मानवप्राणि: पृथ्वीवरील सर्व सजीवांचे दोन वर्ग पडतात : वनस्पतिसृष्टी व प्राणिसृष्टी. मानवाचा समावेश प्राणिसृष्टीमध्ये मानवाचे नेमके स्थान कोणते? मानव कोण आहे? हे प्रश्न अनेक काळापर्यंत सर्व थरांतील लेखक, कवी, तत्त्ववेत्ते, इतिहासकार इत्यादींना भेडसावत होते. ‘उन्नत आसनाचा, दोन पायांवर चालणारा, केसविरहित प्राणी म्हणजे मानव’ असे वर्णन ॲरिस्टॉटलने केले. तसेच उत्क्रांतीच्या संकल्पना व सिद्धान्त यांच्या आधारावर चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यापासून दोन पायांवर चालणाऱ्या मानवप्राण्याची उत्क्रांती झाली, हेही निर्विवादपणे सिद्ध केले गेले आहे. परंतु हा मानवप्राणी काहीसा इतर प्राण्यांसारखा तर इतर प्राण्यांपेक्षा काहीसा वेगळाही आहे. इतर प्राण्यांत सहसा न आढळणारे किंवा अभावानेच आढळणारे गुण मानवप्राण्यात आहेत. मानवाच्या विभिन्नतेची खोली किंवा त्याच्या जटिल शारीरिक लक्षणांचे आकलन सुलभतेने होऊ शकत नाही. संस्कृती-संस्कृतीपरत्वे त्याची सामाजिक रचना बदलत जाते. त्यामुळे त्याचे स्थान प्राणिसृष्टीमध्ये काहीसे निराळे, जरा वरचे व अनन्यसाधारण असे ठरते. त्याचे हे विशेषत्व शारीरिक लक्षणांप्रमाणेच अशारीरिक लक्षणांमुळेही सिद्ध होते.

मानवाच्या शारीरिक लक्षणांची ओळख भौतिक मानवशास्त्रामध्ये करून दिली जाते तर अशारीरिक लक्षणांची ओळख सांस्कृतिक/सामाजिक मानवशास्त्रामध्ये करून दिली जाते. म्हणजे मानवाचा सर्वांगीण अभ्यास मानवशास्त्रामध्ये केला जातो. मानवाची संरचनात्मक उत्क्रांती व नागरसभ्यतेचा विकास अशा दोन्ही गोष्टींवर, स्थलकालाचे बंधन न ठेवता, या शास्त्रात भर दिला जातो. मानवी समाज, मानवी संस्कृती व तिच्या संस्थापनेची व प्रगतीची मूलतत्त्वे शोधून काढण्याचे प्रयत्न सामाजिक मानवशास्त्रात केले जातात. मानव हा समाजप्रिय असून संस्कृतीचे अस्तित्व व त्याची जपणूक ही त्याची प्रवृत्ती आहे. तसेच मानवनिर्मित हत्यारे, साधने, अन्नधान्य मिळविण्याची गुंतागुंतीची तंत्रे, श्रमविभागणी, सामाजिक व राजकीय संघटना, धार्मिक प्रवृत्ती, आपल्या भावना दुसऱ्यासमोर बोलून दाखविण्यासाठी जरूर असलेल्या भाषेचे माध्यम इ. सांस्कृतिक व उत्क्रांतिकारक लक्षणे मानवामध्ये आढळतात.

ह्या सर्व गोष्टी जशाच्या तशा पुरातन कालापासून आलेल्या नाहीत.उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधील सध्याचा मानव ही एक पायरी आहे. क्रमविकासाची ह्यावरची पायरी अस्तित्वात नसली, तरी यापुढील उत्क्रांतिकारक बदल कोणी नाकारू शकत नाही. मानवाचा प्राणिसृष्टीतील एक घटक म्हणून अभ्यास करायचा झाल्यास उत्क्रांती, प्राचीन मानवाचे वर्णन व त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींचा विचार अपरिहार्य ठरतो. शरीरलक्षणांमधील बदल, त्या लक्षणांच्या कार्यात्मक शक्तीमधील बदल इ. गोष्टी संस्कृतीच्या कितीतरी आधी आलेल्या आहेत. यासाठी मानवाचा ‘प्राणी’ म्हणून विचार करताना, त्याची उत्क्रांती कोणकोणत्या टप्प्यांमधून झाली, याचा आढावा घेणे इष्ट ठरते. भौतिक मानवशास्त्रामध्ये ह्या व ह्याच्याशी निगडित असणाऱ्या सर्व अंगोपांगाचा विचार केला जातो.

मानवाचे प्राणिसृष्टीतील स्थान : शारीरिक लक्षणांची समानता व विभिन्नता हे आधारभूत तत्त्व मानून कार्ल लिनीअसने प्राणिसृष्टीचे वर्गीकरण केले. यासाठी त्याने द्विपदी पदावलीचा वापर केला आणि मानवाचे प्राणिसृष्टीतील स्थान, नरवानर गणाचा एक घटक म्हणून निश्चित केले. नरवानर गण (प्रायमेट्स) हा सस्तन प्राणिवर्गाचा एक भाग आहे. नरवानर गणाचे परत वर्गीकरण करून लिनीअसने मानवाचे स्थान होमो सेपियन असे दाखवून दिले. गणापासून ‘जीन’ (जनुक) पर्यंत येताना वर्गीकरणाचे एकूण पाच टप्पे ओलांडावे लागतात. ज्या नरवानर गणामध्ये मानवांची गणना होते, त्यातील प्राणी मानवाच्या बरेच नजीक येत असले, तरी त्यांच्यामध्य़े खूपच विभिन्नता आढळते. दक्षिण-पूर्व आशियातील टार्सिअर, मादागास्करचे लेमूर, दक्षिण अमेरिकेतील माकडे, आफ्रिकेतील माकडे, कपी (गिबन, ओरँगउटान, चिंपँझी व गोरिला) आणि मानव इ. प्राणी मुख्यत्वे नरवानर गणात समाविष्ट केले जातात. खालील कोष्टकावरून याची थोडीशी कल्पना येईल.

कोष्टक क्र. १. नरवानर गणातील मानवाचे स्थान 
गण नरवानर प्रास्मिमन, माकडे-कपि, कपि-मानव, मानव.
उपगण मानवीय कपि, कपि-मानव व मानव
उच्च-कुटुंब/कुल मानवकुलीन कपि, कपि-मानव व मानव
कुटुंब/कुल मानवकुल कपि-मानव व मानव
उपकुटुंब/कुल मानवकुल मानव
जीन होमो मानव, प्राचीन व आधुनिक सेपियन.
जाति उन्नत-आसन —-

निरनिराळ्या जाती ह्या काही स्वतंत्र रीत्या निर्माण झालेल्या नाहीत. एका जातीमध्ये काही रूपांतरे होऊन इतर जातींची उप्तत्ती झाली असावी, हा भाग चार्ल्स डार्विनने सिद्ध करून दाखविला आहे. याचाच अर्थ असा की, आधुनिक मानवाच्या वाटचालीचा अभ्यास करावयाचा असेल, तर प्राचीन मानवाचा अभ्यास ओघाने आलाच.जसे एखादे मूल जन्मास आल्यानंतर त्याचे नाक कसे आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचा चेहरा, अंगकाठी कशी आहे, तो वडिलांसारखा दिसतो की आईसारखा वगैरे गोष्टींचा ऊहापोह केला जातो. तद्वतच प्राचीन व आधुनिक मानवांत बरेचसे साधर्म्य आढळते. हा भाग उत्क्रांतीची यशस्विता ह्या कल्पनेने सांगितला जातो. ही यशस्विता एकामागून एक घडणाऱ्या उत्क्रांतीविषयक घटनांची माहिती देऊन जाते. तसेच या सर्व घटना अलग अलग राहतात. बेमालूमपणे एकमेकांत संक्रमित होऊन जातात. त्यामुळे उत्क्रांतीचा जो एक मार्ग तयार होतो. त्याला अनाजेनेसिस (पुनरुत्पत्ती मार्ग) असे म्हणतात. काही काही वेळा मात्र या मार्गाला शाखा फुटतात व त्या आपला मार्ग स्वतंत्र रीत्या आक्रमितात. या दोन्ही प्रकारांत वातावरणाशी एकजीव होण्याचा वा अनुकूलित होण्याचा प्रयत्न सारखाच असतो. नरवानर गणांचे अशा प्रकारचे अनुकूली विकरण आपल्याला ६५० ते ७०० लाख वर्षांपाठीमागे घेऊन जाते.

मानवकुल : मोठ्या आकाराचा मेंदू असलेला, तुलनात्मक लहान चेहेऱ्याचा, हात हस्तलाघवार्थ कुशल, पायाची रचना उन्नत स्थिती व दोन पायांवर तोल सांभाळण्यास योग्य अशी योजना ज्या नरवानर गणांमध्ये आहे, तो मावनकुल होय. हे सर्व वर्णन आधुनिक मानवास तंतोतंत लागू पडते परंतु प्राचीन मानवाचे अवशेष परिपूर्ण नसल्याने व ते तसे नसणे हेही समर्थनीय असल्याने, त्याच्या संबंधीचे हे वर्णन वरवरचे वाटते. यामुळे प्राचीन मानवाच्या जातींचा, शारीरीय वैधर्म्याचा, लैंगिक विषमतेचा अभ्यास करण्यात असंख्य अडचणी उद्‍भवतात. समानतेसंबंधी अगर विषमतेसंबंधी निर्णयाप्रत येताना केवळ एकाच अवयवाचा व एकाच व्यक्तीचा अभ्यास न करता, अनेक अवयवांच्या अनेक व्यक्तींमधील शारीरीय घटकगुणांचा परामर्ष घेणे अगत्याचे आहे. प्राचीन मानवाच्या उत्क्रांतीमधील टप्पा ठरविताना हा नियम उपयोगी पडतो. एका टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्याकडे कालक्रमण करताना शारीरिक लक्षणांचा विकास अथवा ऱ्हास सम प्रमाणात न होता, विषम प्रमाणात होत असतो. दोन टप्प्यांमध्ये येणाऱ्या प्राचीन मानवामध्ये मात्र दोन्ही टप्प्यांची थोडी थोडी लक्षणे आलेली असतात. याला संकीर्ण रचनात्मक उत्क्रांती असे म्हणतात.


नरवानर गण : इसवी सन १८७३ मध्ये सेंट जॉर्ज जॅक्सन मायव्हर्ट ह्या जैव वैज्ञानिकाने नरवानर गणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली, “खुरी प्रकारात मोडणारे, जत्रुच्या हाडाचे अस्तित्व असणारे, अपरास्तनी म्हणजेच नरवानर गण किंवा वानरवर्गी प्राणी होत. त्यांच्या नेत्रकडा हाडांनी प्रमाणित केलेल्या असून त्यांना आयुष्यात निदान एकदा तरी तीन प्रकारांचे दात असले पाहिजेत. त्यांचा मेंदू पश्चखंडाने बनलेला असून भेगाळ उपांगुष्टित असे त्यांचे स्वरूप असले पाहिजे. हातापायांपैकी कोणत्याही एकाची अंतर्दिशेची बोटे संमुख जोडीने असली पाहिजेत. नखांचे अस्तित्व असलेले अगर अजिबात नसलेले पादांगुष्ट, लक्षणीय अंधनाळ, लोंबते शिस्न, मुष्कीय वृषण व वक्षीय स्तन इ. लक्षणे नरवानर गणांत आढळतात.”

थोड्याफार फरकाने वरील व्याख्या अद्यापिही नरवानरांस लागू होते. शारीरक्रियाविज्ञान दृष्ट्या ‘होमो’शी निगडित असणारे व सस्तन प्राण्यांत मोडणारे असे अनेक प्राचीन प्राणी सध्या अस्तित्वात असणाऱ्या नरवानर गणांत दिसून येतात. त्यांपैकी दक्षिण-पूर्व आशियातील खारीसारखा दिसणारा सर्वांत लहान प्राणी ‘ट्री शू’ हा म्हणावा लागेल. परंतु हा प्राणी शारीरिक तुलनेत इतका मागासलेला आहे, की काहीजण त्याचा समावेश नरवानर गणांत करू इच्छित नाहीत. परंतु ते हेही कबूल करतात की ह्या प्राण्याचा नरवानर गणाच्या उत्पत्तीशी घनिष्ठ संबंध आहे. ट्री शूची अनेक शारीरिक लक्षणे निश्चितपणे नरवानर समजल्या जाणाऱ्या लेमूरशी जवळीक दाखवितात. तर ह्या लेमूरची शारीरिक लक्षणे ट्री शू व माकडे यामधील पायरी दर्शवितात व त्याचबरोबर सर्वांत लहान कपि-गिबन ह्याच्याशी जवळीक दर्शवितात. तर गिबनचा सर्वांत जवळचा संबंध बिनाशेपटीच्या ओरँगउटान, चिंपँझी व गोरिला ह्या मोठ्या प्रकारच्या मानवीय किंवा मानवसदृश कपींशी जोडला जातो.

