गारो–२ : आसाममधील एक आदिवासी जमात. प. बंगाल, नागालँड व त्रिपुरा या प्रदेशांतही या जमातीची काही प्रमाणात वस्ती आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या २,६६,६४५ एवढी होती. त्यांचे वन्य ऊर्फ पहाडी गारो व मैदानातील गारो असे दोन विभाग आहेत. त्यांच्या शेजारी खासी जमातीचे लोक राहतात. खासींपेक्षा गारोंमध्ये अधिक मंगोल वंशाची शारीर लक्षणे आढळतात. त्यांचे नाक बसके आणि डोळे बारीक असतात. ते ठेंगणे असले, तरी बांध्याने मजबूत आहेत.

गारोंचे नृत्य

ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात राहणारे गारो उत्तम शेती करतात. पूर्वी झूम म्हणजे फिरती शेती ते करीत यासाठी जंगले तोडून व जाळून जमीन तयार करीत. आता ते पानी खेत ऊर्फ सौध शेती करतात. मुख्य पीक भात आहे. झूम शेती जास्तीत जास्त पाच वर्षे करतात आणि पुढे नांगरण्याची वहिवाट नसल्याने ते शेत निकामी होते. गारो तांदळाची दारू तयार करून भोपळ्याच्या तुंब्यात भरून ठेवतात. पाणी भरण्यासाठीदेखील तुंबेच वापरतात. त्यांच्यातील मागासलेले पुरुष फक्त एक लंगोटीच लावतात आणि स्त्रिया कमरेभोवती फडके गुंडाळतात.  स्त्रिया कानांत पितळेची वलये व गळ्यात मण्यांच्या माळा घालतात. बाजारात जाताना मात्र पुरुष अंगरखा व स्त्रिया पोलके घालतात.

गारो टेकड्यांतील आपण मूळ निवासी आहोत, असा त्यांचा दावा आहे. म्हणून ते स्वतःला अचिक किंवा मंडे म्हणतात. अचिक म्हणजे पहाड व मंडे म्हणजे मनुष्य असा शब्दप्रयोग ते स्वतःविषयी करतात. त्यांच्या चार उपजाती आहेत : अबेंग, माची, आर्वी आणि अतोंग. आसामच्या गारो पहाडात अबेंग, तुरा डोंगरात माची, त्याच डोंगरात दक्षिणेला अतोंग व सोमश्वरीच्या खोऱ्यात दोन्ही बाजूंना व गोपालपुऱ्याच्या सीमेवर आर्बी आढळतात. या उपजाती प्रत्येकी दोन किंवा तीन विभागांत ऊर्फ महारीत विभागल्या गेल्या आहेत. प्रत्येक महारीचे अनेक पोटविभाग आहेत. त्या विभागांची अनेक गोत्रांत विभागणी झालेली आढळते. गोत्रांची नावे देवक पद्धतीवर आधारलेली आहेत.

गारोंचे प्रमुख अन्न भात व आमटी असून ते गोमांसही खातात. शिवाय गारो लोकांना कुत्र्याचे मांस आवडते.

त्यांची घरे लहान असून बांबू आणि गवत यांची असतात. घरची जमीन बांबूच्या कामट्यांची बनवितात. मात्र जमातीतील नायकांची घरे मोठी असतात. ही घरे साल वृक्षांच्या खांबावर उभारतात. त्यांच्या आवारात गुलामांची घरे असतात.

गारोंची कुटुंबपद्धती मातृसत्ताक असून दत्तक घेण्याचा एखादा प्रसंग आल्यास कुटुंबप्रमुख स्त्री मुलगीच दत्तक घेते कारण अशा कुटुंबात वंशपरंपरागत संपत्ती मातेकडूनच ठरविली जाते.

गारोंमध्ये युवागृहाची पद्धत प्रचलित असून त्यास नोकपांते म्हणतात. यामुळे प्रेमविवाहांचे प्रमाण अधिक आहे. सर्वसाधारणपणे मुलेमुली वयात आल्यावर लग्नविधी होतात व तेही बहिर्विवाही कुळींत केले जातात. या कुळींना मचोंग म्हणतात. एकाच मचोंगमधील स्त्रीपुरुषांचे लग्न होत नाही. मुलाचे लग्न बहुधा मामेबहिणीशी होते. जावई विधवा सासूशी विवाह करतो, ही प्रथा प्रचलित आहे. त्यांच्यात पुरुषाला आपल्या सासऱ्याच्या निधनानंतर आपल्या विधवा सासूशी लग्न करणे भाग पडते. नाही तर तिची संपत्ती तिच्याशी विवाह करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे जाईल, अशी त्याला भीती वाटते. बहुपत्नीत्व रूढ आहे. नृत्य, गायन व मेजवानी हे विवाहसमारंभातील महत्त्वाचे कार्यक्रम असतात.

पूर्वजपूजेवर त्यांचा भर असून गारो हे काहीसे हिंदुधर्मीय आहेत तथापि अलीकडे त्यांच्यातील बरेच लोक ख्रिस्ती होत आहेत. त्यांचा मुख्य देव सालगाँग असून तो तुर्रा या आपल्या पत्नीसह मृत्युलोकात येऊन राहिला. त्याला दोन मुले झाली, ती म्हणजे केंग्रा बरसा (मुलगा) व मिनिंग मिजा (मुलगी). वस्तू या त्यांच्या एका देवतेने विश्वाची निर्मिती केली, असे ते सांगतात. याशिवाय त्यांचा भुताखेतांवर विश्वास आहे. पुरोहिताचे स्थान महत्त्वाचे असून देवाचा कोप झाल्यास त्याचा सल्ला घेतात.

गारो मृतांना घराशेजारीच जाळतात. त्या वेळी गायीचा अथवा बैलाचा वळी देतात. चितेच्या जागी बांबूचा मांडव घालतात आणि मोडकी घंटा व मृताच्या वस्तू टांगतात. सूप टांगून त्याला एक भोक पाडतात. त्यातून मृतात्मा बाहेर पडतो, अशी त्यांची समजूत आहे. आत्मा चिरंतन आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. मृतात्मा मंडपाभोवती घोटाळतो, अशी त्यांची समजूत आहे. सुगीला बांबूचा मंडप जाळतात.

संदर्भ : Barkataki, S. Tribes of Assam, New Delhi, 1969.

भागवत, दुर्गा