लंबा : भारतातील एक वन्य जमात. ती लिंबू, लंबू, लंब आदी नावांनी प्रसिद्ध असून प. बंगाल व हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने आढळते. खंबू व यख या दोन जमातीमध्ये तिचे स्थान आहे. या तिन्ही जमाती किराती ऊर्फ किरात या जमातीत मोडतात. लिंबूचे लेपच्यांशी पुष्कळ मिश्रण झालेले आहे. लिंबू ऊर्फ दस (दश) यांच्या तेरा शाखा आहेत. ते स्वतःला दिवाण म्हणवून घेत असले, तरी पूर्वी हिमाचल प्रदेशात असताना व नेपाळात येण्यापूर्वी त्यांचा धंदा याक माणसाळविण्याचा होता. तिबेटात अर्थातच पशुपालन हाच त्यांचा व्यवसाय होता. पुढे त्यांच्या दहा शाखा झाल्या, म्हणून दुसरे लोक त्यांना दश-लिंबू म्हणू लागले. भूतान, सिक्किम आणि नेपाळमधील लोक त्यांना त्सोंग म्हणतात कारण त्यांची पाच गोत्रे आहेत. लेपचा त्यांना चांग म्हणतात. किराती जमातीचे लोक त्यांना आदराने सुभा ऊर्फ सुभेदार म्हणतात. यांची विवाहपद्धती बहिर्विवाही म्हणजे असगोत्र असून परंपरा पितृवंशीय आहे. यांच्यात मृताला जाळण्याची त्याचप्रमाणे पुरण्याचीदेखील प्रथा अस्तित्वात आहे.

मुर्मी, लेपचा व भूतिया या जमातींतले लोक लिंबू लोकांना आपल्यात घेतात. या जमाती बौद्ध वळणाच्या आहेत. ते हिमारिया (हिमालय) या वनदेवाची पूजा रविवारी करतात. त्याला मका, बोकड, डुक्कर वा कोंबडी अर्पण करतात.

संदर्भ : Risley. H. H. Tribes and castes of Bengal, Vol. II, Calcutta, 1891.

भागवत, दुर्गा