दुबळा : एक आदिवासी जमात. यांची वस्ती गुजरात, महाराष्ट्र, दाद्रा व नागरहवेली यांत आढळते. गुजरातमधील सुरत व भडोच जिल्हे व महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा यांत त्यांची प्रामुख्याने वस्ती असून लोकसंख्या ३,३८,३६८ होती (१९६१).

वैशिष्ट्यपूर्ण ओटा असलेली दुबळांची झोपडी

दुबळा या संज्ञेबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांपैकी एक म्हणजे त्यांनी शत्रूपुढे आपला दुबळेपणा व्यक्त केला म्हणून शत्रूने त्यांना दुबळा ही संज्ञा दिली असावी दुसरी म्हणजे एकदा दुष्काळ पडल्यामुळे त्यांची जमात अन्नपाण्यामुळे अशक्त झाली, त्या वेळेपासून लोक त्यांना दुबळे म्हणू लागले.

गुजरातमधील बहुसंख्य दुबळा, गुजराती भाषा बोलतात, तर महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलतात.

दुबळांच्या एकूण २५ शाखा आहेत : बाबा, बल्सरिया, बर्निया, चोरिया, दमनी, हर्व्हिया, इस्त्रिया, खर्चा, खोडिया, मंडव्हिया, नर्दा, ओल्पडिया, रठोडिया, सरव्हिया, सिप्रिया, तलाव्हिया, उखरिया, उम्रिया, वसवा, वोहरा, घंगलिया, कान्हरिया, ठाकोर, थलिगोरिया व वातोलिया. त्यांपैकी तलाव्हिया, वोहरा आणि खर्चा या तीनच महत्त्वाच्या व प्रमुख असून पूर्वी या शाखांत आपापसांत लग्ने होत नसत पण अलीकडे शाखाभेद फारसा कटाक्षाने पाळला जात नाही. हे लोक स्वतःला उच्च मानतात व आपण मुळचे राजपूत कुळीतील आहोत असे समजतात. इतर लोक यांना हीन समजतात. शेती व मजुरी हे यांचे प्रमुख व्यवसाय असून ज्वारीची भाकरी व मांसाहार हा यांचा नित्याचा आहार आहे. यांची घरे कुडाच्या भिंतींची व गवती छपरांची असतात. त्यांना खिडक्या नाहीत व उंचीही फार कमी असते.

पितृसत्ताक कुटुंबपद्धती यांच्यात असून लग्नानंतर मुलगा वेगळा राहतो. त्यामुळे विभक्त कुटुंबपद्धती रूढ आहे. दुबळांत मुले–मुली वयात आल्यावर विवाह होतो. मुलाचे वय १८ व मुलीचे वय १५ हे विवाहयोग्य वय मानण्यात येते. दुबळा प्रदेशातील (दुबळा लँड) लोकांमध्येच फक्त अंतर्विवाह होतात. त्या प्रदेशाला विटो म्हणतात. असे अनेक विटो– उदा., नवसारी विटो, बार्डोली विटो आदी विटो दुबळा जमातीत आढळून येतात. याला प्रदेश अंतर्विवाह असे म्हणतात. वधूमूल्याची प्रथा प्रचलित असून लग्न बस्तरिओ नावाच्या मध्यस्थामार्फत ठरवितात. लग्नापूर्वी नानीताडी, मोटीताडी वगैरे समारंभ करतात ‘घाणा’ या विधीने सर्व व्यवहारांवर शिक्कामोर्तब होते. विवाह हिंदूपद्धतीप्रमाणेच मंडपात होतो. बहुपत्नीत्व, घटस्फोट आणि विधवाविवाह प्रचारात असून हे सर्व त्यांची पंचायत समिती ठरविते.

दुबळांची पंचायत समिती असून पंच व पटेल हे त्यांचे दोन प्रमुख अधिकारी आहेत. त्यांच्या मदतीस अवलदार नावाचा एक अधिकारी असतो. हे तिघे गावातील सर्व भांडणतंटे, गावाचे प्रश्न, दंड, न्यायदान वगैरे सर्व व्यवहार पाहतात. गावातील हुशार, वयस्कर, अनुभवी व प्रतिष्ठित व्यक्तीला पटेल म्हणून निवडतात. शिवाय गावाच्या निरनिराळ्या भागांमधून आणखी प्रतिनिधी निवडण्यात येतात. पटेल व हे प्रतिनिधी मिळून सभा तयार होते. जमातीचे नीतिनियम, रीतिरिवाज व परंपरा यांचे योग्य रित्या पालन होते की नाही, हे पंचायतीचे प्रमुख काम असते. याशिवाय कौटुंबिक अडचणी दूर करणे, हे एक महत्त्वाचे समितीचे काम असते. दुबळा समाजावर पंचायतीचे बरेच वर्चस्व आढळते.


