परंपरागत पोशाखातील सेमा नागा स्त्री-पुरूषसेमा नागा : नागालँडमधील एक प्रमुख आदिम जमात. ते सुमीनामक पूर्वजावरून आपला उल्लेख सेमी/सुमी असा करतात. त्यांची वस्ती प्रामुख्याने मध्य व दक्षिण नागालँडमध्ये झुन्हेवोटो जिल्ह्यात आहे तसेच दिमापूर, कोहिमा, मोकोकचुंग इ. ठिकाणीही ते तुरळक प्रमाणात असून तिनसुकिया जिल्ह्यात त्यांची सात ग्रामस्थाने आहेत. सुरुवातीस ते पूर्वेकडून मणिपूरच्या माओ प्रदेशात आले आणि खेझो-केनॉम येथे स्थायिक झाले. पुढे काही वर्षांनी नागालँडमधील झुन्हेवोटो या डोंगराळ भागात त्यांनी स्थलांतर केले. त्यास सेमा भूभाग म्हणतात. त्यांची लोकसंख्या २,४२,००० (२००१) होती. त्यांची सेमा भाषा तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील असून ते रोमन लिपी वापरतात. मध्यम उंची, गोल व थोडे रुंद मस्तक, बसके वा नकटे नाक ही त्यांची इतर नागांप्रमाणेच शारीरिक वैशिष्ट्ये असून अंगावरील विशिष्ट शालीमुळे ते ओळखले जातात. त्यांचे मुख्य अन्न भात असून ते मांसाहारी आहेत. ते डुकराचे तसेच अन्य जनावरांचे मांस (बीफ) खातात. त्यांच्यात बहिर्विवाही कुळी असून त्यांपैकी असिमी, चेशलिमी, अचुमी, अवोही, अयेमी, चेकेमी, येपोथोमी, त्सूकोमी, वोखामी, चोफिमी, सोहेमी, किनिमी, झुमोमी, मुरोमी इत्यादी काही महत्त्वाच्या कुळी होत. ते सेमा, सुमी आणि स्वू ही आडनावे लावतात. स्वू (सुमी) आणि तुकू (तुकुमी) ही त्यांच्या दोन जमातप्रमुखांची बिरुदे होत.

सामान्यतः विवाह वयात आल्यानंतर परस्परांच्या संमतीने ठरतात. सेमा नागा जमातीत आई, काकी व मावशी यांना ‘अजा’ ही संज्ञा लावली जाते. यावरून त्यांमध्ये दीर-भावजय विवाह आणि मेहुणा-मेहुणी विवाह हे प्रकार रूढ असले पाहिजेत. शिवाय वडील, काका व मावसा यांना ‘अपु’ ही संज्ञा सर्रास लावतात. यावरून एका घरातील बहिणी-बहिणींचा दुसऱ्या घरातील भावा-भावांशी विवाह किंवा सख्ख्या बहिणी जावा-जावा होण्याचे रिवाज प्रचलित असावेत. पूर्वी त्यांच्यात बहुपत्नीकत्व होते परंतु सेमा नागा ख्रिस्ती धर्मीय झाल्यापासून त्यांच्यात एकपत्नीत्व प्रचलित आहे. वधूमूल्य रोख रकमेत दिले जाते. विवाहित दांपत्य पितृगृही राहते किंवा नूतनगृही प्रवेश करते. घटस्फोट, पुनर्विवाह यांस जमातीत मान्यता असून संपत्तीचा वारसा मुलांकडे जातो. सेमा नागांच्या स्त्रिया पशुसंवर्धन, शेती, कंदमुळे व जळण गोळा करणे इत्यादींत पुरुषांबरोबर सहभागी असतात. तद्वतच धार्मिक व राजकीय बाबींतही त्या भाग घेतात. मुलाच्या जन्मानंतर माता सहा दिवस अशौच (सोयर) पाळते. नामकरण विधी धर्मगुरू करतो.

सेमांचा पारंपरिक मुख्य व्यवसाय जंगल तोडून, जाळून शेती करणे हा होता. पशुसंवर्धन, विणकाम, बुरूडकाम आणि लोहारकाम हे त्यांचे गौण व्यवसाय होते. जवळजवळ ८० टक्के लोक शेती करीत पण अलीकडे शिक्षणामुळे सेमांपैकी अनेकजण नोकरीव्यवसायात पडले आहेत. तसेच काही सेमा स्वतंत्र उद्योगही करतात. पूर्वी त्यांच्यात वंशपरंपरागत मुखियाची पद्धत होती आणि त्याचा अधिकार पंचायतीत सर्वमान्य असे परंतु अलीकडे विविध मंडळांतून निवडून आलेल्या ज्येष्ठांची सभा प्रशासकीय व्यवस्था पाहते आणि कल्याणकारी योजना राबविते. सेमा नागा भुताखेतांवर विश्वास ठेवतात, कुलदैवतांना भजतात, जादूटोणा आणि पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे. पूर्वी ते शिरोमृगया करीत. शत्रूंची डोकी कापून आणीत व ती विजयचिन्हे म्हणून ठेवीत. त्यामुळे त्यांचा अन्य लोकांशी फार कमी संपर्क आला पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ख्रिस्ती मिशनऱ्यांशी त्यांचा संपर्क जडला आणि ९९·९ टक्के सेमांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला परिणामतः त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडला. साक्षरतेचा प्रसार झाला, तसेच आंतरजातीय विवाह होऊ लागले. काही सेमा नागांनी बिहारी, आसामी, नेपाळी मुलामुलींबरोबर वैवाहिक संबंध प्रस्थापित केले आहेत. बहुतेक सेमा ख्रिस्ती असल्यामुळे मृताला पुरतात तथापि काही ख्रिश्चनेतर सेमांमध्ये जुन्या अंत्यसंस्कारांच्या धार्मिक परंपरा व रूढी प्रचलित आहेत.

सेमा अनेक सण-उत्सव साजरे करतात. त्यांपैकी तुलुनी आणि अहुना हे प्रसिद्ध आहेत. तुलुनी हा सण पावसाळ्याच्या मध्यास तांदळापासून बनविलेल्या दारूच्या प्राशनाने ते साजरा करतात. तिला अन्नीसुद्धा म्हटले जाते. उत्तम पीक यावे आणि जमातीत सौहार्द निर्माण व्हावे, हा त्यामागे उद्देश असतो. या समारंभात तरुण- तरुणींचे विवाह ठरतात. डुकरे, गायी, मिथुन यांची कत्तल या निमित्ताने होते आणि त्यांचे मांस जमातीत वाटले जाते तर अहुना हा नव-पिकांचा स्वागत-समारंभ असून त्यात निर्मात्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दोन्ही सणांना अलीकडे अधिकृत दर्जा प्राप्त झाला आहे.

संदर्भ : 1. Hutton, J. H. The Sema Nagas, London, 1953.

           2. Singh,  K. S. The Scheduled Tribes, Delhi, 1994.

देशपांडे, सु. र.