हौसा : पश्चिम आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय मोठा वांशिक समूह. त्यांची वस्ती प्रामुख्याने उत्तर नायजेरिया आणि दक्षिण नायजर या प्रदेशांत पारंपरिक वेशभूषेतील हौसा पुरुषआढळते. यांशिवाय सूदान भागात तसेच आजूबाजूच्या देशांत, विशेषतः लिबिया, लागोस येथे ते अल्पसंख्याक आहेत. पश्चिम आफ्रिका आणि सहारा वाळवंटापासून हजच्या पारंपरिक मार्गावर हौसा समूह विखुरलेला आहे. त्यांची लोकसंख्या सु. ७०,००,००० होती (२०११). राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या हा समाज पुढारलेला असून बहुतेक लोक इस्लाम धर्मीय आहेत. त्यांची वस्ती खेड्यांतून आहे. त्यांचीभाषा ‘हौसा’ ही आहे. उत्तर नायजेरियातील कॅनो परिसर हा हौसांच्या संस्कृतीचे मूळ स्थान होय. बाराव्या शतकात हौसा लोकांची मोठी सत्ता आफ्रिकेत होती. एक भाषा आणि रूढी, चालीरीती यांमधील साम्ययांमुळे त्यांच्यात वांशिक एकात्मता आढळते. एका दंतकथेनुसार बयाजीद नावाचा एक पुरुष बगदाद या आपल्या मूळ गावातून पळून जाऊन उत्तरेकडील एका लहान हौसा नगरात (दौरा) पोहोचला. तेथे त्यानेस्थानिक लोकांत दहशत निर्माण करणाऱ्या सापाचा नाश केला आणि तेथील राणीशी विवाह केला. त्यांच्या बाओ या मुलास सहा मुलगे झाले. त्यांनी गोबीर, कास्तिना, कानो, अरिया, बिराम व राणो ही सहा नगरराज्ये स्थापिली तथापि हौसांची विश्वसनीय माहिती कानो बखरीवरून होते. कानोचा पहिला राजा बागौदा हा बयाजीदचा नातू होय. तो इ. स. ९९९ मध्ये गादीवर होता. सुरुवातीला हे राजे कुठल्याही विशिष्ट धर्माचे नव्हते परंतु चौदाव्या शतकात माली राज्यातून काही धर्म प्रसारक मुसलमानांचे एक शिष्टमंडळ हौसात आले. त्यानंतर हौसात इस्लाम धर्म प्रस्थापित झाला. आफ्रिकेतील साँघहाय साम्राज्याचा विनाश (१५९१) झाल्यानंतर तेथील सहारा वाळवंटातून होणारा व्यापार या नगरराज्यांकडे वळला आणि कात्सिना व कानो या राज्यांची भरभराट झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस फुलानी या पशुपालक जमातीने इस्मान-दान फोदिओ याच्या नेतृत्वाखाली हौसांच्या नगरराज्यांचा पवित्र युद्धाद्वारे (जिहाद) पराभव करून साम्राज्य स्थापिले. त्याची राजधानी सोकतो येथे होती. 

शेती आणि मजुरी हे हौसांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य व्यवसाय असून कापूस उत्पादन, सूतकताई, विणकाम, कापडाचे रंगकाम आणि निळीचा व्यापार हे मुख्य व्यवसाय त्यांच्यात पारंपरिक पद्धतीने रूढ होते. ते मांसाहारी असून हौसा भाषेत अन्नाला ‘तुवो’ म्हणत.

हौसा ही त्यांची भाषा हॅमिटिक-सेमिटिक भाषासमूहातील असून इस्लामिक प्रभावामुळे तीत अनेक अरबी शब्द प्रविष्ट झाले आहेत.उत्तर नायजेरियाची ती जनभाषा असून शासनाची तिला अधिकृत मान्यता आहे. अनेक फुलानींची ती मातृभाषा आहे. अरबी वर्णाक्षरांच्या नियमा-नुसार तिचे लेखन केले जाते. तिच्यात विपुल गद्य-पद्य वाङ्मय आहे.

पहा : फुलानी.

 

संदर्भ : Murdock, G. P. Africa : Its Peoples and Their Culture History, London, 1959.

 

कुलकर्णी, शौनक