नॅव्हाहो: नव्हाहो, नव्हाजो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील संख्येने सर्वांत मोठी असणारी अमेरिकन इंडियन जमात. त्यांची लोकसंख्या सु. १,००,००० (१९६९) होती. त्यांची वस्ती मुख्यत्वे न्यू मॅक्सिको, ॲरिझोना आणि उटा या राज्यांत आढळते. हा प्रदेश नॅव्हाहो प्रदेश म्हणून प्रसिद्ध असून ओसाड आहे. त्यामुळे येथे फारशी शेती होत नाही तथापि पाण्याची जेथे सोय आहे तेथे नॅव्हाहो थोडी शेती करतात. याशिवाय इतर नॅव्हाहो बाहेरच्या भागांत मोलमजुरी करतात. मेंढपाळीचा धंदा नॅव्हाहोंमध्ये अधिक प्रमाणात अलीकडे आढळतो. ते विणकामही करतात. नॅव्हाहो लोकांचे लोकरीचे रग, त्यांवरील गुंतागुंतींचे अभिकल्प व विविध रंग यांकरिता प्रसिद्ध आहेत. यांशिवाय धातुकामामध्येही काही नॅव्हाहोंनी चांगली प्रगती केली आहे.

नॅव्हाहो आथापास्कन बोली बोलणारे लोक असून सु. १००० च्या आसपास ते उत्तरेकडून या प्रदेशात आले असावेत. प्रथम हे लोक लढवय्ये व लुटारू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी प्वेव्लो इंडियनांच्या शेती, विणकाम वगैरे धंद्यांचे अनुकरण केले. स्पॅनिश लोकांशी त्यांचा सतराव्या शतकात (१६३० मध्ये) संबंध आला. त्या वेळी अपाची इंडियन व नॅव्हाहो हे एकच आहेत, अशी त्यांची प्रथम समजूत झाली. पुढे अमेरिकन सैन्याने १८४६ मध्ये न्यू मेक्सिको घेतले आणि लष्कराची काही ठाणी या प्रदेशात वसविण्यात आली. त्यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून १८४६, १८४८ व १८४९ मध्ये या जमातीबरोबर तह करण्यात आले परंतु प्रत्यक्षात यांचा काही परिणाम झाला नाही. तेव्हा अमेरिकन सरकारने त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले व त्यांना काही खास अधिकार देऊन त्यांचे अंतर्गत सरकार आणि त्यावर ताबा ठेवणारे मंडळ स्थापन केले.

नॅव्हाहोंच्या झोपड्यांना होगान म्हणतात. होगान काटक्या आणि लाकडी ओंडके यांच्या साहाय्याने बांधतात. त्यांच्या भिंतींचा गिलावा मातीचा असतो. मातृसत्ताक कुटुंबपद्धती नॅव्हाहोंमध्ये प्रचलित असून एकाच गोत्रात विवाह होत नाहीत. त्यांच्या एकूण साठ कुळी आहेत.

नॅव्हाहोंचा धर्म गुंतागुंतीचा, पण तपशीलवार कथांनी रंगलेला असून त्यांच्यात अनेक सण व समारंभ असतात. त्यांपैकी बहुतेक धार्मिक विधी रोग्याला बरे वाटावे याकरिता करतात किंवा युद्ध, शेती, गृहबांधणी, प्रवास, विवाहविधी इ. कार्ये विनासायास तडीस जावीत म्हणून आराधनारूपाने साजरे करण्यात येतात. प्रार्थना, नृत्य, संगीत व बळी यांनी भूतपिशाचांना संतुष्ट करण्यात येते. देवतांना विविध मुखवटे चढवितात. त्यांचे ‘स्क्वॉ’ नावाचे नृत्य प्रसिद्ध असून युद्धात जखमी झालेला शिपाई बरा व्हावा, म्हणून ते सादर करण्यात येते. हे उन्हाळी नृत्य म्हणूनही प्रसिद्ध आहे.

संदर्भ : 1. Kluckhohn, Clyde Leighton, Dorothea, The Navaho, Cambridge, Mass., 1946.

           2. Underhill, R. M. Here come the Navajo, Denver, 1953.

देशपांडे, सु. र.