शिकारीच्या पवित्र्यातील सेमांग पुरूषसेमांग : मलाया द्वीपकल्पातील एक भटकी नेग्रिटो वंशीय आदिम जमात. त्यांची लोकसंख्या सु. ४,००० होती (विसाव्या शतकाच्या अखेरीस). ते ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील भाषा बोलतात. थायलंडमधील सेमांग एन्‌गोक (Ngok) किंवा एन्‌गो (Ngo) या नावांनी ते ओळखले जातात. सेमांग हे परंपरागत अस्थिरवासी (भटके) शिकारी असून त्याकरिता ते ब्लोगन (फूंकनळी) वापरतात मात्र हिंस्र मोठ्या प्राण्यांची ते शिकार करीत नाहीत. याशिवाय चरितार्थासाठी ते रानातील कंदमुळे व फळे गोळा करतात. अलीकडे त्यांच्यापैकी बऱ्याच समूहांनी शेती हा व्यवसाय अंगीकारला आहे. ते गुहांतून किंवा पुढे आलेल्या कड्याखाली वा झाडावर फांद्यांमध्ये पर्णांनी केलेल्या आसऱ्यात राहतात. शेजारच्या समूहातील देवघेवीला त्यांच्यात विशेष महत्त्व आहे.

त्यांचे स्थानिक समूह गट स्वायत्त असून ज्येष्ठ पुरुष नेता असतो. या समूह गटात त्याची पत्नी, मुले, त्यांच्या पत्न्या व मुले यांचा समावेश असतो. त्यांच्या धार्मिक समजुती गुंतागुंतीच्या असून शामान (धर्मगुरू) यास अनन्यसाधारण मान असतो. तो जादुटोणा, भविष्य वर्तविणे यांत वाकबगार असल्याचा जमातीत समज आहे. शिवाय तो रोगांचे निवारण करतो आणि समूहाच्या कल्याणार्थ काही विधी करतो.

पुरुष पूर्वी वल्कला कमरेला गुंडाळीत तर स्त्रिया गुडघ्यापर्यंत परकरसदृश कापडाचा तुकडा कमरेला गुंडाळीत. प्रारंभीच्या काळात बरेच जण विवस्त्र असत. अंगावर साजशृंगार चढवून ते नाचतात. त्यांची तंतूवाद्ये असून ते बासरी वाजवतात.

देशपांडे, सु. र.