अफ्रिडी :पाकिस्तानमधील एक पठाण जमात. खैबरखिंड व पेशावर जिल्ह्याच्या आसपास त्यांची वस्ती आहे. अफ्रिडींची  ‘मिता खेल’, ‘मिरी खेल’, ‘उला खेल’इ. आठ कुळींत विभागणी झालेली आहे.

अफ्रिडी मलिक

ते पुश्तू भाषा बोलत असले, तरी अफगाणांशी वांशिक दृष्ट्या त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या प्राचीन इतिहासाविषयी एकमत नाही. अफ्रिडी खैबर खिंडीजवळ राहत असल्याने भारत व अफगाणिस्तान यांमधील दळणवळण त्यांच्या मर्जीविरुद्ध ठेवणे राज्यकर्त्यांना कठीण जात असे. त्यामुळे हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या व अफगाणिस्तानशी संबंध ठेवणाऱ्या मोगल व इंग्रज सत्ताधीशांस त्यांचा सतत त्रास होत होता. अहमदशाह दुर्रानीच्या राज्यात मात्र अफ्रिडींनी दुर्रानीच्या सैन्यात काम केले. १८३९ ते ४२ च्या इंग्रज-अफगाण युद्धात अफ्रिडींची ब्रिटिशांशी प्रथम चकमक उडाली. १८४९ ते १९०१ च्या दरम्यान ब्रिटिशांना आठ वेळा अफ्रिडींच्या विरुद्ध सैन्य पाठवून उपाययोजना करावी लागली. पहिल्या महायुद्धात खैबरखिंडीस महत्त्व आल्याने ब्रिटिशांनी अफ्रिडींना देण्यात येणाऱ्या खंडणीत वाढ केली.

खान अब्दुल गफार खान यांनी अफ्रिडींना लोकसेवेची दीक्षा देऊन ‘रेड शर्ट’चळवळीत गोवले. १९३० साली अफ्रिडींनी भारतीय काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले. खान बंधूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात भाग  घेतला.                                                                                                                                    अफ्रिडी मलिक

हे लोक स्वभावाने सरळ व आतिथ्यशील आहेत. ते गुंफांतून राहतात. त्यांचे मुख्य अन्न  मका, मसूर व उडीद होय. त्यांच्यात परस्त्रीगमन केल्यास मृत्युदंड देण्यात येतो. 

१९४७ सालापासून अफ्रिडी प्रदेश पाकिस्तानात समाविष्ट झाला आहे. आजही अफ्रिडी राहत असलेल्या भागात अशांततेचे वातावरण आढळते. पाकिस्तानात धुमाकूळ घालणाऱ्या अफ्रिडींना अफगाणिस्तानचे सरकार संरक्षण देते, असा पाकिस्तानचा आरोप आहे.

मुटाटकर, रामचंद्र