मानवीय ह्या त्याच्या नावाप्रमाणेच मानवीय कपी हे शारीरिकदृष्ट्या खूपसे तंतोतंत मानवासारखेच आहेत. मेंदूसारखा महत्त्वाचा भाग व त्यावरील वळ यांबाबतीत मानवीय कपी व मानव ह्यामध्ये खूपच साम्य आहे. अर्थात मानवी मेंदूच्या रचनेतील क्लिष्टता त्यांच्यामध्ये जरी कमी प्रमाणात आढळत असली, तरी सर्वसाधारण रचना अगदी मानवाच्या मेंदूसारखीच आहे. ह्या सारखेपणामुळे मेंदूचे कार्यात्मक क्रिया घडवून आणण्याचे जे मुख्य कार्य आहे, त्यामध्येही सारखेपणा दिसून येतो. कोणताही मानव आपल्या शरीराचा उपयोग प्रयोगशाळेतील कोणत्याही संशोधनात्मक प्रयोगासाठी क्वचितच करून देईल. परंतु वरील प्रकारच्या साम्यामुळे मानवीय कपींना मात्र प्रयोगासाठी वेठीस धरले जाते. तसेच त्यांच्यावरील प्रयोगांचे निष्कर्षही मानवास तंतोतंत लागू पडतात. मेंदूप्रमाणेच कवटी व शरीरसांगाड्याच्या इतर भागांचेही साम्य मानवीय कपी व मानवकुलीन मानव यांच्यात दिसून येते. मानवकुलामध्ये प्राचीन मानव व आधुनिक मानव यांचा समावेश केला जातो. मानवीय कपींची कित्येक शारीरिक लक्षणे, आधुनिक मानवाच्या शारीरिक लक्षणांशी तितकीशी मिळत नसली, तरी प्राचीन मानवाच्या शारीरिक लक्षणांशी खूपच साम्य दर्शवितात आणि आधुनिक मानव ही प्राचीन मानवाची सुधारित आवृत्तीच असल्याने, अप्रत्यक्ष रीत्या त्यांच्याशीही साम्य दर्शवितात. उन्नत आसनाशी निगडित असलेल्या शारीरिक लक्षणांचा याबाबतीत प्रकर्षाने उल्लेख मानवकुलातील प्राण्यांच्या जवळचे म्हणून करावा लागेल. कित्येकदा तर असेही घडते की, प्राचीन मानवाच्या दातांचा अभ्यास करताना, हा प्राचीन मानवाचा आहे की मानवीय कपींचा, असा संभ्रम निर्माण होतो. तसेच मानवीय कपींच्या शरीरावयवाचे स्नायूही मानवाप्रमाणेच आढळून येतात. विशेषतः पावलांची रचना व चालण्याच्या क्रियेशी निगडित असणाऱ्या स्नायूंचा त्या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल. अशाप्रकारे मानवीय कपींच्या व मानवकुलीन मानवाच्या शरीर लक्षणांच्या साधर्म्याची यादी कितीतरी मोठी होईले. यासाठी नरवानर गणाचे व मानवकुलाचे जातिवाचक घटकगुण पाहता येतील.

नरवानर गणाचे जातिवाचक घटकगुण : (१) हातांची परिग्राही अवस्था व पाय वृक्षवासी जीवनास अनुकूल, (२) हातपायांची बोटे नखाग्रांनी वेष्टित, (३) हातपायांपैकी दोन्हींचे अगर एकाचे तरी अंगठे संमुखस्थितिधारक, (४) लक्षणीय जत्र, (५) नेत्रकडा हाडांनी प्रमाणित केलेल्या, (६) मिश्र आहारास उपयुक्त अशी दातांची रचना, (७) त्रिमिती नजर, (८) रचनात्मक व कार्यात्मक दृष्ट्या नाकाचे अवमूल्यन, (९) धडाच्या वक्षीय भागी दोन स्तनांचे अस्तित्व, (१०) मुष्कीय वृषण, (११) परिवलित, भेगाळ, उपांगुष्टित व गुंतागुंतीच्या रचनेचा मेंदू, (१२) माद्यांची एकावेळी एकच गर्भधारण करण्याची प्रवृत्ती (एकावेळी अनेक गर्भधारणा क्वचितच आढळतात.), (१३) बराच मोठा गर्भावधिकाल (उदा., मानवात हा काल ९ महिने ९ दिवसांचा सरासरी असतो) आणि (१४) शब्दांकन क्षमता व गुंतागुंतीच्या रचनेची सामाजिक वर्तणूक.

मानवकुलाचे जातिवाचक घटकगुण : (१) डोक्याचा आकार इतर नरवानरांपेक्षा मोठा असून बृहद्रंध्र कवटीच्या तळाच्या अध्यभागी अगर मध्याच्या थोडे पुढे असल्याने डोके व्यवस्थित तोलले जाते व नजर समांतर होण्यास मदत होते, (२) चेहरा उंचीने कमी असून त्याच्या तुलनेने दोन डोळ्यांमधील अंतर जास्त असते, (३) जबडे अप्रलंबित असतात, (४) दंतमूलीय कमानी नाजूक व लहान असतात, (५) हनुवटी व्यवस्थित दिसते, (६) सर्वसाधारणपणे सुळ्यांचा आकार लहान असून ते इतर दातांइतके उंच असतात, (७) कायमचे दात उगविण्याची क्रिया पूर्ण होण्याचा काल मोठा, (८) नाकाचा आकार लांबट असून त्याची कमान चेहेऱ्याच्या बाहेर स्पष्ट दिसते किंवा चेहेऱ्यावर उठून दिसते, (९) पाठीचा कणा इंग्रजी ‘एस्’ ह्या अक्षरासारखा, (१०) धड व कटी यांच्यामधील अंतर तौलनिक दृष्ट्या जास्त असते, (११) हातापेक्षा पायांची लांबी जास्त असते, (१२) हाताची बोटे व पंजे सपाट व सरळ असून बोटांची हाडे लहान लहान असतात, (१३) पंजाच्या लांबीच्या तुलनेने अंगठा जास्त लांब असतो, (१४) पायाचे तळवे पुढून पाठीमागे व एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे बाकदार होत गेलेले असतात, (१५) पायाचे अंगठे असंमुख असून ते इतर बोटांच्या ओळीत असतात, (१६) अंगठा वगळता पायाची इतर बोटे आखूड असतात, (१७) ओठ बहिर्वक्र असतात, (१८) कपीच्या मानाने मानवाचे शरीर जड असते, (१९) शरीराच्या वाढीचा काल मोठा असतो, (२०) आयुष्यमान इतर प्राण्यांच्या तुलनेने भरपूर असते.

नरवानर गणाची उत्क्रांती : या गणातील प्राण्या-प्राण्यांत जरी विभिन्नता आढळत असली, तरी त्यांच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण व समान लक्षणेही आढळतात. अशी लक्षणे त्यांच्यात पूर्वजांपासून आली असली पाहिजेत. ज्या अर्थी लक्षणे समान आहेत, त्याअर्थी त्यांचे पूर्वजही समान वा एकाच प्रकारचे असले पाहिजेत कारण मूलतः त्या सर्वांमध्ये सर्वसाधारण आकृतिक संरचनेचे जतन केलेले असून अत्यंत विरोधाभासी लक्षणे आढळत नाहीत. ह्या सर्वांचा परिणाम एकाच प्रकारच्या कार्यात्मक पद्धतींवर झाला व कार्यात्मक क्रियांना पोषक होतील, अशा प्रकारचे उत्क्रांतिकारक बदल ह्या मूळच्या आकृतिक संरचनेमध्ये घडले. हे बदल हातपायांच्या व कवटींच्या संरचनेमध्ये विशेषेकरून झाले. नरवानर गणातील काही प्राणिगटांत असे बदल नामशेष होण्याकडे झुकलेले दिसतात. वातावरणाशी समरस होण्याच्या क्रियेचाही ह्या प्रकाराशी फार जवळचा संबंध आहे. मानवप्राण्यात व मानवीय कपीत अशा पुढारलेल्या अवस्था दिसतात. ज्या ज्या शरीरावयावात व शरीरलक्षणात उत्क्रांतिकारक बदल झाले, त्यांची यादी ले ग्रास क्लार्क याने पुढीलप्रमाणे दिली आहे. [⟶ नरवानर गण].


(१) सर्वसाधारण संरचनात्मक लक्षणांचे जतन केलेले आढळते. विशेषतः हातापायांची पाच बोटे तसेच जत्रु अगर गळ्याचे हाड वगैरे गोष्टींच्या संदर्भात काही प्राणी विकसित झाले किंवा विकसित अवस्थेप्रत पोहोचले. काही प्राणी अविकसित अवस्थेमध्ये राहिले, तर काही प्राणी नामशेष पावले. परंतु सर्वसाधारण लक्षणांत – ती लक्षणे टिकवून धरण्याच्या बाबतीत – फारसा बदल झाला नाही तर ती जतन केली गेली.

(२) हातापायांच्या अंगठ्याचे मोकळेपणाने व स्वतंत्रपणे संचलन केले जाते. याचा उपयोग वस्तूवरील पकड घट्ट बसविण्याच्या कामी केला जातो.

(३) अतिशय टोकदार, जाड व ओबडधोबड नख्यांचे परिवर्तन पातळ, सपाट व लहान आकारामध्ये झाले. त्याचबरोबर तळवे व पंजे यांवर गाद्या तयार होऊन संवेदनाक्षम असे अवयव होण्यास मदत झाली. गरम, थंड, काटेरी, मृदू, ओबडधोबड, राकट वगैरे प्रकारचे स्पर्शज्ञान होण्यास यामुळे मदत होते.

(४) नाकाचा व त्याभोवतालचा भाग अविकसित राहिला.

(५) दृष्टीशी निगडित असणाऱ्या भागाची रचना क्लिष्ट, गुंतागुंतीची झाली. दृष्टी समांतर झाली, त्रिमिती दृष्टी विकसन पावली.

(६) सुंघण्याच्या क्रियेशी निगडित असणाऱ्या त्वचेची कार्यक्षमता कमी झाली.

(७) आदिम सस्तन प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या दातांच्या प्रकारांचा नाश पावून साधे सुटसुटीत दात निर्माण झाले. दाढांचा आकारही लहान होऊन त्या चतुर्दली बनल्या.

(८) मेंदूचा आकार व रचना यांत क्रमाक्रमाने बदल झाले. सध्या अतिशय क्लिष्ट रचनेचा व मोठ्या आकाराचा मेंदू मानवात आढळतो. तसेच कार्यात्मक क्रियांसाठी जबाबदार असणाऱ्या मेंदूच्या भागाचाही विकास झाला.

(९) गर्भावस्थेचे यशस्वी विकसन क्रमाक्रमाने झाले, गर्भावस्थेचा काल लांबला, गर्भाच्या वाढीस पोषक अशा रचना शरीरामध्ये तयार झाल्या.

(१०) क्रमाक्रमाने उन्नत अवस्था व द्विपदी संचलन निर्माण झाले.

