हूटन, अर्नेस्ट आल्बर्ट : (२० नोव्हेंबर १८८७–३ मे १९५४). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील प्रसिद्ध शारीरिक मानवशास्त्रज्ञ.त्याचा जन्म क्लेमन्सव्हील (विस्कॉन्सीन) येथे सुशिक्षित कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्याने लॉरेन्स कॉलेज (ॲपलट) मधून बी. ए. (१९०७) आणि विस्कॉन्सीन विद्यापीठातून एम्.ए. (१९०८) व पीएच्.डी. (१९११) या पदव्या संपादन केल्या. नंतर तो ऑक्सफर्ड विद्यापीठात र्‍होड्स स्कॉलर म्हणून गेला. तेथे अचानक त्याने अभिजात साहित्याकडून आदिवासींच्या जीवनाकडे आपले लक्ष केंद्रित केलेआणि शारीरिक मानवशास्त्राचा अभ्यास करून ऑक्सफर्ड विद्यापीठातून मानवशास्त्र विषयात पदविका (१९१२) व नंतर संशोधन करून पदवीमिळविली (१९१३). त्याच वर्षी त्याची हार्व्हर्डमध्ये अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे १९३० मध्ये तो प्राध्यापक झाला आणि अखेरपर्यंत तिथेच अध्यापनात व्यस्त होता. 

 

 अर्नेस्ट आल्बर्ट हूटनऑक्सफर्डच्या वास्तव्यात हूटनवर तेथील मानवशास्त्रज्ञांची छाप पडली. विशेषतः रॉबर्ट मॅरेट याची. सुरुवातीला हूटनने सांस्कृतिक मानवशास्त्राचे काम केले असले, तरी शारीरिक मानवशास्त्रामधील निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न हाताळताना त्याला शारीरिक मानवशास्त्राची जास्त आवड उत्पन्न झाली व त्यामुळे त्याला मुख्यतः शारीरिक मानवशास्त्रज्ञ म्हणूनच मान्यता प्राप्त झाली. मानवाची उत्क्रांती, वंशभेद, मानवी समाजाचे वर्गीकरण व वर्णन, व्यक्तिमत्त्व व शरीरप्रकार आणि त्यांचा गुन्हेगारी वर्तणुकीशी असलेला संबंध इ. विषयप्रकारांवर त्याचे कार्य आहे. मानवी समाजांचे व मानवी गटांचे वर्गीकरण (थोडक्यात, वंशवर्गीकरण) हा त्याचा आवडता विषय त्याच्या बहुतेक सर्वच लिखाणामधून दृष्टोत्पत्तीस येतो. हार्व्हर्ड विद्यापीठ हे शारीरिक मानवशास्त्राचे एक प्रमुख व महत्त्वाचे केंद्र बनविण्याचे कार्यत्याने केले (१९३०). अमेरिकेतील कित्येक व्यावसायिक शारीरिक मानवशास्त्रज्ञ त्याचे विद्यार्थी आहेत. आपल्या लिखाणाद्वारे शारीरिक मानवशास्त्राची महती त्याने सर्वसामान्यांना पटवून दिली. त्याच्या एप फ्रॉम द एप (१९३१) ह्या ग्रंथाच्या प्रसिद्धीच्या उच्चांकावरून याची प्रचिती येते. शारीरिक मानवशास्त्राची पारंपरिक रूपरेषा ह्या ग्रंथाद्वारे त्याने सांगितली. अद्यापही या ग्रंथाचा पाठ्यपुस्तक म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या इतर ग्रंथांपैकी द एन्शन्ट इन्हॅबिटन्ट्स ऑफ कॅनरी आयलंड्स (१९२५), एप्स, मेन अँड मॉरॉन्स (१९३७), क्राइम अँड द मॅन (१९३९), व्हाय मेन बिहेव्ह लाइक एप्स अँड व्हाइसव्हर्सा (१९४०), मॅन्स पुअर रिलेशन्स (१९४२) वगैरेंचा उल्लेख करावा लागेल. तो ‘आफ्रिकन स्टडीज’ या हार्व्हर्डप्रसृत मालेचा संपादक होता (१९१८–३३). 

 

अल्पशा आजाराने त्याचे केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे निधन झाले

कुलकर्णी, वि. श्री.