टोटो : पश्चिम बंगालमधील एक जमात. प. बंगालमधील तिस्ता नदीतीरावर राहणारे हे लोक १८३५ नंतर हिवतापाच्या साथीतून बचावून टोटोपाडा या जंगली भागात आश्रयास आले. टोटोपाडा हे लहान खेडे जलपैगुरी जिल्ह्यात आहे. टोटोपाडाच्या परिसरातील १६ चौ.किमी. च्या टापूत हे लोक राहतात. १९५१ च्या जनगणनेनुसार त्यांच्या ७० झोपड्या होत्या व लोकसंख्या ३१४ होती. १९६१ च्या जनगणनेनुसार यांचा समावेश भूटिया जमातीत केल्यामुळे त्यांची निश्चित माहिती उपलब्ध नाही. ते तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील बोली बोलतात. त्यांच्या शरीराची ठेवण मंगोलियन असूनही वर्ण मात्र उजळ नसतो. 

त्यांच्याकडे पारधीची हत्यारे नसल्यामुळे मेलेच्या जनावरांचे मांस व कंदमुळे यांवर ते उपजीविका करतात. म्हैस, बैल अशा जनावरांचे मांस मात्र ते खात नाहीत. पूर्वी असलेली संत्री व लाख यांचे उत्पन्न आता नष्ट झाल्यामुळे त्यांना शेती अथवा शेतमजुरी करून किंवा भूतानहून येणाऱ्या संत्र्यांची वाहतुकीची कामे करून उपजीविका करावी लागते. प्रत्येक कुटुंबाकडे कोंबड्या, डुकरे व एखादे दुभते जनावर असते.

जमिनीपासून २ ते २/ मी. उंचीवर ते झोपडी बांधतात. नवीन पद्धतीच्या घरात राहण्याची त्यांची तयारी नसते. कारण चिमा (पूर्वजांचा आत्मा) पारंपरिक घरातच राहतो, अशी त्यांची दृढ समजूत आहे. टोटो जमातीतील बहिर्विवाही तेरा कुळी असून मुलामुलींची लग्ने वयात आल्यानंतर होतात. विवाहानंतर नवराबायकोची नावे बदलतात. दोन मोठी ढोलकी महाकालीची निदर्शक म्हणून त्यांच्या झोपडीत टांगलेली असतात. मुख्य पुरोहित त्यांची पूजा करताना जे स्तोत्र म्हणतो, ते टोटोखेरीज इतरांना ऐकण्याची मनाई असते. मृताला केळीच्या पानांत गुंडाळून पुरतात. धनुष्यबाण ही टोटोंची हत्यारे नसूनसुद्धा ती मृताबरोबर पुरतात.

संदर्भ : 1. Dalton, E. T. Descriptive Ethnology of Bengal, Calcutta, 1960.

    2. Das, A. K. The Totos, Calcutta, 1969.

कीर्तने, सुमति