कोल्हाटी : महाराष्ट्रातील एक भटकी जमात. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही त्यांची वस्ती आढळते, पण प्रदेशानुरूप तिच्यात भेद आहेत. महाराष्ट्रात यांना दांडेवाले, कबुतरी, खेळकरी, डोंबारी, कोल्हाटी, बांसबेरिया वगैरे नावांनी ओळखतात. कर्नाटकात यांना डोंबारी म्हणतात. त्यांची लोकसंख्या १९६१ च्या जनगणनेनुसार सु. २६,००० होती.

ही जमात अनेक जमातींच्या मिश्रणाने बनलेली आहे. यांच्यात मुख्य पोटभेद नऊ आहेत ते म्हणजे मराठा, गुजराथी डुकरे ऊर्फ पोटरे, पाल ऊर्फ काणे, हरका, वळे ऊर्फ वळियार, गोपाळगणी, आरे व मुसलमान. ते बहुधा गावाबाहेर चटयांच्या झोपड्यांत राहतात. गाढवांवर सर्व सामान लादून एका गावाहून दुसऱ्या गावास जातात. काही मराठी कोल्हाटी सुतार, शिंपी इ. जातींच्या लोकांचा आपल्या जातीत समावेश करून घेतात. जात बदललेल्या माणसांस डुकरांचे मांस खाऊ घालतात. त्यांच्या कुळींची नावे पाटेकर, देवळकर, लाखे, सोनटक्के, निकनाथ, दुर्वे, दांडेकर, काठे इ. आहेत.

कोल्हाटी स्त्री

अहमदनगर जिल्ह्यातील मराठा कोल्हाटी ब्राह्मणास बोलावून मुलाची मुंज करतात. मराठा कोल्हाटी असे सांगतात, की त्यांचा मूळ पुरुष नाट ऊर्फ नर्तक असून त्याचे नाव कोल होते. त्याचा बाप तेली असून आई क्षत्रिय होती. मुलाचे व मुलीचे विवाह वयात आल्यावर करतात. मुलींना विवाह करण्याचे अथवा न करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. वेश्याव्यवसायदेखील त्या करू शकतात.

बहुपत्नीत्वाची प्रथा रूढ आहे. मुलीला मागणी मुलाच्या पित्याकडून घातली जाते. मुलीसाठी त्याला रु. ५० ते रु. १०० वधूपित्यास द्यावे लागतात. विधवाविवाहास मान्यता आहे. विधवा आपल्या मावशीच्या मुलाबरोबर लग्न करू शकत नाही. मामाच्या मुलीशी होऊ शकते पण आतेबहिणीशी लग्न होत नाही. अमावस्यापूर्वीच्या रात्री हा विवाह होतो. अविवाहित पुरुष विधवेशी विवाह करू शकतो पण त्यापूर्वी त्याला रूईच्या झाडाबरोबर विवाह लावावा लागतो. घटस्फोटास परवानगी नसते. कोल्हाटी हिंदुवारसा कायदा पाळतात.

त्यांचा भविष्यावर व जादुटोण्यावर तसेच भूतपिशाच्चांवर विश्वास आहे. ते महादेवाचे आणि मारुतीचे उपासक आहेत. जेजुरी, आळंदी, शिखर-शिंगणापूर, पंढरपूर, कोल्हापूर, ज्योतिबा ही त्यांची तीर्थस्थाने होत. खंडोबा, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा या त्यांच्या देवता होत. ते दसऱ्याच्या दिवशी देवतांना शेळीचा नैवेद्य दाखवितात. मृतांच्या मूर्ती ते पूजतात. गावात साथ आली, तर मरीआईची पूजा करतात व गावाच्या शिवेवर बकऱ्याचा बळी देतात.

मृतास ते पुरतात. मृतास स्नान घालून नवे वस्त्र परिधान करून तिरडीवर ठेवले जाते. तिरडी नेताना तिच्यापुढे घरातील वडील माणूस गोवरीवर विस्तव घेऊन चालतो. रस्त्याच्या मध्यभागी तिरडी ठेवतात. खांदा देणारी मंडळी मागे न पाहता खांदे बदलतात. यावेळी पुढे असलेला मनुष्य जोरात रडतो. थडग्यावर पोळी व भात ठेवला जातो. भाद्रपदात श्राद्ध करतात. गोपाळ गणी स्त्रिया प्रामुख्याने वेश्याव्यवसाय करतात. चटया, फण्या, खेळणी, शिंगाच्या कलाकुसरीच्या वस्तू करून तसेच गोंदवण्याचा धंदा करून ते आपली उपजीविका करतात. काही कोल्हाट्यांना त्यांच्या कसरती कामाच्या नैपुण्यामुळे पेशव्यांनी इनामी जमिनी दिल्याची नोंद आहे. नृत्य, गायन व तमाशा यांमध्ये काही कोल्हाटीण स्त्रिया भाग घेतात.

संदर्भ : 1. Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, 3 Vols., Bombay, 1920–22.

2. Russel, R.V. Hiralal, Tribes and Castes of Central provinces of India, 4 Vols., London,

1916.

देशपांडे, सु. र.