लेव्ही-ब्र्यूल, ल्यूस्यँ : (१९ एप्रिल १८५७-१३ मार्च १९३९). फ्रेंच तत्त्वज्ञ आणि प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात पॅरिस येथे झाला. त्याने लायसी-शार्लमेन विद्यालयातून संगीत, तत्त्वज्ञान आणि निसर्गविज्ञान यांचा अभ्यास केला. इकॉल नॉर्मल सुपेरिअर महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर (१८७९) त्याने स्वतःस समाजशास्त्र –मानवशास्त्र यांच्या अभ्यासास वाहून घेतले. सुरुवातीस काही वर्षे तो प्वॉत्ये आणि ॲमयॅ या महाविद्यालयांतून अध्यापन करीत असे. त्यानंतर तो डॉक्टरेटच्या संशोधनासाठी पॅरिस विद्यापीठात दाखल झाला आणि त्याने पीएच्.डी. ही पदवी मिळविली (१८८४). प्रारंभी पॅरिस विद्यापीठात तो शिकविण्याचे काम करीत असे. या काळात त्याने आधुनिक फ्रेंच तत्त्वज्ञानाचा इतिहास आणि जर्मन तत्त्वज्ञान यांवर अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यानंतर त्याची सॉरबॉन विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली (१८९६).

 

सॉरबॉन विद्यापीठात असताना त्याच्या विचारांवर फ्रेंच तत्त्वज्ञ ऑग्यूस्त काँत व एमील द्यूरकेम यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्याने ल मोरॅल एत ल सायन्स देस मोयर्स (१९०२) हे पुस्तक लिहिले. त्याचे तत्काल इंग्रजी भाषांतरही इथिक्स अँड मॉरल सायन्स या शीर्षकाने  प्रसिद्ध झाले (१९०५). त्याच्या या पहिल्या ग्रंथावर ऑग्यूस्त काँत याच्या प्रत्यक्षार्थवादाचे प्रतिबिंब पडलेले आढळते. या पुस्तकात त्याने सापेक्षीय समाजशास्त्राची बहुसत्तावादी पार्श्वभूमी सांगून, सैद्धांतिक सदाचरण याचे सदैव अस्तित्व राहील, याची शाश्वती नाही, हे मत प्रतिपादन केले आहे. सॉरबॉन विद्यापीठात त्याची प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली (१९०४). या पदावर तो निवृत्त होईपर्यंत होता (१९२७). त्याला आदिम मानवाच्या वैचारिक भूमिकेविषयी अधिक रस होता. म्हणून तो मानवशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. त्याने मॉर्सेल मॉस आणि पॉल रिव्हे यांच्या सहकार्याने सॉरबॉन येथे इन्स्टिट्यूट ऑफ इथ्नॉलॉजी ही एमील द्यूरकेमच्या स्मरणार्थ संस्था स्थापन केली (१९१८). पुढे या संस्थेत त्याचे मतभेद आल्याने त्याने राजीनामा दिला (१९२७) आणि उर्वरित जीवन लेखन-प्रवासात व्यतीत केले. Revue Philosophique या नियतकालिकाचे तो संपादन करीत असे. निवृत्तीनंतर हार्व्हर्ड, जॉन हॉकिन्स व कॅलिफोर्निया या विद्यापीठांतून अभ्यागत व्याख्याता म्हणून त्याने अनेक व्याख्याने दिली. पॅरिस येथे तो मरण पावला.

त्याने आदिम मानवाची मनोवृत्ती व स्वभाव-विशेष यांवर लक्ष केंद्रित केले आणि त्याची चर्चा हाऊ नेटिव्हज थिंक (इं. शी. १९२६) या पुस्तकात केली. एमील द्यूरकेम या तत्त्ववेत्त्याकडून समूहिक रूपणाची संकल्पना त्याने आत्मसात केली.

या संकल्पनेत आधुनिक पाश्चात्त्य मानव आणि आदिम मानव यांत वैचारिक पातळीवर मूलभूत फरक आहे, अशी त्याची धारणा होती. त्याने असे सुचविले की, आदिम मानवाच्या श्रद्धा आणि संवेदना या तीत वसत असलेल्या गूढवादामुळे प्रसृत होतात आणि आदिम मानवाचा स्वभाव हा जरी प्रत्यक्षात तार्किक नियमांविरुद्ध नसला, तरी त्याचे अनुशासन पूर्णतः तार्किक दृष्टया होत नाही. म्हणून तो म्हणतो, की ‘आदिम मानवाची मनोवृत्ती पूर्वतार्किक व गूढात्मक (गूढवादी) असते तर सुशिक्षित मानव विवेकशील व आधुनिक शास्त्रांचा परिणाम झालेला असतो. ते एकाच पद्धतीने विचार करू शकत नाहीत’. ही त्याची उपपत्ती पुढे मानवशास्त्रज्ञांनी खोडून काढली.

लेव्ही-ब्र्यूलने मुख्यतः फ्रेंच भाषेत लेखन केले. त्याच्या स्फुटलेखनाव्यतिरिक्त त्याने आणखी काही महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्या ग्रंथांतून त्याने प्रामुख्याने आदिम मानवाच्या मूळ स्वभावाविषयीच्या संकल्पनेचा ऊहापोह केला आहे. त्याच्या बहुतेक सर्व ग्रंथांचे इंग्रजीत अनुवाद झाले असून मेन्टल फंक्शन्स इन प्रिमिटिव्ह सोसायटीज (१९१०), प्रिमिटिव्ह मेन्टॅलिटी (१९२२), द सोल ऑफ द प्रिमिटिव्ह (१९२८), द सुपर नॅचरल अँड द नेचर ऑफ द प्रिमिटिव्ह माइन्ड (१९३१), प्रिमिटिव्ह मायथॉलॉजी (१९३५) आणि द मिस्टिक इक्सपीअरिअन्स अँड प्रिमिटिव्ह सिम्बॉलिझम (१९३८) या ग्रंथांतून त्याच्या आदिवासींविषयीच्या अभ्यासाची कल्पना येते. अखेरच्या दिवसांत त्याला आपल्या उपपत्तीतील उणिवांची जाणीव झाली होती, हे त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या Les Carnets de Levy-Bruhl (१९४९) या पुस्तकावरून लक्षात येते. या अभ्यासामुळे मानवशास्त्राच्या अभ्यासास नवीन दिशा मिळाली. आदिम मानवाचा धर्म आणि मिथ्यकथा यांचे आकलन होण्यास त्याच्या संशोधनाने चालना मिळाली.

संदर्भ : 1. Cazeneuve, Jean, Lucien Levy-Bruhl, Paris, 1972.  

           2. Evans-Pritchard, Edward E. Theories of Primitive Religion, Oxford, 1967.  

           3. Hays, H. R. From Ape to Angel : An Informal History of Social Anthropology,

               Madison, 1958.

           4. Penniman, T. K. A Hundered Years Anthoropology, London, 1965.

 

देशपांडे, सु. र.