मलयन : दक्षिण भारतातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यतः केरळ राज्यातील त्रिचूर, कोट्टयम, कननूर, पालघाट व कोझिकोडे या जिल्ह्यांत आढळते. त्यांच्या नावाची व्युत्पत्ती अल (लोक) आणि मल (डोंगर) यांवरून मलयन-डोंगरातील रहिवासी- अशी देतात. यांच्या दोन प्रमुख शाखा आहेत : कोंगा मलयन व नट्‌टू मलयन. कोंगा मलयन शिवपार्वतीचे तर नट्‌टू मलयन शूर्पणखेचे वंशज मानतात. मलयनांच्या बहिर्विवाही नऊ कुळी असून त्यांतील पांच प्रमुख आहेत. त्या अशा : कोटूकुडी, वेलूपा, चेनी, पलानकुडी आणि काल्लीथ. यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार ३,६१६ होती. मलयन सुदृढ बांध्याचे असून मध्यम उंची, काळा वर्ण, अजानबाहू, जाड ओठ, रूंद नाकपूड्या  ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्री−पुरूषांना दागिन्यांची आवड असून स्त्रीया कानांत, हातात, गळ्यात अलंकार घालतात पुरूष कानांत बाळ्या घालतात. स्त्री- पुरूष दोघेही केस वाढवितात पुरूष कधीही केस कापत नाही. ते केसांची गाठ पुढे किंवा मागे बांधतात. स्त्री-पुरूष दोघेही अर्धनग्न अवस्थेत राहत असत पण आधुनिकीकरणामुळे मलयन स्त्री (मलयथी) पोलके, साडी आदी वापरू लागली आहे. हे लोक मांसाहारी असून गोमांसही खातात व मद्यपानही करतात परंतु हे गिधाडाचे आणि लांडग्याचे मांस खात नाहीत. नट्‌टू मलयन मलयाळमची अपभ्रष्ट बोली बोलतात तर कोंगा मलयन तमिळची अपभ्रष्ट बोली बोलतात. यांचा मुख्य व्यवसाय जंगलातील वनस्पती, कंदमुळे, बांबू आणि लाकूड गोळा करून विकणे हा आहे तथापि काही लोक शेतमजूरी, कुक्कुटपालन  व गुरे पाळतात तर काही माहूत म्हणूनही काम करतात.

यांची वस्ती विखुरलेली तकलुपी झोपड्यांतच असते. तिला पड्डी किंवा छल म्हणतात. या झोपड्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात आणि बांबू, झाडांच्या फांद्या, गवत, पाने यांपासून बनविलेल्या असतात. घराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असते.

मुलेमुली वयात आल्यावर बहिर्विवाह कुळींत विवाह करितात. विवाह वडीलधारी व्यक्ती ठरविते. नट्‌टू मलयनांत वधूच्या गळ्यात वराची आई ताली बांधते. कोंगा मलयनांत तांब्याची ताली वधूच्या गळ्यात बांधतात. हा विधि अत्यंत महत्वाचा मानला जातो. नंतर वधूवर एकाच पत्रावळीत जेवतात. वधूमूल्य पद्धत रूढ असून साधारणतः वधूमूल्य दहा रूपयांपर्यंत देतात. क्रय-विवाह व अपहरण विवाहपद्धती यांत अधिक प्रचलित आहेत. परित्याग, घटस्फोट,विधवाविवाह, पुनर्विवाह यांना मान्यता असून घटस्फोटात स्त्रीने पुढाकार घेतल्यास वधूमूल्य परत द्यावे लागते. बहुपत्नीकत्वाची प्रथा असून बहुपतित्वही क्वचित आढळते. मात्र कुळातील नातेसंबंधांत विवाहास अग्रक्रम देतात. नट्‌टू मलयन लोकांत मातृसत्ताक कुटुंबपद्धती, तर कोंगा मलयन लोकांत पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे.

रजस्वला मुलीस पाच दिवस स्वतंत्र झोपडीत, तर स्त्रीस प्रसूतीनंतर सात दिवस स्वतंत्र झोपडीत ठेवतात. प्रसूतीनंतर एक महिन्याच्या आत मुलाचे नाव ठेवतात. प्रसविका जननशौचानंतर घरात प्रवेश करताना तांदळाचे माप व दिवा हातात घेऊन येते.

या जमातीत गाव पंचायत असून पंचायत-प्रमुखास गावातील धार्मिक, सामाजिक, लग्नविधी  इ. समारंभांत महत्वाचे स्थान असते. प्रारंभी हे कट्टर जडप्राणवादी होते. हिंदूंच्या संपर्कामुळे ते हिंदूंच्या देवांना भजू लागले आहेत. वीरभद्र, भद्रकाली, काम, रती, मरीआई इ. देवतांना ते भजतात. पूर्वी  पिशाच्च परिहार हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. त्यांना संगीत आणि नृत्याची आवड आहे. ते आपल्या धार्मिक विधींत मुखवटे घालून संगीतप्रधान नृत्ये करतात. निनेव्हेली हा त्यांचा मुखवटे घालून नृत्य करण्याचा हिंसक विधी असून त्यात अंगाला रंग फासतात. नवे तांदूळ हातात घेऊन पुजारी त्यावेळी बेभान होऊन नाचतो आणि तो आपल्या तोंडात जिवंत पक्षी धरून तो दातांनी चावून त्याचे रक्त पितो तर तियत्तन या धार्मिक विधीत फक्त मुखवटे घालून नृत्य करतात. उच्छवेली हा नरबलीचा प्रतीकात्मक विधी आहे. हे लोक देवतेस पशू बळी देतात. सर्व धार्मिक विधी साधारणतः रात्री करतात.

मृतास आंघोळ घालून नव्या कपड्यात गुंडाळून उत्तरेकडे डोके ठेवून पुरतात. पुरलेल्या ठिकाणी स्मारक-शिळा उभारतात. पुतण्या सर्व अंत्यविधी करतो. गावातील वृद्ध पुरूषाबरोबर त्याची अवजारेही पुरतात. पती निधनानंतर पत्नीत तीन दिवस अलंकार व रंगीत कपडे वापरत नाही. मृताशौच १५ दिवस पाळतात. 

 

संदर्भ :  1. Luiz, A. A. D. Tribes of Keral, New Delhi, 1962.

             2. Thurston, Edgar, Castes &ampTribes of Southern India, Vol.IV, New York, 1965. 

 

शेख, रूक्साना