थारू युवती

थारू : भारतातील उत्तरेकडील एक जमात. त्यांची वस्ती मुख्यतः उत्तर प्रदेशातील नैनिताल जिल्ह्यातील तराई जंगलात आढळते. याशिवाय बिहार व नेपाळ या प्रदेशांतही ते आढळतात. जाड ओठ, रुंद गाल, बारीक डोळे आणि रेखीव पापण्या अशा मंगोलियन पद्धतीची त्यांची चेहऱ्याची ठेवण असून धिप्पाड व सावळ्या रंगाचे हे लोक आहेत.

यांच्या पूर्वेतिहासाबद्दल मतैक्य नाही. हे स्वतःला राजपूत वंशीय समजतात. प्राचीन काळी थारूंच्या मातृप्रधान कुटुंबसंस्था असलेल्या राजांना इतर हल्लेखोरांनी हुसकावून लावल्यामुळे स्त्रिया जंगलातील सैसे (Saise) व चमार (Chamar) यांच्याजवळ राहिल्या. त्यांपैकी ‘चमार’चे वंशज म्हणजेच ‘थारू’ असेही मानले जाते.

शेती हा थारूंचा मुख्य व्यवसाय असून मासेमारी, बुरूडकाम, शिकार वगैरे दुय्यम व्यवसायही ते करतात. शेती विहिरीच्या पाण्यावर, बैल–नांगरटीने चालते. बंदूक हे शिकारीचे हत्यार असून त्यासाठी लागणारा आवश्यक तो सरकारी परवाना ते काढतात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे थारूंत खर्चिक वृत्ती आढळते. समारंभाच्या प्रसंगी दारू पिणे प्रतिष्ठितपणाचे समजले जाते.

ही जमात उच्च व नीच अशा दोन अर्धकांत विभागलेली असून प्रत्येकाचे पाच उपविभाग आहेत. उच्च विभागातील पाचही उपविभाग बहिर्विवाही असून नीच विभागातील पाच विभाग अंतर्विवाही आहेत. प्रत्येक उपविभागास ‘कुरी’ म्हणत असून त्यांना वेगवेगळ्या संज्ञा आहेत.

मुलांना वारसाहक्क समप्रमाणात मिळतो. दत्तकपद्धती रूढ असून पितृप्रधान कुटुंबसंस्था आहे. मात्र मातृप्रधान कुटुंबसंस्था असलेल्या ‘खासी’ जमातीच्या स्त्रियांप्रमाणेच ‘थारू’ स्त्रियाही अधिकाराने वागतात, हे या जमातीचे एक वैशिष्ट्य होय.

मुलामुलींची लग्‍ने लहान वयातच मध्यस्थामार्फत ठरवितात. वयात आल्यानंतर विवाहसोहळा हिंदू पुरोहिताकडून होतो. विधवा–विवाहास परवानगी आहे. देवर–विवाह, मेहुणी–विवाह इ. प्रचलित आहेत. नवऱ्याला बायकोकडून काडीमोड मिळते. पुरुष व स्त्रिया यांची एकमेकांत किंवा जमातबाह्य व्यक्तीशी विवाहबाह्य घनिष्ठ मैत्री जमते. अशी मैत्री धार्मिक पद्धतीने साजरी करतात.

आदिवासींची अचेतनपूजा, हिंदूंची दैवतपूजा, मुसलमानांचे पीर, शिखांचे धर्मगुरू इ. सर्वांवरच त्यांची श्रद्धा असल्यामुळे नेमके कोणत्या धर्माचे त्यांच्यावर वर्चस्व आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

मृताला थारू पूर्वी पुरत असत पण अलीकडे दहन करतात. अस्थी पुरतात किंवा नदीत विसर्जित करतात. दहा दिवस सुतक पाळतात. बाराव्याला आप्तेष्टांना जेवण घालतात. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे.

संदर्भ: Shrivastava, S. K. The Tharus–A Study in Culture Dynamics, Ahmedabad, 1958.

कीर्तने, सुमति