येनाडींचेयेनाडी : दक्षिण भारतातील एक वन्य भटकी जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर, कडप्पा आणि कुर्नूल जिल्ह्यांत आढळते. याशिवाय तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतूनही येनाडींची काही प्रमाणात वस्ती आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या २,३९,४०३ होती. येनाडींच्या दोन जातकुळी आहेत : मंच्ची (उच्च) आणि चल्ल (कनिष्ठ). मंच्ची येनाडींना रेड्डी यानडी म्हणतात. चल्लांना कप्पल (बेडूक खाणारे) म्हणतात. येनाडी तमिळमिश्रित तेलुगू भाषा बोलतात.

येनाडी या नावाच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहेत. अनादी-यनादी-यानाडी अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. इरुला, चेंचू व येनाडी एकाच शारीर व सांस्कृतिक गटातील लोक असून तपकिरी वर्ण, ठेंगू शरीरयष्टी, कुरळे केस, अरुंद कपाळ व रुंद चपटे नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत.

हे अर्धनग्न अवस्थेत भटके जीवन जगतात. स्त्रिया जेमतेम उरोभाग झाकतात, पुरुष लंगोटी वापरतो. हे कधीही घरे बांधून एका जागी राहत नाहीत. शिकार, मासेमारी, जंगलातील मध, लाकूडफाटा, औषधी वनस्पती इ. गोळा करून विकणे व साप पकडणे हे यांचे प्रमुख धंदे होत. कंदमुळे खणण्यासाठी दोन्ही बाजूंना टोक असलेली लांब काठी (गसिक कर्रा) ते वापरतात. कालव्यात अगर तळ्यात सापळे (कोडलू) लावून जाळी (चुव्वलू) टाकून गरी (गलपू) च्या साहाय्याने ते मासे पकडतात. नागरीकरणामुळे काही येनाडी मोलमजुरी करू लागले आहेत. क्वचित काही पोलीस खात्यात आणि पहारेकरी म्हणूनही काम करताना दिसतात आणि गावात नाल्यांच्या काठावर, तळ्याच्या पाळीवर झोपड्यांत राहतात.

येनाडी मांसाहारी असून हरिण, बकरा, ससा, उंदीर, सरडा, मुंगूस इ. प्राण्यांचे मांस व मासे भाजून खातात. ताडगोळे व शहाळी तसेच तांदळापासून केलेली दारू त्यांना फार आवडते मात्र दूध व दुधाचे कोणतेही पदार्थ ते खात नाहीत. औषधी वनस्पतींचा उपयोग यांना माहीत असल्यामुळे साप व विंचू यांच्या विषावर ते औषधोपचार करतात. ताप, संधिवात आदी रोगांवरही त्यांच्याकडे औषधे असतात.

प्रथम रजोदर्शनाच्या वेळी मुलीला स्वतंत्र झोपडीत ठेवतात. तिला भुताखेतांचा त्रास होऊ नये, म्हणून तिच्या चटईच्या चार कोपऱ्यांवर सुपारीचा विडा ठेवतात. नंतर पाचव्या दिवशी तिला नऊ वेळा आंघोळ घालतात आणि त्या झोपडीतील सर्व साहित्य जाळतात.

येनाडींमध्ये वयात आल्यानंतर तरुण-तरुणी परस्परांची निवड करतात. मामाला अग्रक्रम देण्यात येतो. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणाबरोबर लग्न करावयाचे झाल्यास मामाला द्रव्य द्यावे लागते. लग्नात ताली बांधणे हा प्रमुख विधी असून कुंकवाला फार महत्त्व असते. विवाहबाह्य लैंगिक संबंधास जमातीत फारसे निर्बंध नाहीत. पलायनविवाह पद्धतीही प्रचलित आहे. विधवाविवाह व घटस्फोट यांना मान्यता असून बहुपत्नीकत्वाचीही चाल आढळते. काही येनाडी लैंगिक संबंध ठेवूनही लग्न टाळतात किंवा वैवाहिक बंधने पाळत नाहीत.

या लोकांना नृत्याची फार आवड आहे. घरासमोरच्या अंगणात ते नाचतात. त्यांचे घोडा-नृत्य व मोराचा नाच प्रसिद्ध असून मोराची पिसे व तुरा लावून पुरुष नृत्य करतात. हिवाळ्यात रात्री शेकोटीपुढे वाघ व शेळीचा खेळ ते पट मांडून खेळतात. एकतारी, चितार व ढोलके ही त्यांची वाद्ये.

येनाडी जडप्राणवादी असून भुताखेतांवर त्यांचा विश्वास आहे. क्रूर भुतांना ते गली किंवा दय्यम म्हणतात. कडुलिंबाच्या झाडाला ते पूज्य मानतात. सुब्बारायडू, वेंकटेश्वरेलू, नरसिंहुलू, पंचल हे त्यांचे प्रमुख देव असून पोलेरम्म किंवा अंकम्म ही त्यांची ग्रामदेवता आहे. चेंचू देवुडू ही गृहदेवता आहे. पितरपूजाही रूढ आहे. नागचतुर्थी (नागुल चविती) हा त्यांचा खास सणाचा दिवस.

मृतांना ते पुरतात. सोळा दिवस अशौच पाळतात. तिसऱ्या दिवशी चिन्नदिनम्‌ नावाचा विधी करतात. पेड्डदिनम्‌च्या प्रसंगी नाचगाणे होऊन उपस्थितांना मेजवानी दिली जाते.

संदर्भ : 1. Raghaviah, V. The Yanadis, Delhi, 1962.

2. Sherring, M. A. Hindu Tribes and Castes, Vol. III, Delhi, 1974.

3. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol. VII, Madras, 1965.

भागवत, दुर्गा