(११) जन्मानंतरच्या एकूण आयुष्यमानाचा काल मोठा झाला.उन्नत आसनाचा शरीर लक्षणांवर झालेला परिणाम : वरील लक्षणांपैकी उन्नत अवस्थेचे लक्षण व द्विपदी संचलन मानवाच्या बाबतीत अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. क्रमाक्रमाने उन्नतावस्था प्राप्त होतानाच, शरीर सांगाड्यावर – सांगाड्याच्या निरनिराळ्या भागावर – परिणाम होऊन, त्या स्थितीस पोषक असे बदल घडून आले. आदिम सस्तन प्राण्याकडून आपण पुढारलेल्या चतुष्पाद प्राण्याकडे व तेथून पुढे द्विपाद प्राण्याकडे वाटचाल करू लागतो त्यावेळी आसन स्थितीतील बदल, शरीरावयवातील बदलामुळे झालेला दिसतो. कवटी, हात, पाय, कटी, पाठीचा कणा, बृहद्रंध्राची अवस्था, दृक्‌शक्ती, स्कंधास्थी इत्यादींच्या हाडांचा यामध्ये समावेश होतो. उन्नत अवस्थेमध्ये येताना कवटीचा आकार काहीसा मोठा झाला. यामुळे मेंदूचा आकारही मोठा होऊन, कवटीची धारणक्षमता वाढली. मेंदूची रचनाही काहीशी क्लिष्ट व गुंतागुंतीची झाली. कवटीच्या तळाशी असलेले बृहद्रंध्र जर पाठीमागील बाजूस झुकलेले असेल तर चेहेरा व कवटीचा भाग पुढे ओढल्यासारखा होतो. तसेच पाठीच्या कण्याचा आकार धनुष्याकृती होऊन स्कंधास्थीची लांबी धडाचा भार सांभाळण्यासाठी जास्त वाढते. पाठीच्या कण्याची कमान झाल्यामुळे त्याचा परिणाम कटीच्या हाडांवर होऊन त्यांचीही लांबी वाढते. यामुळे श्रोणीची पोकळी अरुंद होते. ही सर्व लक्षणे चतुष्पाद अवस्थेमध्ये प्रकर्षाने दिसतात. याउलट बृहद्रंध्र कवटीच्या तळाच्या पुढील बाजूस झुकलेले अगर मध्यभागी असेल, तर चेहेरा व कवटीचा भाग फारसा किंवा अजिबात पुढे ओढल्यासारखा येत नाही. पाठीचा कणा धनुष्याकृती होण्याऐवजी त्याला चार बाक येतात व मस्तक पाठीच्या कण्यावर व्यवस्थित तोलले जाते. ही सर्व लक्षणे द्विपाद अवस्थेमध्ये दिसतात. परिणामी स्कंधास्थीची लांबी कमी होते कारण धडाचा भार स्कंधास्थीवर न पडता तो कटीवर पडतो. कटीची हाडे मात्र यामुळे अधिक रुंद होतात. त्यांची लांबी कमी होते आणि कटीची पोकळीही मोठी होते. यामुळे धड व मस्तकाचा भाग यशस्वीपणे तोलला जातो. उन्नत अवस्थेचा कटी व पायांवर विशेष परिणाम होतो – कटीची हाडे जाड होतात. तसेच कटी, धड व पाय यांना जोडणारे स्नायू बळकट बनतात. मात्र स्कंधास्थीस जोडणारे स्नायू त्यामानाने दुर्बल रहातात. कटीची पोकळी धडाच्या प्रमाणात मोठी झाल्याने गर्भावस्थेमध्ये गर्भाची अवस्थाही व्यवस्थित राहते. कटीवर येणारा भार दोन पायांवर तोलावा लागल्यामुळे ऊर्वस्थी बळकट बनते. मानवाच्या ऊर्वस्थीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ‘लिनिया अस्पेरा’ नावाच्या बळकट कंगोऱ्याला कटीचे व पायाचे स्नायू जोडलेले असतात. दोन पायांवरच चालण्याची क्रिया होत असल्याने पावलांच्या हाडांच्या संरचनेमध्येही लक्षणीय बदल दिसतात. पावलांना पुढून पाठीमागे व एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असा बाक येतो. यामुळे तोल सांभाळण्यास मदत होते. उन्नत अवस्थेमध्ये कमी भार वाहाणारे अवयव म्हणजे हात, स्कंधास्थी, बरगड्या व जबडे. त्यांच्या आकारमानात लक्षणीय घट दिसते. स्कंधास्थी पातळ होते तर हातांची हाडे अरुंद बनतात. कवटीचा ललाटीय व पश्च कपोलास्थीचा भाग कवटीच्या गोलाकारांशी प्रमाणित होतो. अधिनेत्रक कंगोरे कमी जाडीचे होतात. जबडे असंपुनित होतात. त्यांची लांबी कमी होते. याचा अप्रत्यक्ष परिणाम दातांच्या वाढीवर होऊन ते आकाराने लहान होतात. हातांचा उपयोग वस्तू हाताळण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी होतो. दातांचा उपयोग खाण्याच्या क्रियेशीच निगडित असून त्यांचा उपयोग संरक्षणार्थ केला जात नाही. अशा तऱ्हेने शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवावर कमी-अधिक प्रमाणात उन्नत आसनाचा परिणाम दिसून येतो.

पुरामानवशास्त्र : मानव हा नरवानर गणाच्या उत्क्रांतीमधील एक अत्युच्च टप्पा होय. म्हणजेच मानवाची उत्क्रांती चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यापासून झाली. उत्क्रांतीच्या सिद्धतेसाठी अनेक प्रकारचे पुरावे दिले गेले. शास्त्रीय दृष्टिकोनातून सत्यावर आधारित पुरावा मानवशास्त्राने दिला. पुराजीवविज्ञानाच्या क्षेत्रापैकी जो भाग मानवाच्या उप्तत्तीशी संबंधित आहे, त्याला पुरामानवशास्त्र असे म्हणतात. यामध्ये फक्त मानवकुलातील व नरवानर गणातील प्राचीन अवशेषांचा समावेश होत नसून प्राचीन मानवाच्या संस्कृतीविषयीचा व त्या काळच्या वातावरणाच्या अभ्यासाचाही समावेश होतो. मानवाला आजच्या स्थितीला पोहोचण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांमधून जावे लागले, याचा परामर्श घेणे भाग आहे. भूशास्त्रानुसार तृतीयक कालाच्या अगदी प्रारंभी नरवानर गणाच्या प्रगतीस सुरुवात झाली.

तृतीयक कालातील नरवानर: तृतीयकाच्या सुरुवातीच्या काळातील वातावरण उबदार हवेचे होते. येथपासूनच नरवानरांच्या प्राचीन अवशेषांचे स्वरूप समजू लागले. पुरानूतन युगाच्या काळात कित्येक नरवानर अस्तित्वास होते. त्यांचे दात छिन्नीसारखे लांब होते परंतु हे नरवानर, जगण्याच्या चढाओढीत मागे पडून नाश पावले. हा पुरानूतन काल सु. ११ दशलक्ष वर्षांचा होतो.


पुरानूतन व आदिनूतन काळांमध्ये (६५ दशलक्षवर्षांपासून चे ३८ दशलक्षवर्षांपर्यंतच्या काळात) अलीकडच्या लेमूर व टार्सिअरच्या गटांतील जरा पुढारलेले नरवानर अस्तित्वात आले असावेत, इतपतच पुरावा मिळतो पण त्यांची अधिक माहिती मिळत नाही आणि जी काही माहिती मिळते, ती तितकीशी उपयुक्तही नाही. त्यानंतरच्या अल्पनूतन कालामध्ये (३८ दशलक्ष वर्षांपासून ते २६ दशलक्ष वर्षांपर्यंत) प्राचीन माकडे व प्राचीन मानवीय कपी अस्तित्वात आले. या काळातील अगदी जुना अवशेष म्हणून ईजिप्तमधील फायूम येथे सापडलेल्या अवशेषाचा उल्लेख करावा लागेल. त्याचा फक्त खालचा जबडाच मिळालेला होता. ईजिप्तमधील अल्पनूतन काळात मागासलेल्या प्रकारातील कितीतरी कपी आढळतात. त्यांपैकी ओरिओपिथेकस हा गिबनचा पूर्वज असावा, असे समजले जाते. तसेच ईजिप्तोपिथेकस हा आधुनिक कपींचा पूर्वज असावा. फायूम येथील अवशेष सुरुवातीला जरी गिबनचा पूर्वज असल्याचे गृहीत धरले जात होते तरी अलीकडील संशोधनानुसार तो मानवकुलाचा पूर्वज असावा असे दाखवून दिले आहे. यासाठी सर्वसाधारणपणे दातांचे आकार-प्रकार आधार म्हणूनच विचारात घेतले जातात.

मध्यनूतन काळामध्ये यूरोप, आशिया व आफ्रिका येथे बरेचसे मोठ्या आकाराचे नरवानर उदयाला आले. त्यांपैकी फ्रान्समधील मध्यनूतन कालातील प्राचीन कपींपैकी ड्रायोपिथेकसचा उल्लेख करावा लागेल. हा अवशेष इ. स. १८५६ मध्ये शोधून काढला गेला. दातांचे कंगोरे व दाढांच्या खाचा ही लक्षणे त्याच्यामध्ये विशेषत्वाने आढळतात. विशेषतः त्याच्या दाढांचा प्रकार इंग्रजी ‘वाय्’ ह्या अक्षराप्रमाणे असून त्याला पाच खाचा होत्या. हे खास लक्षण ड्रायोपिथेकस – वाय् म्हणून ओळखले जाते. त्याच प्रकारच्या इतरही अवशेषांचा समावेश ड्रायोपियेसिनी या उपकुटुंबात केला जातो.

मानवकुलीन अवशेष : मानवकुलाच्या उत्क्रांतीमध्ये मुख्यत्वे तीन आकृतिक संस्था व त्या प्रत्येक संस्थेला जोडणारे मध्यदुवे निर्माण झाले. या संस्थांचे स्वरूप मुख्यत्वे पुढील प्राचीन मानवाद्वारे स्पष्ट होते :

(१) ऑस्ट्रॅलोपियेसिन (दक्षिणेकडील कपी, प्रत्यक्षात कपी-मानव), (२) पिथेकँथ्रोपिय कपि-मानव (प्रत्यक्षात खरोखरीचा मानव), (३) सपियन/सेपियन (विचार करणारा मानव, प्रत्यक्षात आधुनिक मानव उदा., निअँडरथल मानव, क्रो-मॅग्नान मानव). टप्प्याटप्प्याने या सर्वांचा परिचय पुढे दिला आहे.

रामपिथेकस : मानवीय कपीपासून मानवकुल केव्हा अलग झाले, याबाबतची विश्वसनीय माहिती फारशी उपलब्ध नाही. म्हणून मानवकुलाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात खंड पडतो. इ. स. १९६१ मध्ये भारताच्या शिवालिक टेकड्यांमधून मध्यनूतन-अतिनूतन कालातील एका वरच्या जबड्याचे अवशेष शोधून काढले गेले.

रामपिथेकस हे त्याचे नाव. गोलाकार दंतकमानी व छोट्या चेहऱ्यावरून त्याची गणना मानवकुलात केली गेली. वास्तविक रामपिथेकसचे अवशेष प्रथमतः इ. स. १९३२–३४ च्या दरम्यान लेविस या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते. त्या अवशेषांच्या परीक्षेवरून त्यांचा समावेश त्याने मानवकुलात केला होता परंतु त्याच्या ह्या कामाला पुष्टी देऊन त्यावर शिक्कामोर्तब इ. स. १९६१ मध्ये सायमनने केले. एल्. एस्. बी. लीकी याने पूर्व आफ्रिकेतील तेरमान येथून मध्यनूतन कालाच्या उत्तरार्धातील एक नवीन अवशेष १९६२ मध्ये शोधून काढला. त्याला त्याने केन्यापिथेकस वीकेरी असे नाव दिले. त्याच्या दाढा, उपदाढा व सुळे आकाराने लहान असून हाडांचे माथे आधुनिक मानवाप्रमाणेच असल्याचे आढळून आले. यामुळे त्याचा मानवकुलात समावेश केला गेला. पुढे सायमनने, केन्यापिथेकस वीकेरीरामपिथेकस हे एकच असल्याचे प्रतिपादन केले परंतु लीकी त्याच्याशी सहमत होऊ शकला नाही. पूर्व आफ्रिकेतील केन्या येथून एक अवशेष १९६७ मध्ये शोधून काढण्यात आला. त्याला प्रोकान्सल हे नाव दिले असून त्याचाही समावेश मानवकुलात केला गेला तथापि तो ड्रायोपिथेकसरामपिथेकसपेक्षा जुना अवशेष असावा, याबाबत शास्त्रज्ञांत दुमत आहे. अशा तऱ्हेने मध्यनूतन व अतिनूतन काळांतील बरेच अवशेष मिळालेले असले, तरी त्यांतील बहुतांशी अवशेष ‘कपि’ ह्या प्रकारातील होते. हे अवशेष पूर्व आफ्रिकेतील केन्या, भारत, चीन व यूरोपमधील काही प्रदेशांमधून शोधून काढले होते. त्या सर्वांचा कालावधी साधारणतः १० दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. त्यानंतर ५·५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे अवशेष तुरळक प्रमाणात मिळतात. म्हणजे ५·५ ते १० दशलक्ष वर्षे ही एक फार मोठी पोकळी रहाते व ही सर्व कथा तृतीयकातील अतिनूतन काळापर्यंत येऊन थांबते. यानंतरचा चतुर्थकातील काळ म्हणजे प्लाइस्टोसीन होय. या काळातील अनेक अवशेष उपलब्ध असल्याने त्यांचा सविस्तर विचार खाली दिला आहे.

