खस : उ. प्रदेशातील डेहराडून जिल्ह्यात आढळणारी एक वैशिष्ट्यपूर्ण जमात. यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून भ्रातृ-बहु-भर्तृत्वाची प्रथा प्रचलित आहे. वधूमूल्य दोन हप्त्यांत देतात पहिला हप्ता विवाहप्रसंगी व उरलेला हप्ता पत्नीला मूल झाल्यानंतर देण्यात येतो आणि काही वर्षे पत्नीला मूल झाले नाही, तर प्रथम घेतलेले अर्धे वधूमूल्य वरपित्याला परत करावे लागते. जैविक पितृत्वापेक्षा सामजिक पितृत्वाला त्यांच्यात प्राधान्य दिले जाते. बहुपतित्वाची प्रथा असल्यामुळे स्त्रीला नवऱ्यांच्या घरी शारीरिक व भावनिक ताण स‌हन करावा लागून अतिशय कष्टात दिवस काढावे लागतात. पण या खस स्त्रियांना माहेरी आल्यानंतर मात्र लैंगिक संबंधाच्या बाबतीत स्वातंत्र्य असते. या जमातीची संख्या हळूहळू घटत चालली आहे.                                

देशपांडे, सु. र.