दुबळा स्त्रिया सुईणीचे कामामध्ये तरबेज असतात. एखादे वेळी प्रसूती कठीण वाटल्यास दुबळा पेटफोडीमाता या देवतेला नवस बोलतात. कोंबडा किंवा बकरे बळी देतात. सातव्या दिवशी मुलाचे नाव ठेवतात व तेही ज्या वारी मूल जन्मले असेल, त्या वाराचे नाव ठेवतात. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जावळ काढतात. ज्या देवतेच्या कृपेमुळे मुलगा झाला असेल, त्या देवतेला मुलगा अर्पण करण्याची पद्धती आहे. जावळाच्या वेळी केस, नारळ व दिवा या वस्तू देवतेला दिल्या असता मुलगा परत मिळतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.

दुबळांना नृत्याची हौस असून त्यांच्यात नृत्याचे तीन प्रकार आढळतात : जातिनृत्य, जन्म, लग्न, मृत्यू इ. प्रसंगांचे नृत्य आणि उत्सव, समारंभाच्या वेळचे नृत्य. नृत्यात कोंबडा, सरड इ. प्राण्यांच्या झुंजेशी दृश्ये तसेच पेरणी, लागवड वगैरे प्रसंगांची हालचाल असते. यांचा मोठा सण म्हणजे ‘दिवसो’. त्या वेळी अविवाहित तरुण–तरुणी बाहुला–बाहुलीचे लग्न करतात. हा सण आषाढी अमावस्येला करतात. जी मुलगी बाहुली करते ती लग्न होईपर्यंत बाहुलीच करते, तर जी मुलगी बाहुला करते, ती लग्न होईपर्यंत बाहुलाच करते. शीतलासप्तमी हा दुसरा सण. याला उपवास करतात. शीतलादेवीच्या उपासनेने देवी–कांजण्या वगैरे रोगांची बाधा होत नाही, असे ते समजतात. सर्व सणांत नाच–गाण्यांचा कार्यक्रम असतो. याशिवाय हिंदूंचे नवरात्र, दसरा, दिवळी वगैरे सणही ते साजरे करतात. यांच्यात मुरळा, भरमदेव हे प्रमुख देव असून बाळिया काका ऊर्फ हाळिया काका देवी या प्रमुख देवता आहेत. दुष्ट शक्तींमुळे रोगराई व संकटे येतात अशी त्यांत समज आहे. अशा वेळी भगताकडे जाऊन त्यास उपाय विचारतात. त्यांच्यात वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आकाशीमाता, पेटफोडीमाता, खोखलीमाता, मरीमाता, वेराईमाता इ. देवता आहेत. भगत हा त्यांचा वैद्य, मांत्रिक आणि पुरोहित अशा सर्व भूमिकांमध्ये असतो. भुताखेतांवर त्यांचा विश्वास आहे. व्यक्ती मेल्यावर भूत होऊन त्रास देते, असे ते मानतात.

हे लोक मृतांना जाळतात वा पुरतात. या दोन्ही पद्धतींत तांदूळ टाकून जागा शुद्ध करून घेतात. मृताच्या तोडात भाताचे चार पिंड ठेवण्याची प्रथा असून प्रेत उत्तरेकडे डोके करून स्मशानात ठेवतात. पुरुषाचे प्रेत धूतवस्त्रात, तर स्त्रीचे प्रेत रक्तवस्त्रात गुंडाळतात. प्रेत नेत असताना मार्गामध्ये मध्ये काही वेळ थांबतात. त्याला  विसामो म्हणतात. या वेळी जुने कपडे फेकून देतात. हे लोक सात दिवस सुतक पाळतात. अकराव्या दिवशी अस्थी नदीत विसर्जित करतात. प्रेत पुरले असल्यास त्या दिवशी त्याची लाकडी प्रतिमा करून जाळतात. अंत्यविधी भगत करतो. श्राद्ध ४–५ वर्षांनी अक्षय्य तृतियेला करतात. त्याला पर्जन किंवा मोटो दहदो म्हणतात. हा कार्यक्रम सार्वजनिक रीत्या व अनेक कुटुंबे मिळून करतात.

संदर्भ : 1. Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, Vol. I, Bombay, 1920.

           2. Shah P. G. The Dublas of Gujarat, Delhi, 1958.

देशपांडे, सु. र.