पूर्व प्लाइस्टोसीनमधील कपि-मानव: इ. स. १९२५ मध्ये रेमंड डार्ट याने दक्षिण आफ्रिकेतील हाँग येथील एका लहान मुलाची कवटी शोधून काढली. तिचा समावेश प्राचीन नरवानरांपैकी एका जातीतील एका प्रजातीत होतो. रेमंड डार्टने ह्या प्रजातीस ऑस्ट्रॅलोपिथेकस असे नाव दिले. मानवकुलामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याने कवटीचा गोलाकार व त्यामधील मेंदू, लक्षणीय दंतपंक्तीचा गोलाकार वगैरे गोष्टींचे तपशील नोंदविले. ह्याच प्रकारचे अवशेष नंतरच्या काळात शोधून काढले गेले. त्यामुळे डार्ट ह्याचे निष्कर्ष किती बरोबर होते, याची खात्री पटते. टाँग येथील घटकगुण आधुनिक कपीच्या पिलाच्या कवटीपेक्षा कितीतरी भिन्न आहेत. कवटीच्या तळाशी असलेल्या बृहद्रंध्राच्या स्थितीवरून डार्टने चलनवलन क्रियेसंबंधी काही अनुमाने काढली. त्यानुसार बृहद्रंध्राच्या विशिष्ट रचना व त्याला जोडणाऱ्या पाठीच्या कण्याची स्थिती द्विपाद अवस्थादर्शक असल्याचे दिसते. याचा उपयोग उन्नत अवस्थेमध्ये दृष्टी क्षितिजाशी समांतर ठेवण्याच्या कामीही होतो.

ऑस्ट्रॅलोपिथेसिन ह्या कुटुंबाचे कित्येक अवशेष निरनिराळ्या काळात शोधून काढले गेले. हे सर्व अवशेष मुख्यत्वे दोन प्रकारांत विभागले गेले आहेत. (१) ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकॅनस व (२) ऑस्ट्रॅलोपिथेकस रोबस्टस. पहिला प्रकार आकाराने लहान, नाजूक प्रकृतीचा, उन्नत आसनाचा, द्विपाद अवस्थेसाठी अयोग्य शरीरयष्टीचा परंतु दातांच्या आकार-प्रकाराबाबत पुढारलेला म्हणजे बहुतांशी शाकाहारास उपयुक्त अशा दातांच्या प्रकाराचा असावा. या दोन्ही प्रकारांचा हा एक विचारप्रवाह झाला. दुसऱ्या विचारप्रवाहानुसार ऑस्ट्रॅलोपिथेकसमध्ये जे भिन्नत्व आढळते त्याच्या मुळाशी ‘लैंगिक फरक’ असे कारण असावे तिसऱ्या एका विचारप्रवाहानुसार रोबस्टस प्रकारास स्वतंत्र केल आहे व त्याला ऑस्ट्रॅलोपिथेसिन कुटुंबातील उपकुटुंबापैकी स्वतंत्र जाति – पॅरान्थ्रोपस – असे ओळखले जाते आणि त्याचबरोबर आफ्रिकॅनस प्रकारात होमो जीन ह्या प्रकारास जोडण्यात येते. तर चवथ्या विचारप्रवाहानुसार रोबस्टसचे सर्व प्रकार, उपप्रकार व आफ्रिकॅनसचे काही प्रकार (अवशेष) एकत्र करून त्याला स्वतंत्र जीन (जातीचा) दर्जा दिला गेला व उरलेल्या अवशेषास ‘होमो जीन’ हे प्रतिनिधित्व करणारे म्हणून संबोधण्यात आले. एकंदरीत ऑस्ट्रॅलोपिथेकसचा मानवकुलात या ना त्या नात्याने समावेश केला जातो. त्याचे जे विविध अवशेष सापडले ते खालीलप्रमाणे :

इ.स. १९२५ ते १९७१ पर्यंत सापडलेल्या अवशेषांचा समावेश येथे केला आहे.


रॉबर्ट ब्रूम ह्याने १९३६ साली स्टर्क फाउंटन येथे एका संपूर्ण वाढ झालेल्या माणसाची कवटी शोधून काढली. तसेच अनेक जबडे, दात, एक जवळजवळ संपूर्ण श्रोणी व इतर बारीकसारीक हाडेही शोधून काढली. या सर्वांची लक्षणे हाँग येथील लहान मुलाच्या कवटीच्या परिमाणांशी खूपच मिळतीजुळती आहेत. मॅकापान्सगाट येथे सापडलेले अवशेषही वरील सर्व अवशेषांस पूरक असेच आहेत. ह्या सर्व प्रकारच्या अवशेषांवरून ऑस्ट्रॅलोपिथेकसचे थोडक्यात चित्र दिसते, ते असे की – आकाराने लहान, नाजूक प्रकृतीचा, मानवकुलातील उन्नतस्थिती व दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केलेला, सर्वसाधारणपणे उघड्या जागेवरील कोरडवाहू जमिनीवर राहाणारा, दातांची रचना सर्वभक्षी आहारासाठी योग्य असली, तरी मांसाचा उपयोग तुलनेने जास्त प्रमाणात करणारा मानवकुलीन प्राणी म्हणजे ऑस्ट्रॅलोपिथेकस होय.

ऑस्ट्रॅलोपिथेकस 
स्थान वर्गीकरणानुसार    नाव संशोधक शोधवर्ष
प्रकार पहिला – ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकॅनस 
१. हाँग, द. आफ्रिका ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकॅनस  रेमंड ए. डार्ट १९२५
२. स्टर्क फाउंटन, द. आफ्रिका प्लेसिअँथ्रोपस ट्रान्सव्हॅलॅसिन्स  रॉबर्ट ब्रूम १९३६
३. मॅकापान्सगाट,द. आफ्रिका ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रोमेथस  रेमंड ए. डार्ट १९४८
४. ओल्डुबायी गॉर्ज, पू. आफ्रिका होमो हॅबिलिस  मेरी लीकी १९६०
५. पू. रूडॉल्फ, पू. आफ्रिका होमो  रिचर्ड लीकी १९७१
प्रकार दुसरा – ऑस्ट्रॅलोपिथेकस रोबस्टस 
१. क्रोमद्राई, द. आफ्रिका पॅरान्थ्रोपस रोबस्टस्  रॉबर्ट ब्रूम १९३८
२. स्वार्टक्रान्स, द. आफ्रिका पॅरान्थ्रोपस क्रेसिडेन्स  रॉबर्ट ब्रूम १९४८
३. ओल्डुबायी गॉर्ज, पू. आफ्रिका झिजॅनथ्रपस बॉम सी  एल्. एस्. बी. लीकी १९५९
४. पू. रूडॉल्फ, पू. आफ्रिका ऑस्ट्रॅलोपिथेकस रिचर्ड लीकी १९७१

क्रोमद्राई व स्वार्टक्रान्स ह्या दुसऱ्या दोन ठिकाणी सापडलेले अवशेष वरील अवशेषांपेक्षा भिन्न दिसतात. आफ्रिकनसपेक्षा आकाराने मोठा, राकट व जास्त शक्तिमान अशा या प्रकारास ऑस्ट्रॅलोपिथेकस रोबस्टस् असे म्हणतात. यालाच पॅरोन्थ्रोपस रोबस्टस असेही म्हणतात.

इ.स. १९५९ पासून एल्. एस्. बी. लीकी, त्याची पत्नी, इतर कुटुंबीय व त्यांचे सहकारी कामगार यांनी ओल्डुबायी गॉर्ज (टांझानिया), उत्तर केन्या वगैरे ठिकाणांहून कितीतरी अवशेष शोधून काढले. या त्यांच्या कार्यामुळे ऑस्ट्रॅलोपिथेकसची कितीतरी नवीन माहिती बाहेर आली. या सर्व अवशेषांमध्ये ओल्डुबायी गॉर्ज ऑस्ट्रॅलोपिथेकस ‘वाय सी’ म्हणून ओळखला जातो. याशिवाय जे इतर लहानसहान अवशेष मिळाले ते आकाराने लहान असले, तरी आफ्रिकॅनसपेक्षा ते जास्त आधुनिक व पुढारलेल्या अवस्थेतील आहेत. तरीही सर्वसाधारण वर्णनानुसार ते ऑस्ट्रॅलोपिथेकस ह्या गटातच बसतात.

ऑस्ट्रॅलोपिथेकसचे अवशेष साधारणपणे ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकॅनसऑस्ट्रॅलोपिथेकस रोबस्टस अशा दोन स्थूल विभागांमध्ये गणले जातात, ते त्यांच्या मुख्यत्वे शारीरिक घटकगुणांवरूनच! यांपैकी ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकॅनसच्या पुढे मानवीय (होमो सेपियन) शाखा निघाली आणि रोबस्टस प्रकार नष्ट पावला परंतु अलीकडे ३० नोव्हेंबर १९७४ रोजी तिसऱ्या प्रकाराची/विभागाची भर यामध्ये पडली. ऑस्ट्रॅलोपिथेकस ॲफेरियानसिस असे त्याचे नामाभिधान ठरले. कदाचित या तिसऱ्या प्रकारचे अवशेष होमो सेपियन उत्क्रांती खोडाशी परस्पर जोडले जाऊ शकतील. परंतु त्याबाबतची माहिती अद्यापि पूर्ण ज्ञात नाही व जी उपलब्ध झाली आहे तीत परस्पर-विरोधी मते नोंदली गेली आहेत. डॉन योहान्सन व टॉम ग्रे यांनी हे अवशेष इथिओपियात शोधून काढले. ज्या दिवशी एका तरुण स्त्रीचे अवशेष मिळाले, त्या रात्री आनंदाप्रीत्यर्थ बीटल्सचे सुप्रसिद्ध ‘ल्यूसी’ हे गीत रात्रभर गाइले गेले व त्यावरून त्या अवशेषास ‘ल्यूसी’ हे नाव मिळाले.

कालमापनाच्या पोटॅशियम-आर्‍गॉन पद्धतीनुसार ल्यूसीचा व टांझानियामधील लायतोली येथील तशाच प्रकारच्या इतर अवशेषांचा काल साधारणपणे तीन ते चार दशलक्ष वर्षांपूर्वीच्या दरम्यानचा ठरविला गेला आहे.

ल्यूसी व तत्सम अवशेषांच्या कवट्या चिंपँझीच्या कवटीसारख्या होत्या व त्यामधील मेंदूचा आकारही चिंपँझीच्या मेंदूच्या आकाराएवढाच गणला गेला असे असले तरी कमरेची व पायाची हाडे उन्नतस्थीती दर्शवितात. इतकेच नव्हे तर कवटीशिवाय काही हाडांची लक्षणे वाकबगार, अंगवळणी पडलेली द्विपाद स्थिती दर्शवितात. त्यातल्या त्यात कमरेची, घोट्याची व पायाची हाडे आधुनिक स्थिती दर्शवितात या महत्त्वाच्या लक्षणांबरोबरच इतरही काही शारीरिक लक्षणे अशी आहेत, की जी चिंपँझीसदृश दिसतात. उदा., हातापायाच्या बोटांची हाडे काहीशी बाकदार व लांबट परंतु नाजूक असून घट्ट पकड बसविण्यास योग्य अशी आहेत. त्या क्रियेसाठी जरूर असणारी स्नायुबंधनेही अधिक भक्कम स्थिती दर्शवितात किंबहुना झाडावर चढण्यासाठी योग्य अशी त्यांची जडणघडण दिसते. अशा तऱ्हेने इतरही हाडांच्या रचनेबाबत विवेचन केल्यास, शेवटी असे म्हणता येईल, की ही ‘ल्यूसी’ व आफ्रिकेतील टांझानियामधील लायतोली इ. ठिकाणी सापडलेले तत्सम अवशेष, मानव आणि चिंपँझी यांच्या काहीशी मधली, परंतु जास्त मानवीय अवस्था दर्शवितात व म्हणून त्यांचा समावेश ऑस्ट्रॅलोपिथेकस या मानवीय (काहीशा) समूहात केला जातो. फक्त त्यांचे प्रजाती निराळी म्हणजे ॲफेरियानसिस असे गणले गेले.


ह्या नवीन सापडलेल्या ‘ल्यूसी’ व तत्सम अवशेषांमुळे उत्क्रांती प्रक्रियेतील एक निराळा टप्पा दिसतो का? हा प्रश्न आहे. परंतु बहुतेक मानवशास्त्रज्ञांचे असे मत आहे की हा निराळा टप्पा नसून तो ऑस्ट्रॅलोपिथेकस कुलातील एक निराळी प्रजाती आहे, निराळी पायरी आहे व त्याचा काल ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या इतर अवशेषांपेक्षा काहीसा मागे जातो व त्यामुळे मानवसदृश परंतु पुढारलेल्या अवशेषांचा कालही मागे जातो.

