कुरिचियन:केरळ राज्यातील एक अनुसूचित जमात. तमिळनाडूतही त्यांची थोडीफार वस्ती आहे. कुरूचियन, कोवोहन, कुरिच्छन, कुरिचियार, कुरिच्छियन वगैरे नावांनीही ही जमात प्रसिद्ध आहे. कुरि म्हणजे टेकडी आणि चियन म्हणजे लोक या दो कानडी शब्दांवरून हा शब्दप्रयोग तयार झाला असावा, असे काहींचे म्हणणे आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या ११,८५४ होती. हे काळे व कुरळ्या केसांचे लोक मल्याळम् भाषाच बोलतात.

कुरिचियन आपण नायर योद्धयांचे वंशज आहोत आणि त्यांनीच आपल्याला हे नाव दिले, असे सांगतात. वायनाडच्या वेदन राजाचा पराभव केल्यानंतर त्रिवांकुरच्या नायरांनी परतल्यावर कुरिचियनांना आपल्या जातीत घेण्याचे नाकारले, म्हणूनन ते वायनाडला आले आणि पहाडात वस्ती करून राहू लागले. हे तेथील मूळ रहिवासी असावेत. कारण नायर व त्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. वायनाडच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान असून त्यांनी १८०२ मधील बंडात ब्रिटिश सैन्याची कत्तल केली आणि १८१२ मध्ये पझ्हासी राजाच्या बंडात भाग घेतला. हे लोक स्वतःला श्रेष्ठ मानतात. त्यांचे सोवळे-ओवळे फार कडक आहे. इतरांचा स्पर्शही त्यांना खपत नाही. तसेच चालीरीतींचे उल्लंघन करणाऱ्यास ते वाळीत टाकतात. अशांपैकी बहुतेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.

यांचा मुख्य व्यवसाय स्थलांतरित पद्धतीची शेती असून त्यास पुनम म्हणतात. काही जण मजुरीही करतात. अद्यापि शिकार हाही व्यवसाय टिकून आहे. जमिनीजवळच थोड्या उंचीवर यांची झोपडी असते. स्वतः विटा रचून ते घरांच्या भिंती घालतात.

मुलगी वयात येण्याअगोदरच नाली-केत्तु-कल्याणम्‌ विधी करून मुलीच्या गळ्यात ताली बांधतात, नंतर लग्नप्रसंगी नवऱ्याघरी जाऊन ही ताली (दोरा) काढून नवीन बांधतात. देज देण्याची पद्धत आहे. आते-मामे भावंडात लग्न होते.

यांच्यात मातृसत्ताक पद्धती रूढ असली, तरी स्त्री नवऱ्याच्या घरीच राहते. वारसाहक्क काही ठिकाणी मातृसत्ताक आणि काही ठिकाणी पितृसत्ताक पद्धतीनुसार आहे.

गाव-प्रमुख व देवऋषी हे वंशपरंपरागत नाहीत. दैवी शक्ती प्राप्त होणाऱ्यालाच हा अधिकार मिळतो. मुत्तप्पन व विष्णु या देवतांना ते भजतात. स्त्रिया व मुले यांना त्यांचे दर्शन घेण्यास बंदी आहे. प्रमुखाला  मोथपणिक्कर म्हणतात. ते मृताला पुरतात. अकरा दिवस सुतक पाळतात. मृताच्या भाच्याकडून अंत्यविधी करविले जातात.

संदर्भ: Luiz. A.A.D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.

भागवत, दुर्गा