आहोम : आसाममधील एक शान जमात. शान मूळचे ब्रह्मदेशातील रहिवासी. शान जमातीची माऊ शाखा ५६८ मध्ये ब्रह्मदेशात सत्तेवर आली, तेव्हापासून ७०३ पर्यंत त्यांनी इरावती व चिंद्‌विन नद्यांच्या खोऱ्याचा बराचसा भाग पादाक्रांत केला. १२२८ मध्ये पतकाई पर्वत पार करून राजपुत्र

आहोम राजमुद्रा

 चौकाफाच्या नेतृत्वाखाली ते उत्तर आसामात आले. १५०० मध्ये लखिमपूर व सिबसागर भागांत राज्य करणाऱ्या चुतिया लोकांचा आहोमांनी पराभव केला. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस आहोमांनी गौहातीपर्यंत आपले राज्य वाढविले. सिबसागर जिल्ह्यातील गर्हगाव येथे त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. आहोमांच्या ३९ राजांनी जवळजवळ सहा शतके आसाममध्ये राज्य केले. या काळात त्यांनी निरनिराळे सरंजामदार निर्माण करून शासकीय कारभाराची उत्तम व्यवस्था ठेवली. त्याचप्रमाणे लढाया, शासकीय व्यवस्था, सरंजामदार, न्यायव्यवस्था इ. संबंधी त्यांनी अधिकृत कागदपत्रे ठेवली असल्याने आज आहोमांच्या तसेच आसामच्या इतिहासाची साधने म्हणून त्यांना महत्त्व आहे. आहोम राजांची स्वतंत्र भाषा व लिपी होती. नंतर ती आसामी भाषा व लिपीमध्ये परिणत झाली. पुढे पुढे आहोमांच्या आपसांतील संघर्षांमुळे त्यांच्या राजकीय सत्तेस उतरती कळा लागली. १७३४ मध्ये ब्रिटिशांनी आहोमांच्या जुन्या राजवंशातील पुरंदरसिंह यास गादीवर बसविले तथापि १७३८ मध्ये अयोग्य कारभाराचे कारण दाखवून त्यांनी याला पदच्युत केले व आहोम सत्तेचा शेवट केला.

आहोमांचा स्वतंत्र धर्म होता परंतु १७१५ च्या सुमारास आहोम राजा सिबसिंगने नडियाचा शाक्तपंथी गोसावी कृपणराम भट्टाचार्य याजकडून हिंदुधर्माची दीक्षा घेतली.

आहोमात बहिर्विवाही गट नाहीत, परंतु ते जवळच्या नातेवाईंकांशी विवाह करीत नाहीत. त्यांच्यात दोन प्रकारचे विवाहसमारंभ आहेत : (१) चकलोंग समारंभ : यात वधूवर चुन्याची डबी व अडकित्ता एकमेकांना देतात. त्यांना हळद लावतात. या समारंभास समाजात जास्त मान्यता आहे. या पद्धतीने विवाह झाल्यास त्याच स्त्रीचा पुनर्विवाह याच पद्धतीने होत नाही. समाजातील वरच्या वर्गाचे लोक चकलोंग समारंभ करतात. (२) गूरी पिढामुरी समारंभ : या समारंभात गावच्या सर्व लोकांना गूळ व तांदळाचे पीठ वाटतात. चकलोंग समारंभापेक्षा या समारंभाचा दर्जा निकृष्ट मानला जातो. घटस्फोट व पुनर्विवाह समाजात संमत आहेत.

प्रतिष्ठित आहोम लोक प्रेताला जाळतात.सामान्य लोक प्रेताला पुरतातमहाब्राह्मणाकडून प्रेतसंस्कार करवितात.

सध्या सिबसागर जिल्ह्यात चाओदांग नावाचे आहोम राहतात. राजाच्या बांबूच्या महालाचे रक्षण करणारे हे लोक पूर्वीच्याच चालीरीतींचे अद्याप पालन करतात. डुकराचे मांस व कडक दारू ते सेवन करतात. प्रेतास पुरण्याची त्यांची पद्धत आहे. बैतुंग (ज्योतिषी) किंवा देवघाई (पुजारी) सोडले, तर राजपुत्र चौकाफा याने आपल्याबरोबर आणलेल्या चांग (सोंग) देवास सर्वजण विसरले आहेत, असे दिसते. आहोम भाषा आता केवळ देवघाईच बोलतात. खाम्पटी भाषेशी तिचे बरेच साम्य आहे.

मुटाटकर, रामचंद्र