एकंदरीत स्थूलमानाने ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या अवशेषांचे विभाजन तीन प्रकारांत करावे लागेल : (१) आकाराने लहान असलेल्यांचा एक प्रकार. (२) आकाराने मोठे असलेल्यांचा दुसरा प्रकार व (३) या दोन्हींपेक्षा जरा निराळे, परंतु मोठ्या आकाराचा व एल्. एस्. बी. लीकीचा तसेच ल्यूसीचा समावेश असलेला तिसरा गट.

वरील तिन्ही प्रकार एका, दोन अगर तीन जातींचे प्रतिनिधित्व करतात काय, ते सर्व एकाच गोत्रात मोडतात की अनेक गोत्रांत इ. महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी परस्परविरोधी मते आहेत. मात्र हे सर्व ऑस्ट्रॅलोपिथेसिन या कुटुंबातीलच आहेत, याबाबत एकमत आहे.

सर्वांत मोठ्या आकाराचे अवशेष, उत्क्रांतीमध्ये फारसा भाग न घेता, मध्येच लुप्त पावले असले पाहिजेत, असे बहुतेक सर्व शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु लहान आकाराच्या कपि-मानवास लीकी व त्याचे सहाध्यायी मानवजाती विकासात्मक आलेखाच्या मुख्य गाभ्याशी जोडण्यास तयार नाहीत. त्यांच्या मते ओल्डुबायी गॉर्ज येथील कपि-मानव कालगतीच्या खूपच मागे जातो. (उदा., पूर्व प्लाइस्टोसीनमधील १·७ दशलक्ष वर्षे). म्हणून त्यांनी इतर लहान कपिमानवाच्या प्रकारास होमो हॅबिलिस असे नाव दिले. हा प्रकार वरील प्रकारांपेक्षा खूप पूर्वीचा आहे. होमो हॅबिलिसच्या हातापायांच्या रचना हत्यारांच्या निर्मितीसाठी योग्य अशाच आहेत. म्हणून ही एक ऑस्ट्रॅलोपिथेकसची सुधारित अवस्था असून, ती नंतरच्या काळातील होमो इरेक्टसपेक्षा मागासलेली अवस्था समजली जाते. मात्र सर्वच मानवसास्त्रज्ञ याच्याशी सहमत नाहीत.

मध्य प्लाइस्टोसीनमधील मानवावस्था : पिथेकॅन्थ्रॉपाईन गट ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या नंतरचा असून तो ‘खराखुरा मानव’, होमो इरेक्टस पात्र आहे, असे त्याच्या अवशेषांच्या एकंदर तपासणीवरून दिसते. अति पूर्वेकडील प्रदेश, आशिया, उत्तर आफ्रिका, पूर्व आफ्रिका व यूरोपमधील काही ठिकाणी यांचे अवशेष सापडतात. पूर्वी होमो इरेक्टसला जावामध्ये पिथेकॅन्थ्रापस असे संबोधत असत. त्याला सर्वसाधारणपणे होमो इरेक्टस किंवा पिथेकॅन्थ्रापस असे संबोधितात. त्याचा काल मध्य प्लाइस्टोसीनचा – म्हणजे सु. १० लाख ते ५ लाख वर्षांपूर्वींचा नोंदविला जातो. इ. स. १८९० मध्ये जावामधील त्रिनील येथे याच्या (डोक्याचे) कवटीचे व मांडीच्या हाडाचे अवशेष सर्वप्रथम शोधून काढले गेले. यांपैकी कवटीचा भाग प्रारंभिक अवस्था दाखवितो तर मांडीचे हाड आधुनिक वाटते. जावामधील संगीरान, चीनमधील पीकिंग जवळच्या चौकुतिन व ओल्डुबायी गॉर्ज येथे सापडलेल्या कवटींच्या अवशेषांच्या परीक्षेवरून जावा येथील अवशेष मूळचा असावा अशी खात्री वाटते. मांडीच्या हाडाबाबत मात्र दुमत आहे. ह्या होमो इरेक्टसची कवटी आधुनिक मानवाच्या कवटीपेक्षा कितीतरी भिन्न लक्षणे दर्शविते. उदा., कवटीच्या घुमटाचा आकार बसकट असून तिची धारणक्षमता कमी आहे. (९०० ते १,००० घ. से.) तसेच अधिनेत्रक कंगोरे जाड, मोठ्या आकाराचे परंतु हनुवटीचे अस्तित्व नसलेले जबडे, ओबडधोबड दात वगैरे गोष्टी प्रारंभिक अवस्था दर्शवितात. विशेषतः दाढांच्या कडावरील पांढुरका भाग तसेच लचके तोडण्यास उपयुक्त असलेला दातांचा भाग निश्चितच प्रारंभिक अवस्था दर्शवितो. या दृष्टीने हायडेलबर्ग (जर्मनी) येथील एक जबडा होमो इरेक्टसचा असावा, असा संशय आहे, परंतु त्याचे कालमापन निश्चित झालेले नाही.

धड व हातापायांच्या हाडांचे अवशेष फारसे मिळालेले नाहीत. जे काही थोडेफार मिळाले त्यांपैकी मांडीची हाडे व श्रोणीची अर्धवट हाडे जावा, चौकुतिन व ओल्डुवायी गॉर्ज या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात. त्रीनल येथे सापडलेल्या मांडीच्या हाडावरून असा निष्कर्ष निघतो की इतर हाडांच्या परिस्थितीच्या मानाने ही हाडे जास्त आधुनिकत्वाकडे झुकतात व त्या अनुषंगाने कवटी, मेंदू, जबडे व दात यांमध्ये क्रमाक्रमाने उत्क्रांती होत गेली असावी परंतु ओल्डुवायी गॉर्ज येथे सापडलेल्या मांडीच्या हाडामुळे वरील निष्कर्ष पेचात पाडणारे वाटतात.

अश्यूलियन संस्कृतीची जडणघडण या होमो इरेक्टसकडून केली गेली असावी. ही संस्कृती चीन, उत्तर व पूर्व आफ्रिका इ. ठिकाणी पसरली असून शकल हत्यारे व हातकुऱ्हाडी ही त्या संस्कृतीची निदर्शक हत्यारे होत. सामूहिक शिकार करणे व अग्नी तयार करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले असावे. विशेषतः चौकुतिन येथे अशा सामूहिक शिकारीचे भक्ष्य झालेल्या मोठमोठ्या प्राण्यांचे अवशेष सापडतात. त्या प्राण्यांचे मोठे आकार, एका माणसाच्या आवाक्याबाहेरच्या शिकारीचे निदर्शक आहेत.

चौकुतिन येथील गुहामधील खोदकाम इ. स. १९५८ पासून पुन्हा सुरू केले गेले. त्यावेळीही होमो इरेक्टसचे अनेक नमुने मिळालेले होते परंतु दुर्दैवाने त्या आधीचे नमुने व अवशेष १९४१ च्या नंतर हरवले व त्यामुळे त्यांच्या प्लॅस्टिकच्या प्रतिकृतींवरूनच त्यांचा अभ्यास करावा लागतो.

मध्य प्लाइस्टोसीनमधील ह्या होमो इरेक्टसच्या कवट्या व जबडे तुलनेने प्रारंभिक अवस्था दाखवितात व हातापायांची अवस्था त्यामानाने आधुनिकत्वाकडे झुकलेली आहे. याचाच अर्थ शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये होणारा व झालेला बदल एकाच वेळी न होता, एका मागोमाग होतो. यालाच संकीर्ण रचनात्मक उत्क्रांती असे म्हणतात.

सर्वसाधारणपणे ५ लाख ते १० लाख वर्षांपूर्वीचा माणूस बऱ्याच गोष्टी आत्मसात करण्यात यशस्वी झालेला दिसतो. दोन पायांवर व्यवस्थित तोल सांभाळून चालण्याच्या कलेचा त्याने पुरेपूर फायदा उठविलेला दिसतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींवर मात करण्याच्या दृष्टीने सुयोग्य अशी मेंदूची प्रगती होऊ लागली. मोकळ्या हातांचा उपयोग क्रिया करण्याकडे होऊ लागला. यामुळे अशी शरीररचनेमध्ये आवश्यक ते बदल होण्यास सुरुवात झाली, तशीच सामाजिक एकतेची जाणीवही वाढीस लागली. यामुळे शिकार व अन्न मिळविण्याचे इतर मार्ग सामूहिक दृष्ट्या हाताळले गेले असावेत. नवीन नवीन प्रदेशात वसती करण्याकडे कल वाढू लागला, स्थलांतरे होऊ लागली.


मध्य प्लाइस्टोसीननंतरच्या काळामध्ये मानवी अवशेषांच्या उपलब्धतेची बऱ्याच मोठ्या प्रमाणात पोकळी आढळून येते. सुमारे ५ लाख वर्षांनंतरच्या अवशेषांचा हा काल त्यामुळे २·५ लाख वर्षांमागे जातो. भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने ही पोकळी अगदी लहान असली, तरी मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात ही फारच मोठी पोकळी आहे. आधुनिक मानवाकडे झुकलेल्या प्रगतीच्या क्रांतिकारी वेगास यामुळे काही प्रमाणात खीळ बसली. आधुनिक काळातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न, संशोधनाच्या साहित्याचे आधुनिकीकरण यांमुळे कदाचित हा दुवा सांधला जाईलही.

ग्रेट ब्रिटनमधील स्वॉन्झफम येथे सापडलेली कवटी सु. अडीच लाख वर्षांपूर्वीचा काल दर्शविते. ह्या कवटीची लक्षणे बरीचशी मानवीय आहेत. तसेच जर्मनीमधील स्टाइनहाईम येथील कवटीचाही उल्लेख करावा लागेल. ह्या दोन्ही कवट्या आंतरहिमानीय कालातील आहेत. अधिकाधिक गोलाकार आकार व अधिकाधिक धारणक्षमता ह्या बाबतीत या दोन्ही कवट्या होमो इरेक्सटसपेक्षा वेगळेपण दाखवितात. स्टाइनहाईम कवटीचे अधिनेत्रक कंगोरे सपाटीकडे झुकलेले असून दात आधुनिक अवस्थादर्शक आहेत. दात आकाराने लहान, विस्ताराने आधुनिकतेकडे झुकणारे असून विशेषतः तिसरी दाढ आकाराने व विस्ताराने आधुनिकतेकडे झुकणारी असून लहान असल्याने आधुनिक म्हणावी लागेल. अशाच प्रकारचे भाष्य दक्षिण इथिओपियात सापडलेल्या अवशेषांबाबतही करता येईल.

उत्तर प्लाइस्टोसीनमधील आधुनिक मानव: उत्तर प्लाइस्टोसीनमध्ये सापडलेल्या प्राचीन मानवाचे अवशेष, संख्येने इतर कालांच्या मानाने कितीतरी पटीने अधिक आहेत. तसेच ते विस्तृत प्रमाणावर विखुरलेले आढळतात. होमो सेपियनचे प्राचीन अवशेष पूर्वेकडीस देश, अतिपूर्वेकडील प्रदेश, आशिया, आफ्रिका व यूरोप इतक्या विस्तृत प्रदेशांमध्ये आढळतात. अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये मात्र २० ते २५ हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व दिसून येते.

अतिपूर्वेकडील सोला (जावा), निहा (बोर्निओ) व चौकुतिन (पीकिंग-चीन) येथील अवशेषांचा उल्लेख विशेषत्वाने करावा लागेल. सोलो येथील अवशेष नदीच्या पात्रामध्ये सापडले. सुमारे अकरा कवट्या, दगडी साहित्य, हत्यारे, शस्त्रे व काही सस्तन प्राण्यांची हाडे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. त्यांचे सर्वसाधारण वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल. कवटीची भित्तीय हाडे जाड, परंतु सर्वसाधारण आकाराची, कपाळ उतरते, अधिनेत्रक कंगोरा मधोमध बसका व दोन निरनिराळ्या भागांमध्ये पसरलेला, भक्कम पश्चकपाल कंगोरे, उल्लेखनीय कर्णपश्चास्थि वगैरे.

