सिंगफो : भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे अरुणाचल प्रदेशातील तिराप व लोहित जिल्ह्यांत व ईशान्य आसाममधील तेंगपाणी व नामरुप या भागांत आढळते. अरुणाचल प्रदेशात त्यांची लोकसंख्या २,३५३ (१९८१) होती. हे मंगोलॉईड वंशाचे असून रुंद जिवणी, गालाची हाडे वर आलेली, तिरकस आदिम सिंगफो जमातीचा पुरुषडोळे व जाड ओघळलेल्या भुवया, चौकोनी चेहरा, पिंगट वर्ण आणि पिळदार शरीरयष्टी ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. ते तेंगपाणी व नावोदिहिंग नद्यांच्या परिसरात शेती करतात आणि सोबतच्या घनदाट जंगलाजवळ राहतात. शेतीशिवाय ते विणकाम, शस्त्रे-ढाली बनविणे, कातड्याच्या पिशव्या तयार करणे, शिरस्त्राण बनविणे वगैरे अन्य व्यवसाय करतात. काही सिंगफो मोलमजुरी करतात. सिंगफो हे ब्रह्मदेशातून अठराव्या शतकात आले. त्यांच्यापैकी काही टोळ्या आसामात तेंगपाणी व नामरुप भागांत (ईशान्य आसाम) स्थिरावल्या, तर काही हिमाचल प्रदेशात प्रविष्ट झाल्या. त्यांना पूर्वी ककू व कारण्येन म्हणत. या लोकांचे भात हे मुख्य अन्न असून ते मासे, मांस (डुकराचे ), अंडी वगैरेही खातात. तांदूळ व सातूपासून बनविलेले सौम्य मद्यार्क (बीअर) सर्वजण पितात. तेसान, मिरिप, लोपहे, लूतांग, मेरंग, लाट्टोरा, लेस्सो वगैरे काही बहिर्विवाही कुळींत हा समाज विभागला असून एकाच कुळीत वयात आलेल्या प्रौढ मुलामुलींचे विवाह वाटाघाटीने ठरवितात. वधुमूल्याची प्रथा असून मुलीने घटस्फोट घेतल्यास ते मुलाला परत करावे लागते. घटस्फोटित स्त्री पुनर्विवाह करते. आते-मामे भावंडांतील विवाहास प्राधान्य असून विधवा भावजयीशीही विवाह होतो. एकपत्नीत्व रुढ आहे पण द्विभार्या किंवा बहुपत्नीत्वही आढळते. सिंगफोचा पोशाख साधा असून रंगीत चौकड्यांची लुंगी, बंडी किंवा जाकिट, सदरा आणि मुंडासे हा पुरुषांचा पेहराव असून स्त्रिया फुकांगनामक झगा ( स्कर्ट ), निंगओट कमरबंध आणि बापाई नावाचे प्रावरण वापरतात. काही स्त्रिया चोळी व घोळ असलेला झगा घालतात. पितृसत्ताक कुटुंबपद्धीतीमुळे मुलांत संपत्तीचे समान वाटप होते. त्यांची बोलीभाषा तिबेटी-ब्रह्मी भाषासमूहातील असून तीत अबोर ब्रह्मी व मणिपूरी भाषांतील शब्दांचा अधिक भरणा आहे मात्र व्याकरण ब्रह्मी भाषासदृश्य आहे.

सिंगफो स्वतःला बुद्धाचे उपासक मानतात मात्र अनेक धर्मांशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्या त्या धर्मातील चालीरीती व परंपरागत जडधर्म आचरतात. बौद्घ देवतांबरोबरच ते मृतात्मे, भूताखेतांना भजतात. तसेच बौद्घ सणांबरोबरच परंपरागत सिंपोगयंग, योंगबाई आदी सण साजरे करतात. त्यांच्यातील भगतांना डिमसाब व चौस्त्रा म्हणतात. त्यांची पूर्वी ग्रामपंचायत ( मंडळ ) होती. तिला मुंग म्हणत. तिचा प्रमुख वंशपरंपरागत असे. सिंगफोंचे खाम्टी, खामीयंग, दोनिया आदी शेजारील आदिवासींशी मैत्रीचे संबंध आहेत, शिवाय त्यांच्यात व्यापाराची देवाण-घेवाण होते.

आसाममधील सिंगफोंच्या चालीरीती-धार्मिक समज यांत काही मूलभूत फरक असून त्यांच्यातील धनिक सिंगफो गुलाम स्त्रियांशी संबंध ठेवीत. येथील सिंगफोमधील काही टोळ्यांनी इंग्रजांविरुद्घ बंड केले होते (१८४३), तेव्हा त्यांच्या असंतोषाची कारणे एका समितीने शोधून योग्य त्या उपाययोजना केल्या. अन्य बाबतींत ते हिमाचल प्रदेशातील सिंगफोप्रमाणेच आहेत मात्र काही टोळ्या स्थलांतरित शेती करतात आणि पूर्वी ढाली व शिरस्त्राणे करण्यात आणि कातड्याच्या पिशव्या बनविण्यात ते तत्पर होते.

सिंगफो सामान्यतः प्रेत पुरतात पण एखाद्याने मरणापूर्वी इच्छा व्यक्त केल्यास त्यास जाळतात. तसेच बाळंतीण व टोळीप्रमुख यांची प्रेते जाळतात. अंत्यसंस्काराच्या वेळी प्रथम कोंबडा, डुक्कर वा मासे यांचा बळी देतात. देवघी नावाची प्रार्थना व मंत्र भगत म्हणतो. त्यानंतर अंत्यविधी होतो व सामिष मेजवानी होऊन हा विधी संपतो. जेवणापूर्वी सर्वजण मद्यपान करतात.

नागरीकरण आणि शैक्षणिक सुविधा यांमुळे त्यांच्या जीवनात स्वातंत्र्योत्तर काळात आमूलाग्र बदल झाला असून जीवनशैलीत आधुनिकीकरण झाले आहे. अनेकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून व्यापार, बांधकाम व्यवसाय, नोकरी यांची कास धरली आहे. शेतीमध्ये रासायनिक खते आणि औषधे यांचा ते सर्रास वापर करु लागले आहेत.

संदर्भ : 1. Barua, Tapankumar, The Singphos and Their Religion, Shillong, 1977

2. Das Gupta, K. The Singpho’s North-Eastern Affairs, 1973.

3. Singh, K. S. The Scheduled Tribes, Bombay, 1994

देशपांडे, सु. र.