूद आहेत. रुग्णांवर मानसोपचार चालू असतानाच्या काळात उपचार करणाऱ्यास किंवा रुग्णास परचित्तज्ञानात्मक अनुभव आल्याचेही दाखले आहेत.

परचित्तज्ञानाची सत्यता प्रयोगांद्वारेही प्रस्थापित करण्यात आली आहे. डॉ. आझम, प्येअर झाने, एडमंड गर्नी यांनी संमोहनाच्या अनुषंगाने, चार्ल्स रीशे यांनी संमोहनाचे साहाय्य न घेता तसेच १९२० नंतर अनेकांनी देशोदेशी केलेले याबाबतचे विविध प्रयोग प्रसिद्ध आहेत. पराप्रत्यक्ष ज्ञानाचा संभव न राहू देता, निर्भेळ परचित्तज्ञानविषयक म्हणता येतील, असे प्रयोगही करण्यात आलेले आहेत. दिवंगत रशियन संशोधक एल्.एल्. वासीलिडव यांनी कित्येक मैल दूर असलेल्या प्रयुक्तास (ज्या व्यक्तीवर प्रयोग होतो, ती व्यक्ती) मनोमन आदेश देऊन संमोहित केले, ते प्रयोग ख्याती पावले आहेत. जादूटोण्याच्या सत्यतेच्या संदर्भातही ते विचारार्ह वाटू लागले आहेत. ‘मेमोनाइड्स ड्रीम लॅबोरेटरी’ त स्वप्नात होणाऱ्या परचित्तज्ञानविषयक अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. परचित्तज्ञानाशी संबंधित असलेले घटक (फॅक्टर्स) शोधून काढणे, हे या प्रायोगिक संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

परचित्तज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये भौतिक ऊर्जेचा संबंध असावा, असे काही विद्वानांना वाटते परंतु या उपपत्तीवर अनेक आक्षेपही घेण्यात आलेले आहेत व ‘व्यक्तित्वाची अतींद्रिय पातळी’, ‘दोन मनांचा अबोध पातळीवर संपर्क’, ‘मनाचा शरीरबाह्य संचार’ इ. संकल्पनांच्या साहाय्याने परचित्तज्ञानाचे स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. 

संदर्भ : 1. Murphy, Gardner, Challenge of Psychical Research, New York, 1961.

   2. Rhine, Louise, E. ESP in Life and Lab., London, 1969.

अकोलकर, व. वि.