उत्तर बोर्निओमधील एका खूप मोठ्या निहा येथील गुहेमध्ये जमिनीच्या खाली सु. २·४ मी. खोलीवर गाडलेल्या अवस्थेत अवशेष मिळाले. कवट्यांबरोबरच दगडी हत्यारेही मिळाली. रेडिओ कार्बन कालमापन तंत्रानुसार त्याचा काल सु. ३९ हजार वर्षे इतका येतो. लहान अधिनेत्रक कंगोरे, नाकाचे मूळ चेपलेले व कपाळ जवळजवळ सरळ उभे असे या कवट्यांचे वर्णन करता येईल. ही सर्व लक्षणे अलीकडील ऑस्ट्रेलियन आदिवासींप्रमाणे आहेत.

चौकुतिन येथे आठ व्यक्तींचे अवशेष, दगडाची हत्यारे व ओबडधोबधड दागिने सापडले. कवट्यांची परिस्थिती अतिशय निराशाजनक असली, तरी त्यांच्या गुणविशेषांची तुलना आधुनिक मंगोलियन वंशाच्या लोकांशी केली जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्या अवशेषांचा नाश झाल्याने त्यांचा पुन्हा अभ्यास करणे अशक्य झाले आहे.

आफ्रिकेमध्ये सापडलेल्या अवशेषांपैकी ब्रोकनहिल (ऱ्होडोशिया) येथील एक कवटी व इतर हातपायांची हाडे हे अवशेष महत्त्वाचे होत. भक्कम बांधणीची कवटी, जड व ओबडधोबड अधिनेत्रक कंगोरे, डोक्याचा सपाट भाग व वैशिष्ट्यपूर्ण पश्चकपाल कंगोरे असे वर्णन त्या अवशेषांचे केले जाते. याशिवाय मोठा चेहरा, मोठ्या आकाराची तालुका, किडक्या व काही धड स्थितीतील दात हीसुद्धा इतर वैशिष्ट्ये आहेत. यूरोपमध्ये सापडलेल्या निअँडरथल सांगाड्याची हाडे मात्र आधुनिक मानवाप्रमाणे वाटतात.

यानंतरचा महत्त्वपूर्ण अवशेष म्हणजे यूरोपमधील निअँडरथल मानव होय. काही वर्षांपूर्वी याची गणना एका स्वतंत्र जातीमध्ये केली गेली होती परंतु आता मानवकुलातील एका वंशात त्याची गणना केली जाते. हे लोक शेवटच्या हिमयुगाच्या काळात म्हणजे सु. ५० हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्यांच्या शारीरिक घटकगुणांचा एकत्र संचय हा महत्त्वाचा पुरावा असून त्यांचा निरनिराळ्या प्रकारे उल्लेख केला जातो. अभिजात व पुरोगामी असे दोन गट त्यांच्यामध्ये दिसतात. हे त्यांचे दुसरे वैशिष्ट्य. अभिजात निअँडरथल मानव उंचीने लहान परंतु लठ्ठ, शक्तिमान हातपाय, मोठ्या पोकळीची कवटी असलेला व हनुवटीचा अभाव असलेला जबडा, अशा वर्णनाचा होता. या त्याच्या विशिष्ट शरीर गुणधर्माचा संबंध त्यावेळच्या वातावरणातील गोष्टींबरोबर जोडला जातो.

डुसलडॉर्फ (जर्मनी) येथील निअँडरथल दरीमध्ये १८५६ मध्ये याचा प्रथम शोध लागला त्याच्या एकंदर स्थितीवरून अनेक वाद निर्माण झाले. काहींच्या मते तो एक रोगट व अशक्त माणसाचा सांगाडा होता, तर इतर काहींच्या मते तो एका रानटी अवस्थेतील प्राण्याचा – कदाचित मानवाचाही – सांगाडा असावा. हे मतप्रवाह इ.स. १९०८ पर्यंत होते. फ्रान्स मधील ला-शपेल आँ – साँ येथे १९०८ साली सापडलेल्या अवशेषांबरोबर हा वादही संपुष्टात आला व त्याची गणना मानवकुलातील एका जातीत केली गेली. कुबड्या शरीरयष्टीचा, गुडघ्यामध्ये वाकून चालणारा, चेहरा मानेपासून बराचसा पुढे ओढलेला असा त्याचा संदर्भ दिला जातो. तथापि निअँडरथलचे सर्व अवशेष चांगल्यापैकी, उन्नत स्थितिधारक, उत्तम प्रकारे दोन पायांवर चालण्याची कला आत्मसात केलेल्या व चांगले यशस्वी आयुष्य जगणाऱ्या शिकारी मानवाची प्रतिकृती उभी करतात. एवढेत नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देणाऱ्या मानवाची आकृती डोळ्यापुढे येते. सुरुवातीचे वर्णन एका रोगट व वयस्कर माणसाचे, वयामुळे त्याच्या शरीरावर झालेल्या परिणामामुळे झालेले असावे.

जिब्राल्टरपासून चेकोस्लोव्हाकियापर्यंत व जर्मनीपासून इस्त्राएलपर्यंत इतक्या विस्तृत प्रदेशामध्ये त्याचा वावर होता. कित्येक अवशेष फ्रान्समधील दोरदाँ येथील चुनखडीयुक्त गुहांमध्ये आढळले आहेत. होमो इरेक्टसप्रमाणेच अग्नीचा उपयोग करण्याची व दगडाची हत्यारे बनविण्याची कला यालाही आत्मसात होती. उलट मृत माणसांना पुरणे व काही प्रमाणात मृत्यूनंतरचे संस्कार करणे, या बाबतीत तो होमो इरेक्टसपेक्षा एक पाऊल पुढेच होता असे म्हणावे लागेल. याच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत.

आश्चर्यकारक रीत्या निअँडरथल मानव एकाएकी लुप्त झाला. त्याच्या अशा प्रकारे लुप्त होण्यामागची कारणे निश्चितपणे व समाधानकारक रीत्या अद्यापि ज्ञात झाली नाहीत. काही जणांचे मते तो काही नैसर्गिक आपत्तींमुळे लुप्त पावला असावा. इतर काहींच्या मते त्याचे रूपांतर त्याच्या पुढील काळातील प्रगत मानवामध्ये फारच जलद गतीने होत गेले असावे, तर त्या काळातील त्याच्यापेक्षा बलाढ्य अशा दुसऱ्या कोणी गटाने त्याचे संपूर्ण शिरकाण केले असल्याची शक्यताही बोलून दाखविली जाते. याबाबतीत अनेक विचार व उलटसुलट मते मांडली गेली. एक गोष्ट निश्चित की त्याच्यानंतर आलेल्या व तुलनेने त्याच्यापेक्षा अधिक आधुनिक अशा मानवाची उत्क्रांती झाली. यामुळे शेवटचे व तिसरे कारण अर्धवट पण बरेचसे बरोबर असावे असे वाटते. याचाच अर्थ असा की निअँडरथलपेक्षा बलाढ्य असलेल्यांनी त्याच्यावर आक्रमण करून त्याला इस्त्राएलच्या बाजूस पळवून लावले असावे. ही गोष्ट पुराव्यानेही सिद्ध होते. इस्त्राएलमधील मौंट कार्मेल येथे शेजारीशेजारी असणाऱ्या दोन गुहांमध्ये काही मानवी अवशेष मिळाले. त्यांपैकी एका गुहेतील सांगाडे निअँडरथलसारखे वाटतात, तर दुसऱ्या गुहेतील सांगाडे प्रगतिपथावरील परंतु मिश्र लक्षणांच्या मानवाचे वाटतात. तसेच हिमयुगाची पीछेहाट झाल्यामुळे जास्त आधुनिक लक्षणांच्या मानवाची उप्तत्ती होऊन निअँडरथल नष्ट पावला असण्याची शक्यता आहे.


क्रो-मॅग्‌नान हे त्या नवीन मानवाचे नाव. हे त्याचे नाव लेझेझी-द-तायाक या खेड्यातील (दॉर्दान्य विभाग-फ्रान्स) क्रो-मॅग्‌नान ह्या गुहेवरून दिलेले आहे. त्याचा काल सु. ३२ हजार वर्षांपूर्वीचा परंतु त्याचे यूरोपातील आगमन त्यापूर्वी ५ ते १० हजार वर्षे आधी झाले असावे, असा अंदाज आहे. उंच, सडसडीत बांध्याचे, आधुनिक शरीर बांधणीचे इ. प्रमाणात ते आजच्या इंडोयूरोपियन लोकांसारखे असावेत.

सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले व सामाजिक जाणीव असलेले हे लोक योजनापूर्वक शिकार करून अन्न मिळवीत असावेत. त्यांची शस्त्रे व हत्यारे दगडांपासून आणि हाडांपासून बनविलेली दिसतात. हे लोक कलाप्रेमी असावेत, असा पुरावा येथील गुहांमधील कोरीव कामावरून मिळतो. चित्रकलेच्या बाबतीतही हे लोक पुढारलेले वाटतात. जननक्रियेसंबंधीची काही चित्रेही मिळाली आहेत. जादूटोणा व देवदेवतांवर विश्वास, त्यांची पूजा करून शिकारीतील काही वाटा त्यांना अर्पण करण्याचे तारतम्य क्रो-मॅग्नांना होते. यावरून शारीरीय लक्षणे, संस्कृती, तांत्रिक माहीती, सामाजिक जीवनाची जाणीव इ. बाबतीत क्रो-मॅग्‌नान आधुनिक मानवाच्या अगदी जवळचा वाटतो.

त्यानंतरचा आत्तापर्यंतचा इतिहास सर्वज्ञात आहे. क्रो-मॅग्‌नाननंतर आलेले मानव म्हणजे मध्याश्मयुगातील मानव होत. त्यानंतर आलेले नवाश्मयुगीन मानव हे नंतरचे मानव शारीरिक दृष्ट्या एकमेकांपासून फारसे निराळे नाहीत. भेद जातिस्तरावर न आढळता वंशस्तरावर आढळतो. सांस्कृतिक दृष्ट्या हे सर्व पुढारलेले होत. क्रमाक्रमाने शेती, प्राण्यांचा शेतीसाठी उपयोग, प्राण्यांना माणसाळविणे, श्रम तत्त्वावर कामाची विभागणी, सामाजिक विभागणी वगैरे गोष्टी सर्वज्ञात आहेत.

कपी व मानव यांची तुलना: ही तुलना शारीरिक अवयवांची लक्षणे, मानसिक लक्षणे, शारीरक्रियात्मक लक्षणे, सामाजिक जीवन, वर्तणूक इ. अनेक स्तरांवर केली जाते. शरीरावयवांची व शारीरक्रियात्मक लक्षणांची तुलना खाली दिली आहे.

शरीरावयव  मानवात आढळणारी लक्षणे  कपीमध्ये आढळणारी लक्षणे 
१.कवटी ललाटीय भागाचा खूपच विकास झाला. कपाळाचा भाग जवळ जवळ सरळ उभा असतो. अधिनेत्रक कंगोरे कमी विकसित असतात. अरीय-प्रतलीय किंवा त्याच्याशी काटकोनात असलेले असे दोन्ही कंगोरे अजिबात नसतात. बृहद्रंध्र कवटीच्या तळाच्या मध्यभागी असते. त्यामुळे मस्तक व्यवस्थित तोलले जाते. चेहऱ्याचा भार सरळ असतो. ललाटीय भाग अविकसित असतो. कपाळाचा भाग भुवईपासून एकदम पाठी मागे उतरता होत जातो. अधिनेत्रक कंगोरे चांगलेच विकसित असतात. अरीय- प्रतलीय व त्याच्याशी काटकोनात असलेले कंगोरे बहुधा अस्तित्वात असतात. काहीवेळा यातील एकच कंगोरा कवटीच्या तळाच्या मागील बाजूस असतो. यामुळे डोळे व चेहऱ्याचा भाग पुढे ओढल्यासारखा दिसतो.
२.खालचा जबडा कपीच्या तुलनेने लहान असतो व चलनवलन क्रियेसाठी जरूरी असणारे स्नायू अशक्त असतात. हनुवटी व्यवस्थित विकसित असते. उदगतहनु जरी क्वचित प्रसंगी असली, तरी तिचे अस्तित्व असते. संपुंजित खालचा जबडा असतो. हनुवटी अजिबात नसते. चलन वलन क्रियेचे स्नायू भक्कम व टणक असतात. चेहऱ्याची उदगतहनु अस्तित्वात असते तेही लक्षणीय.
३.दात एकूण दातांचा आकार लहान असतो. सुळे इतर दातांच्या पृष्ठभागाच्या बरोबर असतात.

वरखाली एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे अशी वर्तुळाकार चर्वणक्रिया, दंतपंक्तीची कमान अन्वस्ति असते.

