कोरमा : कर्नाटकातील एक भटकी जमात. कोरछा या नावानेही ही जमात प्रसिद्ध आहे. त्यांचे मुख्य विभाग (१) एथिना, (२) बेरागयी, (३) हग्गड, (४) वलगड आणि (५) कल्ल असे असून हे गट बहिर्विवाही आहेत. हे गट त्यांच्या गुरे पाळणे, वाजंत्री वाजविणे, चोऱ्या करणे वगैरे व्यवसायांवरूनच बहुधा पडलेले असावेत. कोरमांत कन्नड व तमिळ या दोन्ही भाषा प्रचलित आहेत. दक्षिणेकडे मलबार-कोचीन व त्रावणकोर भागांतदेखील यांची वस्ती आढळते.

त्यांच्या प्रत्येक गटात कुळी असतात. उदा., बिरूरजवळच्या कोरमांत तीन गोत्रे आहेत : सत्पडी, कवडी व मेनपाडी. कोरमांत आतेमामे नातेसंबंधात लग्ने होतात. लग्नात मुलीचे देज द्यावे लागते. लग्न मांडवात लागते. लग्नात मुलीच्या गळ्यात बोट्‍टू म्हणजे मंगळसूत्र घालतात. कोरमांत ग्रामपंचायतीची पद्धती आहे.

कोरमा अंथरघट्टम्मा व येल्लम्माला भजतात. हनुमान व वेंकटरमण यांनाही ते भजतात. गौरी, दिवाळी, कार्तिकी पौर्णिमा व आषाढी एकादशी हे सण ते पाळतात. मृताला ते पुरतात. सुतक तीन दिवस पाळतात व एकोणतिसाव्या दिवशी श्राद्ध करतात.

संदर्भ : Thurston, E. Castes and Tribes of Southern India, Vol.III, New York, 1965.

भागवत, दुर्गा.