कोया : आंध्र प्रदेश राज्यातील एक वन्य जमात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओरिसा राज्यांतही तिची वस्ती आढळते. ती कोयी या नावानेही ओळखली जाते. ही गोंडांशी मिळतीजुळती असून १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या २,७५,४९१ होती. त्यांची भाषा गोंडी बोलीतील आहे.

ते पोडू म्हणजे स्थलांतरित पद्धतीची शेती करतात. बरेच कोया लोक अद्यापि शिकारीवरही उदरनिर्वाह करतात. काही कोया वैदू आहेत. त्यांना वनौषधींची चांगली माहिती असून ते वनस्पती गोळा करतात. ते रानात मजुरी करतात. महाराष्ट्रातल्या कोयांची जीवनपद्धती आंध्र प्रदेशातील कोयांसारखीच आहे.

एडगर थर्स्टन यांच्या कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया (खंड चौथा) या ग्रंथात कोयांबद्दलची जुनी माहिती मिळते.

गोदावरी जिल्ह्यातील कोयांना बस्तरमधल्या कोयांची भाषा समजतेच, असे नाही इतके तेलुगू मिश्रण त्यांच्या भाषेत झालेले आहे. ब्रिटिशांशी आरंभी लढताना कोयांनी रोहिल्यांना साहाय्य केले व त्या मोबदल्यात त्यांच्याकडून भत्ते मिळविले. भद्राचलम् तालुक्यातील छोटे जमीनदारही त्यांना भत्ते देऊ लागले. गोदावरी विभागातील कोया सु. अडीचशे वर्षांपूर्वी बस्तरहून या प्रांतात आले. गयाकोयी म्हणजे बस्तरचे कोया लोकही ही गोष्ट मान्य करतात. गोदावरी भागातील कोयांना ते गोम्मू कोयी म्हणज गोदावरीकाठचे कोयी आणि मायलोटील कोयी म्हणजे हलके कोयी म्हणतात. कुळींना ते गट म्हणतात त्यांचे मूळचे पाच गट होते. त्या गटांना पेरुमबोगुदू, मादोगुत्ता, पेरेगट्ट, मातामुप्पायो व विदोगुत्ता म्हणतात. परंतु खालाटीतल्या कोयांना पारेदुगुत्ता, मुंदेगुत्ता, पेराबोयिना व विकालोरू एवढेच गट माहीत आहेत. हे गट विविध कुळींत विभागले गेले आहेत.

यांची घरे बांबूची असतात. हे अत्यंत भटके लोक आहेत. ते नेहमी एक गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन राहतात. ते साधे, सरळ व सत्यवादी आहेत. पण उधळेपणा, चांचल्य व दारूपायी त्यांना हाल सोसावे लागतात. ते आळशी असून त्यांच्या भोळसटपणाबद्दल अनेक आख्यायिका प्रसृत आहेत. या दरिद्री लोकांना त्यांच्या सरळ आणि भोळसट स्वभावामुळे सावकार पिळून घेतात. शहरी व्यवहारांत ते बुजरे असले, तरी जंगलात इतर जातींनी आपल्याला दोरा म्हणजे स्वामी असे म्हटले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. अनेक जाती त्यांना मामा म्हणून संबोधतात. त्यांचा लग्नविधी साधा असतो. नवरी वाकून उभी राहते. तिच्या मागे वर वाकून उभा राहतो. त्यांच्यावर वऱ्हाडी मंडळी पाणी ओततात. मग वधूवरांना थोडे दूध एका भांड्यातून प्यायला देतात. मग त्यांना नांदण्यास सांगून वडील माणसे त्यांच्यापुढे भात ठेवतात. तो भात ते खातात. मग वधूवर घराबाहेर पडून मांडवाकडे जातात. त्यात एक मातीचा ढीग असतो. त्याला ते प्रेमगीत गात प्रदक्षिणा घालतात. मग मोठ्या माणसांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतात. लग्नाच्या रात्री नाच-गाण्याचा बेत त्या त्या घरच्या ऐपतीप्रमाणे व जमातीच्या रीतिरिवाजाप्रमाणे होतो.