एकूण दातांचा आकार मोठा असतो. सुळे इतर दातांच्या पृष्ठभागाच्यावर आलेले असतात. यामुळे फक्त वरखाली येवढीच चर्वणक्रिया होते. इंग्रजी ‘यू’ या अक्षरासारखी दंतपंक्तीची कमान असते.
४.नाकाचा भाग पूर्ण विकसित नाक असते. नाकाच्या मुळाशी व नाकाचा पूल थोडासा उचललेला असतो. कूर्चा नाकाच्यावर व्यवस्थित असते. नाकाच्या टोकाशी एक गोलाकार मांसाचा भाग असतो. नाकाच्या पडद्याच्या व्यवस्थित वर तो आलेला असतो. नाकपुड्या व्यवस्थित विकसित असल्या, तरी कातडीचा भाग नाकाच्या पडद्यापेक्षा लांब नसतो. नाकाच्या मुळाशी व नाकाचा पूल अजिबात उचललेला नसतो, तर बसका असतो. कूर्चा फार रुंद असून त्याची त्वचा नाकाच्या लांबी –पेक्षा अधिक असते. नाकपुड्यांचा भाग मोठा, लक्षणीय व दोन मोठ्या भोकांसारखा दिसतो.
५.ओठाचा भाग मुख्य ओठाच्या थोड्या वर असलेल्या त्वचेच्या मध्यभागी खाच असते. ओठांची जाडी पातळ ते जाड इतपत असते. लहान मुलांसारखे ओठ पुढे आलेले असतात. हे पातळ असून लोंबते असतात. ओठांचे बहिर्वलन क्वचितच दिसते अगर दिसतही नाही. मुख्य ओठाच्या थोडी वर असलेली त्वचा पातळ असते.
६.बाहू व हात दोन्ही लांबीने कपीच्या तुलनेने लहानच असतात. तरफेसारखा उपयोग वजन उचलणे वगैरे प्रकारे होत असल्याने लांबी कमी झालेली असावी. अशा वेळी टेकू कोपराच्या जागी असून वजन प्रबाहू वर पडते. अंगठे संमुख असतात. त्यामुळे लहान लहान टाचणीसारखी वस्तूही सहज उचलता येते. बाहू संचलनाच्या कृतीस उपयुक्त असे लांब हात व बाहू असतात. या ठिकाणी टेकू जरी कोपराच्या जागी असला, तरी वजन खांद्यावर पडते. त्यामुळे झोके घेत इकडून तिकडे जाण्यास उपयुक्त असे लांब हात व बाहू होतात. अंगठे संमुख असतातच असे नाही.
७.उर्वस्थि किंवा मांडीचे हाड लांबट, नाजूक असते. स्नायुबंधने अशक्त असतात. लीनिया अस्पेरा हे मानवाचे खास वैशिष्ट्य. यामुळे उन्नत आसनासाठी मोलाचे काम केले जाते. हाडाचा छेद त्रिकोणाकृती असतो. आखूड, जाड, वक्राकार असते. यामुळे म्हाताऱ्या माणसासारखी गुडघ्यात वाकून चालण्याची चाल असते. स्नायुबंध मात्र बळकट असतात. लीनिया अस्पेरा फारसा विकसित नसतो. हाडाचा छेद गोलाकार अथवा लंबवर्तुळाकार असतो.

शरीरावयव  मानवात आढळणारी लक्षणे  कपीमध्ये आढळणारी लक्षणे 
८. पावले किंवा पाय उन्नत अवस्थेत चालण्याच्या कृतीमुळे पाया-मध्ये लक्षणीय बदल झालेले दिसतात. दोन पायांवर संपूर्ण शरीर तोलले जाते व सर्व वजन दोन पायांवरच पडते. पायाचा अंगठा असंमुख असतो, तसेच इतर बोटांची लांबीही कमी झालेली दिसते. पावले पुढून-पाठीमागे व एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे बाकदार झालेली दिसतात. याला चालण्याच्या क्रियेतील बदलच कारणीभूत असावा. पायाचा उपयोग चालणे, धावणे तसेच झाडाच्या फांद्या पकडण्यासाठी होतो. म्हणून अंगठे संमुख असतात.तसेच अंगठे इतर बोटांच्या रांगेत नसतात. सर्व बोटे चांगलीच विकसित झालेली दिसतात. पावले बाकदार नसून सपाट असतात.
९. उंची व शरीरयष्टी मानवाचे अति-खुजे तसेच अति-उंच असे दोन्ही प्रकार असले, तरी सर्वसाधारणपणे सरासरी उंची १·८० मीटर व वजन ६५·५ किग्रॅ. च्या आसपास असते. पाठीच्या कण्याला एका- आड एक असे चार बाक असून यांवर शरीर उन्नत अवस्थेत व्यवस्थित तोलले जाते. उंची व वजन वय आणि लिंग यांप्रमाणे बदलते असते. कपीसुद्धा उंचीने बदलते असतात. कपींपैकी सर्वांत लहान म्हणजे गिबन. त्याची सरासरी उंची ०·८ मीटर व वजन ८ किग्रॅ. असते. त्या नंतर ओरँगउटान होय. त्याची सरासरी उंची १·५ मीटर व वजन ७२ किग्रॅ. असते, चिंपँझीची उंची १·५ मीटर तर वजन ३७ किग्रॅ. ते ४० किग्रॅ. व गोरिलाची सरासरी उंची १·७ मीटर व वजन सरासरी १२० किग्रॅ. ते २०० किग्रॅ. असते. अर्थात वजन व उंची लिंग व वय यांप्रमाणे बदलत असते. पाठीच्या कण्याला फक्त दोन ठिकाणी बाक असतो व आकार धनुष्याकृती असल्याने पाठीत पोक आल्यासारखे दिसते.
१०.मेंदू आकाराने वाढलेला व विकसितही असतो. त्याचे वजन गोरिलाच्या मेंदूच्या तिप्पट असते. ललाटीय भागाची व इतरही भागाची रचना गुंतागुंतीची असते. मेंदू जरी आकाराने शरीराच्या प्रमाणात मोठा असला, तरी त्याची रचना फारशी गुंतागुंतीची नसते. रचनात्मक वैधर्म्य हेच काही महत्त्वाचे नाही. निरनिराळ्या कृतींशी निगडित अशा भागांचा विकासच महत्त्वाचा असतो. या दृष्टीने त्यांचा मेंदू अविकसित असतो.
११.वाचाशक्ती व्यवस्थित बोलण्याची कला हेच मानवाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक मानव कोणती ना कोणती भाषा बोलतच असतो. वाचाशक्तींचा कपींमध्ये अगदी अभावच असतो. काही विशिष्ट आवाज व खाणाखुणा यांद्वारे एकमेकांबरोबर सुसंवाद साधण्यात येतो.

नरवानर गणांची उत्क्रांती: नरवानर गणांची उत्क्रांती विशेषतः दोन गोष्टींमध्ये झालेली आढळते. त्या म्हणजे (१) हातापायांची संरचना व (२) कवटीच्या भागाची उत्क्रांती. ले ग्रॉस क्लार्क याने हेच वर्गीकरण पुढीलप्रमाणे दिले आहे.

(१) हातापायांची संरचना : (अ) सस्तन प्राण्यांमधील सर्वसाधारण व आदिम लक्षणांचे स्थैर्य : (१) जत्रु किंवा गळ्याच्या हाडाची धारणा यांमुळे हातांची चलनवलन क्रिया सुलभ होते. (२) हातापायांच्या पाच पाच बोटांची धारणा. हेही आदिम लक्षणच आहे.

(ब) पकडण्याच्या क्रियेवर भर : (१) यामध्ये बोटांच्या चलनवलनाचा भाग येतो. संमुख अंगठ्याचा या क्रियेमध्ये मोठा वाटा आहे. (२) जाडसर नखीऐवजी सपाट, पातळ व छोटी नखे बोटांच्या अग्रभागी आढळतात. यामुळे बोटे, पंजे, तळवे यांवर मांसल गाद्या तयार होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे संवेदनाक्षम तंतूंची वाढ होण्यास मदत होऊन हातपाय संवेदनक्षम अवयव म्हणून उपयोगी पडतात.

(२) कवटीच्या भागांची उत्क्रांती : (अ) दृष्टीच्या शक्तीमध्ये विकास : यामुळे अनेक प्रकारची दुर्बिणीसारखी क्षमता प्राप्त होते.

(ब) निकडीचे निर्णय घेण्यासाठी योग्य अशा मेंदूच्या भागाचा विकास झाला आहे.

(क) नाकाच्या पोकळीचा व त्यालगतचा भाग अविकसित राहिला व बऱ्याच वेळा त्याची क्षमता कमी झालेली दिसते. (१) नाकाचा उपयोग सूक्ष्म वास घेण्यासाठी होत नाही. इतर प्राण्यांची घ्राणेंद्रिये मात्र तीक्ष्ण असतात. (२) दातांच्या आकारात व संख्येत घट आढळते. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ म्हणून त्यांचा उपयोग कमीच होतो. त्यामुळे दातांच्या मुगुटाच्या दलांचीही संख्या कमी झाली. इतर प्राण्यांच्या मानाने दात दुर्बलच असतात. याला आहाराच्या सवयीही कारणीभूत आहेत.

वरील वर्गीकरणाच्या आधारे ले ग्रास क्लार्कने उत्क्रांतीबदलाची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे.

(१) सर्वसाधारण संरचनात्मक लक्षणांचे जतन केलेल आढळते. विशेषतः हातापायांची पाच बोटे तसेच जत्रु अगर गळ्याचे हाड या गोष्टी काही सस्तन प्राण्यांमध्ये अतिशय अविकसित राहिल्या, तर इतर काही प्राण्यांमध्ये त्या नामशेष झाल्या.

(२) हातापायांच्या अंगठ्यांचे मोकळेपणाने व स्वतंत्रपणे संचलन केले जाते. यांचा उपयोग वस्तुवरील पकड घट्ट बसविण्याच्या कामी केला जातो.

(३) अतिशय टोकदार, जाड व ओबडधोबड नखांचे परिवर्तन पातळ, सपाट व लहानशा नखांमध्ये झाले. त्याचबरोबर तळवे व पंजे यांवर गाद्या तयार होऊन संवेदनाक्षम अवयव होण्यास मदत झाली. गरम, थंड, काटेरी, मऊ, ओबडधोबड, राकट वगैरेंचे स्पर्शज्ञान होण्यास यामुळेच मदत होते.

(४) उत्क्रांतिस्थितीपरत्वे नाकाचा आणि त्या भोवतालचा भाग विकसित होण्यास मदत झाली.

(५) क्लिष्ट, गुंतागुंतीच्या रचनेची व जमिनीस समांतर अशी दृष्टी प्राप्त होण्यास मदत झाली. त्रिमितिदृष्टी विकसित झालेली दिसते.

(६) सूंघण्याच्या क्रियेशी निगडित असणाऱ्या त्वचेची कार्यक्षमता कमी झाली.

(७) आदिम सस्तन प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या दातांच्या प्रकारांचा नाश पावून साधे सुटसुटीत दल निर्माण झाले. दाढांचा आकारही लहान होऊन चतुर्दली बनण्याकडे कल आढळतो.

(८) मेंदूचा आकार व गुंतागुंतीची रचना यांमध्ये क्रमाक्रमाने सध्याची स्थिती प्राप्त झाली. सध्या अतिशय क्लिष्ट रचनेचा व मोठ्या आकाराचा मेंदू मानवात आढळतो. तसेच निरनिराळ्या क्रियांसाठी कारणीभूत असलेल्या मेंदूच्या भागांचाही क्रमाक्रमाने विस्तार झाला.


(९) गर्भावस्थेमध्ये यशस्वी विकसन आढळते. असे विकसन क्रमाक्रमाने झालेले आढळते. गर्भावस्थेचा काल लांबला असून या कालात गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक रचना शरीरामध्ये प्रस्थापित झाल्या.

(१०) क्रमाक्रमाने उन्नत अवस्था व द्विपदी संचलन निर्माण झाले आणि

(११) जन्मानंतरचे एकूण आयुष्य फार मोठ्या कालाचे होण्याकडे कल आढळतो.

वरील लक्षणांविषयीचे निष्कर्ष प्राचीन मानवांच्या अवशेषांवरून काढले गेले. यांतील सर्वच्या सर्व निष्कर्ष सर्वच नरवानरांना लागू पडत नाहीत. तसेच केवळ संरचनेचा विचार उपयोगाचा नसून त्याचा कार्यात्मक संबंध व प्राण्यांच्या वागणुकीवर होणारा परिणाम या संदर्भात पाहिले पाहिजे. अनेक संरचनात्मक लक्षणांपैकी संरचना, कार्यात्मक संबंध आणि वर्तणूक या तीन पातळ्यांवर पुढील चर्चा आधारित आहे.

