गरासिया : राजस्थानमधील एक आदिवासी जमात. गरासियांची गुजरात राज्यातही थोडी वस्ती आढळते परंतु तिथे त्यांना भिल्ल गरासिया व डुंगरी गरासिया या नावांनी संबोधिण्यात येते. १९६१ च्या खानेसुमारीनुसार त्यांची लोकसंख्या ६२,५०९ होती. ही भिल्लांचीच एक शाखा असून राजपूत व भिल्ल यांच्या मिश्र संकरामधून ती निर्माण झाली असावी. आपण मूळचे राजपूत आहोत, अशी गरासियांची समजूत आहे. पुढे भिल्लांनी आपल्याला काही जमिनी दिल्या आणि त्यांच्यात सामावून घेतले, असे ते म्हणतात.

गरासिया हे काहीसे भिल्लांसारखे दिसतात. ते उंच व धिप्पाड आहेत. स्त्रीपुरुष कानांत मरकी नावाच्या बाळ्या घालतात. स्त्रियांना दागिन्यांची फार आवड असून त्या दागिन्यांनी मढलेल्या दिसतात.

पूर्वी गरासिया लुटारू म्हणून कुप्रसिद्ध होते. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल दहशत वाटे आता त्यांपैकी बहुतेक शेती करू लागले आहेत. काही गरासिया शिकार करतात. त्यांच्याजवळ धनुष्यबाण व वाकडी तलवार असते. हे लोक मुख्यत: शाकाहारी असले, तरी क्वचित प्रसंगी मांसाहारही घेतात. मक्याच्या भरड्याची ताक घातलेली अंबिल हे त्यांचे मुख्य अन्न. सणाला ते मक्याच्या किंवा गव्हाच्या पिठाचे गूळ घालून घाटले (खांटू) करतात. मक्याशिवाय ते कुरो धान्य, कडवा कंद व जहरी कंदसुद्धा खातात. यांची घरे मातीची असून घराला ओटा व एकच खोली असते. गोठा घरासमोर एका छपरीत असतो.

स्त्री-पुरुष दोघेही गोंदून घेतात. गोंदून घेतले नाही, तर मेल्यावर देव लोखंड तापवून त्याने गोंदतो, असे ते म्हणतात.

मुलामुलींचे वयात आल्यावर विवाह करतात. ते बहिर्विवाही कुळीत होतात. यांच्यात एकूण २८ गोत्रे वा गोठ आहेत. देज देण्याची पद्धत रूढ असून ते ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत असते. लग्‍न तीन प्रकारांनी करतात : कुटुंबीयांनी ठरविलेले लग्‍न, पळून जाऊन केलेले लग्‍न आणि मुलीला पळवून नेऊन केलेले लग्‍न.

हे शिव व अंबादेवी यांची पूजा करतात. श्रावणात चामुंडेच्या देवळात जाऊन तिला खिरीचा नैवेद्य देतात. ते गटागौर हा सण पाळतात. भाद्रपद महिन्यात मक्याची कणसे नवे धान्य म्हणून देवीला वाहतात. माघात वद्य षष्ठीला काळभैरवाची पूजा करतात. फाल्गुनच्या कृष्ण पक्षात शीतलेची पूजा करतात. भोपा हा बहुतेक सर्व धर्मकृत्ये करतो. तोच पुजारी व ज्योतिषीही असतो.

हे मृताचे दहन करतात व तेही मृताला नवीन कपडे घालून. मृतासाठी वीरगळ करतात आणि त्या दगडाला सुरस म्हणतात. बाराव्या दिवशी मेर ऊर्फ श्राद्ध करतात.

संदर्भ : Dave, P.C. The Grasias, Delhi, 1960.

भागवत, दुर्गा