मेडा ऊर्फ मेडार : दक्षिण भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे कर्नाटक राज्यात आढळते. त्यांची लोकसंख्या ३२५ होती (१९७१). म्हैसूर जिल्ह्यात त्यांना गौरिगा म्हणजे गौरीची संताने असे म्हणतात. काहीजण आपण विदुराचे वंशज आहोत असे सागंतात. नंदीच्या मुखातून पार्वतीसाठी सूप तयार करण्यासाठी जो पुरुष जन्माला आला त्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली, असे ते म्हणतात. गवरिया, पल्ली, मेडार व बंडीकार मेडार असे त्यांचे पोटविभाग आहेत. या प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या कुळी देवकपद्धतीवर आधारलेल्या आहेत. बांबूपासून टोपल्या, चट्या, सुपे, तट्टे इ. वस्तू तयार करणे, हा यांचा प्रमुख धंदा आहे. काही लोक शेती व मजूरीही करतात. बहुतेक मेडा मासांहारी असून त्यांना दारू आवडते.

त्यांच्यात बहिर्विवाही कुळींत विवाह होतात. प्राधान्याने मामे बहिणीशी विवाह होतो. मेहुणीविवाहही प्रचलित आहे. लग्नात वधूच्या गळ्यात ताली-मंगळसूत्र-बांधतात. घटस्फोट व विधवाविवाह रूढ आहे. त्यांच्यात पंचायत पद्धत असून प्रमुखाला यजमान ऊर्फ गोड-गुला म्हणतात. ते हिंदू असून शैव व वैष्णव पंथांचे आहेत. दुर्गम्मा, कुवक्कवद्दम्मा, मल्लमा व चौडम्मा या त्यांच्या देवता आहेत. दिवाळीनंतर नव्या बांबूची पूजा करायला ते जंगलात जातात. सर्वसाधारणतः मृतांना ते पुरतात. आकस्मिक मृत्यू आलेल्यास जाळतात. मृताशौच १२ दिवस पाळतात.

संदर्भ : 1. Iyer, V. L. A., The Mysore Tribes &amp Castes, Vol. IV. Mysore, 1935.

            2. Thurston, Edgar, Castes &amp Tribes of Southern India, Vol. V. New York, 1965. 

भागवत, दुर्गा