बाळंतपणात कोया स्त्री नेहमीप्रमाणेच वागते. ती थंड पाण्यात नहाते, नेहमीचे अन्न खाते व बाजेवर न झोपता जमिनीवरच झोपते. मुलाचा जन्म झाला की त्याला झोपवून आई पाणी भरते. लाकडे जमवून आणणे, स्वयंपाक करणे वगैरे सारी कामे करते. सातव्या दिवशी मुलाला आंघोळ घालतात व त्याच्या हातात मोहाच्या झाडाचे पान देऊन त्याचे नामकरण करतात. त्यानंतर दारू, जेवण वगैरे होऊन नाच-गाण्याचा कार्यक्रम रात्री होतो. कोयांना नृत्याची आवड आहे.

ते भूदेवीची पूजा करतात. प्रतिवर्षी तिची जत्रा भरते. पूर्वी तिला नरबळी देण्याची चाल होती. त्यांच्यात चार मुख्य सण असतात. बिज्ज पांडू, बुमुद पांडू, कोडता पांडू आणि इक्क पांडू, बिज्ज पांडू वैशाख-ज्येष्ठात येतो. त्या वेळी भूदेवीची पूजा करून तिला कोंबडा अगर बोकड बळी देतात. त्या दिवशी जे बी पेरायचे असेल, ते देवीपुढे ठेवतात. बिमुद पांडू अगर बुमुद पांडू या माघ महिन्यात येणाऱ्या सणाच्या दिवशी इंद्रदेव ऊर्फ पर्जन्यदेव व त्याची बायको यांच्या मातीच्या प्रतिमा मोहाच्या झाडाखाली ठेवून त्यांची पूजा करतात. त्याच्यातील प्रमुखाला पेडा म्हणतात. ग्रामपंचायतीचा तो मुख्य असतो. उपाध्यायाला ते पेरमा अगर पुजारी म्हणतात. देवतांची पूजा करून शेतीची समृध्दी कायम ठेवणे, हे त्यांचे मुख्य काम असते.देवऋषीला ते बड्डे म्हणतात. उपाध्यायाप्रमाणे तोही देवतांचा आणि मृतात्म्यांचा संपर्क साधतो. पुजारी पिढीजात असतो. कोयांची मंत्र सिद्धीबद्दल ख्याती आहे. अंबिकेश्वराने आपल्याला ही विद्या शिकविली असे ते म्हणतात.

कुटुंबाला ते लोटाम म्हणतात. त्यांचे संयुक्त कुटुंब असते. त्यांच्या पाच कुळी आहेत : (१) कोवासी, (२) ओडी ऊर्फ सोडी, (३) मडकम, (४) माडी, (५) पदिअम. या कुळी अनेक गोत्रांत विभागल्या गेल्या आहेत. लग्न आते-मामे नातेसंबंधात होते. कोयांत मुलगे लहानपणीच ‘जुरिकर्सितारे’ नावाचा धनुष्यबाणाचा खेळ खेळून नेमबाजीत तरबेज होतात. कोयांना शिकारीचा छंद असतो. मूल महिन्याच्या आत वारले, तर त्याला घरात पुरतात. एरवी मात्र प्रेते जाळतात. मृताच्या अंगावरचे वस्त्र पुजाऱ्याला देतात. मृतासाठी गाय किंवा बैल मारतात आणि त्याचे यकृत मृताच्या मुखी घालतात. मृताच्या अस्थी पुरतात आणि त्यावर एक उभ्या पाषाणाच्या स्मारकाची स्थापना करतात.

संदर्भ : Mohapatra, P.K. Koya –Adibasi, Bhubaneswar, 1964.

भागवत, दुर्गा