कोल : मध्य प्रदेश व ओरिसा यांतील आदिवासी जमात. मध्य प्रदेशात १९६१ च्या शिरगणतीनुसार यांची लोकसंख्या सु. ८०,००० व ओरिसात ४६,००० होती. उत्तर प्रदेशातील कोल अनुसूचित जातीचे समजले जातात. कोल एक जमात आहे, की जमातींचा समूह आहे, याबद्दल तज्ञांत बरेच मतभेद आहेत. पूर्वी मुंडा भाषा बोलणाऱ्या सर्व जमातींचा – प्रामुख्याने हो, खाडिया, उराव मुंडा इत्यादींचा – कोल म्हणूनच उल्लेख करण्यात येत असे. छोटा नागपूर भागात यांना लडाका कोल म्हणतात. १८३१ साली ब्रिटिशांच्या विरुद्ध छोटा नागपुरामधील आदिवासींनी बंड पुकारले. त्यास कोल लोकांचे बंड म्हणूनच संबोधतात. त्यावरून त्यांना लडाका ऊर्फ योद्धा हे बिरुद प्राप्त झाले असावे.

कोल जमातीच्या उत्पत्तीचा उल्लेख हरिवंशात सापडतो. सोमवंशी ययातीनंतरच्या दहाव्या पिढीत कोल नावाचा राजा झाला आणि त्यापासून कोल जमातीची उत्पत्ती झाली. स्वतःकोल आपली उत्पत्ती ओते बोराम व सिंगा बोंगा या देवतांपासून झाली असे सांगतात.

कोल प्रोटो-ऑस्ट्रेलॉईड वंशाचे आहेत, असे मानवशास्त्रज्ञांचे मत आहे. कोल मुंडारी भाषा-समूहातील बोली बोलतात, पण हिंदूंशी सतत संपर्क राहिल्याने काही ठिकाणी स्थानिक बोली त्यांनी आत्मसात केल्या आहेत. हिंदूंचा प्रभाव त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावरही झाला आहे. बहुतेक कोल शेतमजुरीचा व्यवसाय करतात. काही स्थलांतरित शेती करतात. उत्तर भारतीय हिंदूप्रमाणे, यांच्या भोजनाचे कच्चे व पक्के असे विभाजन करण्यात येते.

कोल स्त्रियांचे गोंदणे सर्वमान्य आहे. गोंदवून घेतलेल्या स्त्रीस राक्षसी गिळूशकत नाही, असा त्यांचा समज आहे. कोल विवाहात वरपक्षाकडून पुढाकार घेण्यात येतो. कृष्णपक्षात विवाह होत नाहीत. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ महिने विवाहासाठी शुभ मानले जातात. स्टीफेन फुक्सच्या पाहणीवरून गोंड व भूतिया जाती-जमातीचे लोक कोलांना कमी लेखतात व त्यांच्याशी वैवाहिक संबंध ठेवल्यास त्यांना वाळीत टाकतात. 

कोल हिंदूंप्रमाणेच सूर्याची पूजा करतात. यांच्यातील प्रमुख देवतेस बडा देव म्हणतात. बहुतेक सर्व धार्मिक विधी कनिष्ठ हिंदू जातींप्रमाणेच असतात. छोटा नागपुरातल्या कोल आणि मुंडाच्या देवास सिंगा बोंगा म्हणतात. कोल पंचायत प्रमुखास चौधरी व गाव प्रमुखास महातो म्हणतात व ही पदे वंशपरंपरागत चालतात. पंचायतीस वैवाहिक व नैतिक विषय हाताळण्यात येतात. 

मृतांस जाळण्यात किंवा पुरण्यात येते. देवी किंवा विषूचिका या रोगांनी दगावल्यास प्रेत नदीत टाकण्यात येते.

संदर्भ : Ghurye, G.S. The Scheduled Tribes, Bombay, 1959. 

मुटाटकर, रामचंद्र