उन्नत आसनाचा शरीरावर होणारा परिणाम: आदिम सस्तन प्राण्यांकडून आपण जसजसे मानवाकडे येऊ लागतो, तसतसे आसनस्थितीत फरक पडलेला दिसून येतो. चतुष्पाद अवस्थेमधून द्विपाद अवस्थेमध्ये येताना शरीरातील कित्येक अवयवांवर परिणाम झालेला दिसून येतो. यामध्ये कवटी, हात, पाय, कटि, पाठीचा कणा, बृहद्रंध्राची अवस्था, दृक्‌शक्ती, स्कंधास्थी हाडांचा आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या अवयवांचा समावेश होतो. उन्नत अवस्थेमध्ये येताना कवटीचा आकार काहीसा मोठा झालेला दिसून येतो. यामुळे मेंदूचा नुसता आकारच मोठा झाला नसून त्याची रचनाही काहीशी गुंतागुंतीची झाली आहे. यामुळे नैसर्गिक साधनांचा आपल्या कल्याणासाठी आपण योग्य तो उपयोग करून घेऊ शकतो. कवटीच्या तळाशी असलेले बृहद्रंध्र जर पाठीमागील बाजूस झुकलेले असेल, तर चेहरा व कवटीचा भाग पुढे ओढल्यासारखा होतो. तसेच पाठीच्या कण्याचा आकार धनुष्याकृती होऊन स्कंधास्थीची लांबी धडाचा भार सांभाळण्यासाठी जास्त वाढते. कण्याची कमान झाल्यामुळे त्याचा परिणाम कटीच्या हाडांवर होऊन त्याचीही लांबी वाढते. यामुळे श्रोणीची पोकळी अरुंद होते. या सर्वांचा परिणाम चतुष्पाद अवस्थेमध्ये होतो. परंतु बृहद्रंध्र कवटीच्या तळाच्या पुढील बाजूस अगर मध्यभागी असेल, तर चेहरा व कवटीचा भाग फारसा किंवा अजिबात पुढे ओढल्यासारखा येत नाही. पाठीचा कणा धनुष्याकृती होण्याऐवजी त्याला चार बाक येतात व डोके कण्यावर व्यवस्थित तोलले जाते. यामुळे द्विपदी अवस्था प्राप्त होण्यास मदत होते. परिणामी स्कंधास्थीची लांबी कमी होते कारण धडाचा भार स्कंधीस्थीवर न पडता तो कटीवर पडतो. कटीची हाडे मात्र यामुळे अधिक रुंद होतात. त्यांची लांबी कमी होते व कटीची पोकळीही मोठी होते. धड व डोक्याचा भाग यांमुळे यशस्वी रीत्या तोलला जातो. उन्नत अवस्थेचा कटी व पायावर विशेषच परिणाम होतो. कटीची हाडे मात्र जाड होतात. तसेच कटी धडाशी व पायाशी जोडणारे स्नायू बळकट बनतात व स्कंधास्थीस जोडणारे स्नायू मात्र त्यामानाने दुर्बलच राहतात. कटीची पोकळी धडाच्या प्रमाणात मोठी झाल्यामुळे संपूर्ण धड डोके व्यवस्थित तोलण्यास मदत तर होतेच परंतु अर्भकाच्या जन्मासाठी व गर्भावस्थेमध्ये गर्भाची अवस्था व्यवस्थित राहण्यासही मदत होते. कटीवर येणारा भार शेवटी दोन पायांवर तोलावा लागतो. यामुळे उर्वस्थी बळकट बनण्यास मदत होते. तसेच उर्वस्थीच्या पाठीमागील बाजूस ‘लीनिया अस्पेरा’ नावाचा बळकट कंगोरा तयार होतो. यालाच पायाचे व कटीचे स्नायू जोडले जातात. दोन पायांवरच चालण्याची क्रिया होत असल्याने पावलांच्या हाडांच्या संरचनेमध्ये लक्षणीय बदल दिसतात. पावलांना पुढून पाठीमागे व एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असा बाकदारपणा येतो. त्यामुळे तोल सांभाळण्यास मदत होते. उन्नत अवस्थेमध्ये कमी भार वाहणारे अवयव म्हणजे, स्कंधास्थी, बरगड्या व जबडे. यांमुळे त्यांच्या आकारमानातही लक्षणीय घट दिसून येते. स्कंधीस्थी पातळ होते, हाताची हाडे कमी लांबीची बनतात. कवटीच्या ललाटीय व पश्चकपोलास्थीचा भाग जास्त गोलाकार न होता कवटीच्या गोलाकाराशी प्रमाणित असतो. अधिनेत्रक कंगोरे कमी जाडीचे बनतात. जबड्यांची संपुंजित अवस्था कमी होते. त्यांची लांबी कमी होते. त्यामुळे अप्रत्यक्ष दंतपंक्तीवर परिणाम होऊन, त्यांचाही आकार लहान होतो. हाडांचा उपयोग वस्तू हाताळण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी अथवा हलक्या कार्यासाठी होत असल्याने दातांचा उपयोग संरक्षणार्थ केला जात नाही. अशा तऱ्हेने संपूर्ण शरीरावर उन्नत अवस्थेच्या परिणामांचे विश्लेषण करता येते.

नरवानर गणांचे सामाजिक जीवन : मानवाचा नरवानर गणांमध्ये समावेश होतो. मानवाशिवाय इतर नरवानरांपैकी कपीच्या सामाजिक जीवनविषयी बरेच संशोधन भारताशिवाय इतरत्र झालेले आहे. त्याची काही ठळक वैशिष्ट्ये अशी : गोरिलाच्या सामाजिक जीवनासंबंधी कार्ल एकली, बिंगॲम, पिटमन, मिझूहरा, नाथॅन्येल शेलर, हेन्री ओझबर्न इत्यादींनी संशोधनपर लिखाण केलेले आढळते. त्यांपैकी शेलरने निर्दिष्ट केलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे :

गोरिला समूहरूपाने राहतात. असे समूह ५ ते ३० जणांचे असतात. समूहातील प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेत असतो. समूहातील सभासद संख्या एखाद्या जन्माने अगर एखाद्या तरूण गोरिलाच्या बाहेर जाण्याने अगर समूहात येण्यानेच बदलते. नर-माद्यांचे साधारणपणे १:२ असे प्रमाण असते. समूहातील घडामोडी नेत्याच्या मार्गदर्शनानुसार होत असतात. एकमेकांमध्ये हावभावाच्या द्वारे किंवा काही विशिष्ट आवाजाद्वारे अगर खुणांच्या रूपाने संबंध राखले जातात. प्रत्येक समूहाच्या हालचाली करण्याचे क्षेत्र १६–२५ किमी. एवढ्या मर्यादे पुरते असते.

गिबनच्या सामाजिक जीवनाची माहिती कार्पेन्टर (१९४०) याच्या लिखणातून पुढीलप्रमाणे मिळते. त्यांचा समूह २ ते ६ जणांचा असतो. नर, मादी व समोर चार बालके असे त्याचे स्वरूप असते. कधीकधी म्हाताऱ्या गिबनचाही समावेश यामध्ये केला जातो. गिबन तरूण झाल्यानंतर जोडीदाराच्या शोधात बाहेर पडून निराळा समूह स्थापन करतो. म्हातारे गिबन मात्र एकाकी जीवन जगतात. समूह साधारणपणे १०० ते ११० हेक्टर जागेमध्ये वावरत असतो. विशिष्ट उच्च स्वरातील आवाज करून ते एकमेकांशी सुसंवाद साधतात. मित्रांशी भेटताना लाळघोटेपणा करतात व दातांनी लहान लहान न टोचतील असे चावे घेतात. राग आल्यावर मात्र दात-ओठ खाऊन एकमेकांवर गुरगुरतात, डरकावतात. समूहा-समूहांत सारखी भांडणे होत असतात. नराचे समूहामध्ये आधिपत्य असते. मादी आप्तजनांशी सलोखा राखण्यात पुढाकार घेत असते. नर-नरांमध्ये अगर माद्या-माद्यांत मात्र खूपच भाडणे होत असतात. अंग चाटून चाटून स्वच्छ ठेवले जाते.

ओरँगउटानच्या सामजिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तरीसुद्धा शेलर, चार्ल्स डॅव्हेनपोर्ट व हॅरिसन यांच्या लिखाणातून थोडीफार माहिती मिळते. साधारणपणे २, ३ किंवा ४ जणांचा समूह असतो. यामध्ये मुलांचा समावेश होतोच असे नाही. जे त्यांचा अभ्यास करू इच्छितात त्यांच्यावर ते त्वेषाने हल्ला चढवितात व पळवून लावतात.


चिपँझीच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास झुकरमान, हर्बर्ट स्पेन्सर, कार्पेन्टर इत्यादींनी आढळतो. सर्व कंपीमध्ये चिपँझीचे जीवन मानवी जीवनाशी खूपच मिळतेजुळते असे आढळते. सामूहिक जीवन, मोठ्यांबद्दलचा आदर, लहानांचे पालन पोषण, माद्यांचे स्वातंत्र्य, मनोरंजन करून घेण्याची कला, नेत्याचे ऐकणे, सहकाराच्या तत्त्वावर काम करणे, सामान्य जीवन वगैरे सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये आढळतात. तसेच इतर कपींच्या मानाने तुलनात्मक दृष्ट्या चिपँझीचा बुद्ध्यंकही अधिक असतो. अन्न मिळविण्याच्या क्रियेमधील वापरली जाणारी कौशल्यपूर्ण युक्ती या गोष्टींनी बुद्धीची कल्पना येते. आपल्या क्षमाचा इतरांच्या दृष्टीने कसा फायदा होईल, या जाणिवेनेही ते कार्य करतात. अनाथ चिपँझींचा व्यवस्थित सांभाळ करतात. मालमत्तेबाबतही काहीशी भावना त्यांच्या जवळ असते. स्वतःचे मनोरंजन डोके वापरून चिपँझी तसे करतात, याचे वर्णन गार्नरने केलेले आढळते. तो लिहतो, ‘एके दिवशी अनेक चिपँझींनी एक मोठा मातीचा गोळा तयार करून त्याचा चिखल केला. त्या चिखलाच्या गोळ्याला ढोलक्यासारखा आकार देऊन उन्हात वाळविण्यास ठेवून दिला. तो चांगला वाळल्यावर आजूबाजूच्या भागातील चिपँझी रात्री एकत्र जमले व ते गोळ्याभोवती फेर धरून आवाज करून नाचू लागले, गाऊ लागले. त्यांपैकी एक चिपँझी ते ढोलके हाताने बडवीत होता… वगैरे’.

नरवानर गणांतील कपींच्या या सामाजिक जीवनाच्या आधारे, ते मानवाच्या नजीकचे होत असे म्हटल्यास चूक होणार नाही.

अशा तऱ्हेने मानवप्राण्याचा विकास कसाकसा होत गेला व आधुनिक मानवाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंत आपण कसा प्रवास केला ते पाहिले. जगाच्या पाठीवर सगळीकडे आढळणारा मानव सारखाच असून मानवा मानवांमधील भेद निसर्गनिर्मित नसून, मानवनिर्मित आहेत, याचाही पडताळा येतो. चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यांपासून दोन पायांवर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये ज्या प्रकारे मानवाची उत्क्रांती झाली, त्याला पूरक असे सामाजिक जीवनही विकसित होत गेले. ही गोष्ट कपींच्या सामाजिक जीवनाच्या आधारे प्रत्ययास होते. म्हणून सध्याचा मानव हा आधुनिक प्रगत मानवप्राणी असे मानले जाते.

संदर्भ : 1. Boule, Vallois, Fossil Men, New York, 1951.

2. Comas, Juan, Manual of Physical Anthropology, Illinois, 1960.

3. Day, M. H. Fossil Man, Melbourne, 1972.

4. Day, M. H. Guide of Fossil Man, London, 1965.

5. Hooton, E. A. Up From the Ape, New York, 1963.

6. Johanson, D. E Maitland, A.E. The Dramatic Discovery of Our Oldest Human Ancestor Lucy, London, 1982.

7. John, B. T. Origins of Man, Inc. 1969.

8. Napier, J. R Napier, P.H. A Handbook of Living Primates, New York, 1967.

कुलकर्णी, वि. श्री.

ऱहोडेशियन पुरुषनिअँडरथल स्त्रीपॅलेस्टाईन पुरुषबलुची पुरुष - पाकिस्तानसिंहली पुरुष - श्रीलंकापृथनितंब्रिनी : हॉटेंटॉट स्त्री, नैर्श्रृत्य आफ्रिका.