लँग, अँड्रू : (३१ मार्च १८४४-२० जुलै १९१२). ग्रेट ब्रिटनमधील एक थोर साहित्यिक, मानवशास्त्रज्ञ व लोकविद्यावेत्ता. त्याचा जन्म सेलकर्क (सेलकर्कशर-स्कॉटलंड) या गावी झाला. त्याने एडिंबरो अकॅडमी, सेंट अँड्रूज विद्यापीठ आणि बॅलिअल महाविद्यालय (ऑक्सफर्ड) येथे उच्च शिक्षण घेतले. पुढे मर्टन महाविद्यालयात त्याला सन्माननीय अधिछात्रवृत्ती मिळाली पण १८७५ मध्ये त्याने लंडनमध्ये मुक्त वृत्तपत्रीय लेखन करण्यासाठी वास्तव्य केले. सुरुवातीस त्याने द डेली न्यूज आणि अन्य वृत्तपत्रांतून समीक्षात्मक लेखन केले. त्याने साठहून अधिक ग्रंथ लिहिले. त्याचे त्यांपैकी बॅलड्स अँड लिरिक्स ऑफ ओल्ड फ्रान्स (१८७२) आणि बॅलड्स इन ब्लू चायना (दोन खंड : १८८०-८१) हे दोन काव्यसंग्रह गाजले. हेलन ऑफ ट्रॉय (१८८२) आणि ग्रास ऑफ पार्‌नॅसस (१८८८) हे त्याचे आणखी कवितासंग्रह होत. काव्याबरोबर त्याने द मार्क ऑफ केन (१८८६) व द डिसइन्टँगलर्स या दोन कादंबऱ्या लिहिल्या.

ललितलेखनाबरोबर लँगने सांस्कृतिक मानवशास्त्रात संशोधनात्मक लेखन करून मौलिक भर घातली. या दृष्टीने कस्टम अँड मिथ (१८८४), मिथ, रिच्युअल् अँड रिलिजन (१८८७),मॉडर्न माइथॉलजी (१८९७), मेकिंग ऑफ रिलिजन (१८९८),मॅजिक अँड रिलिजन (१९०१) इ. महत्त्वाचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांत आदिम समाजांच्या मिथ्यकथा आणि लोकविद्या यांची सांगोपांग तपशीलवार चर्चा आढळते. कस्टम अँड मिथ, आणि मिथ, रिच्युअल अँड रिलिजन या दोन ग्रंथांत त्याने धर्माच्या समजाशास्त्राची मीमांसा केली असून लोकविद्या ही धर्म, साहित्य आणि संस्कृती यांचा पाया आहे, असे मत प्रतिपादिले. याबाबतीत त्याने जेम्स फ्रेझरने पूर्वी सूचित केलेल्या संकल्पनांवर टीका केली आहे. परिकथांवरील बृहद्‌ ग्रंथाने (बारा खंड) त्याला प्रसिद्धी मिळाली. या कथांचा पहिला खंड द ब्लू फेअरी बुक (१८८९) या नावाने प्रसिद्ध झाला, तर शेवटचा खंड द लाइलॅक फेअरी बुक (१९१०) या शीर्षकाने प्रकाशात आला. तो लोककथा संस्थेचा सभासद होता. पण पुढे त्याचे फ्रेझरशी मतभेद झाले. धर्माच्या विकासाचा जडप्राणवादी सिद्धांत त्याने नाकारला कारण त्याच्या मते आदिम अस्तिकतेमध्ये नैतिकतेची कल्पना अनुस्यूत आहे. प्रिन्स प्रिजीओ (१८८९) सारख्या अभिजात बाल-वाङ्मयाच्या त्याच्या काही साहित्यकृती आहेत. याशिवाय त्याने इतिहासावर लिहिलेले पिकल स्पाय (१८९७), हिस्टरी ऑफ स्कॉटलंड फ्रॉम द रोमन ऑक्यूपेशन (४ खंड : १९००-०७), हिस्टॉरिकल मिस्टरी (१९०४) इ. ग्रंथ फारसे मान्यता पावले नाहीत कारण ऐतिहासिक सत्यापेक्षा त्यात बाजारगप्पांवरच भर आहे. होमरची इलिअड आणि ओडिसी ही दोन महाकाव्ये त्याने १८७९ व १८८३ मध्ये एस्.एच्. बुचरच्या मदतीने भाषांतरित केली. त्याने होमेरिक साहित्यातील एकरूपतेच्या प्रणालीचे समर्थन वर्ल्ड ऑफ होमर (१९१०) या अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथात केले आहे. त्याच्या लिखाणात एकप्रकारचा वैचारिक मोकळेपणा जाणवतो पण त्याच्या लोककथा व मानवशास्त्रावरील विचार इतर तज्ञांना मान्य झाले नाहीत, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याच्या निवडक ग्रंथांवर दृष्टिक्षेप टाकला असता लँग हा बहुश्रुत-व्यासंगी लेखक होता, याची जाणीव होते. तत्कालीन थोर साहित्यिकांना त्याच्याविषयी आदर होता परंतु मृत्यूनंतर त्याचे अवमूल्यन झाले व त्याचे लेखन सर्जनशील नाही, अशी टीका झाली. तरीसुद्धा एक थोर लेखक म्हणून त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल. त्याचे बँकोरी (ॲबडींनशर) येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Gosse, E. Portraits and Sketches. London, 1912.

           2. Green, R. L. Andrew Lang: A Critical Biography, Leicester, 1973.

घाडगे, विमल.