बदागा : कर्नाटक राज्यातील एक जमात. यांची वस्ती मुख्यत्वे कूर्ग जिल्ह्यात आढळते. निलगिरी पर्वतरांगांतून काही बदागा राहतात. पूर्व द्राविडियन वंशापासून यांची उत्पत्ती झाली असावी. हे लोक वर्णाने गोरे असून मध्यम बांधा व लांब डोके ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्रिया या विशेषतः लाजाळू आढळतात. स्त्री-पुरूषांचा पोशाख साधा असतो. स्त्रिया चोळी व लुगडे नेसतात. त्यांना दागिन्यांची आवड असते. ते कन्नड भाषा बोलतात.

बदागांचे

डोंगरमाथ्यावर एका ओळीत सामूहिक छपरे असलेली घरे ते बांधतात. घराला दोन खोल्या तसेच पुढील बाजूस ओटा व मागील बाजूस गोठा असतो. घराच्या एका बाजूस दूध साठवून ठेवतात. तेथे स्त्रियांना जाण्यास मज्जाव असतो.

शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून ते गहू, सातू, कांदे, लसूण, बटाटे तसेच कॉफी व संत्री पिकवितात. शेतीची कामे मुख्यत: स्त्रियाच करतात. पुरूषांपेक्षा स्त्रियांना शेतमजुरी जास्त मिळते. याशिवाय अनेक जण मोल-मजुरी व नोकरी पेशातही गेले आहेत.

बदागांत सहा शाखा आहेतः उदय, हारूव, अधिकारी, कनक, बदक व तोरेय. तोरेय शाखेतील लोकंना सर्वांत कनिष्ठ समजतात. गावातील मृत्यूची बातमी देणे, प्रेत नेणे वगैरे कामे ते करतात. गावातील श्रीमंत पुरूष वंशपरंपरेने गावप्रमुख होतो. गावातील तंटे-बखेडे सोडविणे, गुन्हेगारास सजा करणे व विवाहविषयक सल्ला देणे, ही त्यांची कामे होत.

सगोत्र विवाह संमत नाही. विवाह वयात आल्यानंतर माता-पित्यंच्या संमतीने ठरतात. विधवा विवाह, देवर विवाह (उदय सोडून) मान्य आहेत. लग्नात वधूमूल्य द्यावे लागते.

मुलाचे बारसे सातव्या, नवव्या किंवा अकराव्या दिवशी करतात. गावातील सर्वांत वृद्ध व्यक्तीच्या हस्ते मुलाचे नामकरण केले जाते. प्रथम प्रसूती घरात होऊ नये असे मानतात. घराच्या सज्जात प्रसूतीची व्यवस्था करतात. प्रथम गर्भारपणाचे वेळी सातव्या महिन्यात विशेष विधी करतात. याद्वारे विवाह संबंधावर शिक्कामोर्तब होते व पितृत्व सिध्द करता येते. बदागांत मुलगा ७ किंवा ९ वर्षांचा असताना त्यास गाई-म्हशीचे दूध काढण्याची समारंभपूर्वक दीक्षा देतात. गाय-म्हैस प्रथमच व्याली असताना दूध काढण्यासाठी एका मुलाची खास व्यवस्था करतात. चटईवर झोपणे, मांस भक्षण व अस्पृश्यांची संभाषण या गोष्टी निषिद्ध मानतात. उदयशिवाय सर्व खेड्यांत रजस्वस्त्रीकरता गावाबाहेर झोपडी बांधतात. देवधर्म, पेरणीच्या व कापणीच्या वेळी विशेष विधी करतात, यावेळी पुजारी लागतो.

हे लोक हेथ्थेस्वामी, महालिंगस्वामी, हिरीया उदय, माडेश्वर, मांकाली, जडेस्वामी इ. देवतांना भजतात. गावाबाहेर क्रॉमलेक्‌स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या शिळा(दगड) एका रांगेत उभ्या केलेल्या असतात. त्यांवर चंद्र, सूर्य, मानव, पशू इ. आकृत्या कोरलेल्या असून हे कोरीव काम पूर्वजांनी केले अहे, अशी बदागांची समजूत आहे. कोणत्याही समारंभप्रसंगी बळी देण्याचा विधी या शिळांसमोर होतो.

मृतावस्थेत आलेल्या व्यक्तीस तुपात कालवलेले नाणे गिळावयास देतात. मृताचे दहन करतात. उदय लोक मृतांना बसलेल्या स्थितीत पुरतात. मृताकरिता विशिष्ट प्रकारची शिडी करतात, त्याच्या कपाळावर दोन रूपये चिकटवितात व भाकऱ्या, लाह्या, गूळ, तंबाखू, ठेवतात. अस्थी गावातच पुरतात. उदय लोकांमध्ये श्राद्धविधीत सात मजली रथ करतात. पितरांचे आत्मे यावर बसून केळी खातात, अशी समजूत आहे.

संदर्भ : Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol.I. Madras. 1975.

मांडके, म. वा.