बांतू : आफ्रिका खंडातील अनेक वेगवेगळ्या आदिवासी जमातींचा निर्देश स्थूलमानाने बांतू लोक म्हणून करण्यात येतो. लोकसंख्या सु. ७ कोटी (१९७१). बांतू भाषा आणि तिच्या अनेक बोलीभाषा एवढाच एक समान विशेष त्या अनेक आदिवासी जमातींत आहे. ‘बांतू’ या शब्दाचा अर्थ ‘लोक’ असाच आहे. बांतू जमातीची विभागणी पश्चिम, दक्षिण आणि मध्य अशा प्रादेशिक पद्धतीने पुष्कळदा केली जाते तथापि ही विभागणी शास्त्रीय स्वरुपाची नाही. सामान्यपणे सर्व बांतू जमातींच्या व्यक्ती वर्णाने काळ्या असून त्यांच्या शरीराची ठेवण उंच, मध्यम किंवा ठेंगणी असते. विषुववृत्तीय जंगलाच्या प्रदेशातून हे लोक सर्व आफ्रिकेभर पसरले असे मानले जाते. सामान्यपणे दोन हजार वर्षांपूर्वीपासून बांतू जमातींचे स्थलांतर सतत चालू होते.

 

माता व मूल : वाकोंगा काष्ठशिल्प, मायूम्बा, बेल्जियन काँगो.बॅसोंज जमातीची लाकढी ढाल, काटांग्गा, बेल्जियन काँगो.बांतू भाषेच्या अनेक बोली भाषा या जमातींत रुढ आहेत. यांतील प्रत्येक जमातीची संघटना मजबूत असते. त्यांच्यात एक सेनाप्रमुख व एक औद्योगिक प्रमुख असतो. जमीन समाजाच्या मालकीची असते.

 

शेतीचे काम स्त्रिया पाहतात आणि पुरुष शिकार करतात व गुरे पाळतात. सुती व लोकरी कापड विणण्याची कला त्यांना अवगत आहे. बहुतेक बांतू जमातींत बहुपत्नीत्व रुढ आहे. मका हे त्यांचे मुख्य पीक होय. किनाऱ्‍यालगतच्या जमातींत मासेमारी हाच मुख्य धंदा आढळतो. काही जमातींत कातडी पिशवीत दूध ठेवून ते नासवतात व मगच ते पिण्यासाठी वापरतात.

 

काही जमातींत विवाहप्रसंगी मुलीच्या नातेवाईकांना गाई देतात. काही जमातींत शरीरावर चित्रविचित्र आकाराच्या जखमा करून त्यांचे जे व्रण उठवतात, ते सौंर्दय लक्षण समजतात. काही जमातींत चंद्र उगवतीच्या दिवसांचे विशेष महत्त्व असून ते सामूहिक नाच गाण्यातून व्यक्त करतात. काही बांतू जमातींत प्रमुख व्यक्तीच्या मरणानंतर त्याच्याबरोबर अनेक सेवकांची मुद्दाम हत्या करून त्याबरोबरच त्यांना पुरण्यात येते.

संदर्भ : 1. Hobley, C. W. Bantu Beliefs and Magic, New York, 1967.

2. Mutwa, V. C. My People, New York, 1971.

कीर्तने, सुमति